Breaking News

महाड एमआयडीसीतील मल्लक कंपनीला भीषण आग

13 जण किरकोळ जखमी

महाड : प्रतिनिधी
महाड एमआयडीसी बुधवारी (दि. 8) स्फोटाने हादरून गेली. येथील मल्लक कंपनीला भीषण आग लागून स्फोट झाला. यामध्ये कंपनीतील तसेच शेजारील कंपन्यांमधील असे एकूण 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपास आठ किमी परिसराला हादरे बसले आणि इमारतीचे व लोखंडाचे तुकडे दोन किमी अंतरावर जाऊन पडले.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणार्‍या कारखान्यात बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने कंपनीच्या एका प्लांटला क्षणातच विळखा घातला. आग लागल्याचे समजताच कामगारांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्याचवेळेस प्लांटमधील एका रिअ‍ॅक्टरने पेट घेतल्याने स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. स्फोटाच्या दणक्याने कंपनीच्या प्लांटची इमारत पूर्णपणे ढासळून गेली. या ढासळलेल्या इमारतीचे तुकडे परिसरात जाऊन पडले. कंपनी परिसरात असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी आणि सिद्धार्थ या कंपन्यांच्या खिडक्या मोडून पडल्या, तर रिअ‍ॅक्टरसह अन्य लोखंडी तुकडे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत उडाले. दोन तासानंतर आग नियंत्रणात आणली गेली, तर जखमींवर महाड उत्पादक संघटनेच्या रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply