आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार
पनवेल : रामप्रहर वृत्त
सिंधुदुर्गवासियांच्या स्वभावातच हापूस आंब्याचा गोडवा पूर्णपणे भरलेला असून ते आपल्या अथक परिश्रमाने कोकणची समृद्धी वाढवत आहेत, तसेच पनवेलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा हातभार लागत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या स्नेहसंमेलनामधे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पनवेल परिसरात वास्तव्याला आलेल्या सिंधुदुर्गवासियांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ, पनवेल या संस्थेचे कौटुंबिक स्नेहसंमेलन येथील फडके नाट्यगृहामध्ये रविवारी (दि. 12) झाले. या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुंबईच्या माजी नगरसेविका ममता चेंबुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सिंधुदुर्गवासीयांच्या व्यावसायिक डायरीचे प्रकाशन झाले. दूरदर्शन माहितीपट निर्माते दीपक शेडगे, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी प्रभाकर गावडे, वाहन व्यावसायिक सतीश नायर, बांधकाम व्यावसायिक मंगेश परुळेकर व वीरपत्नी स्वाती कदम यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी धुंदनिर्मित स्वरतरंग या वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला. संमेलनासाठी संघाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रिया खोबरेकर, सचिव बाप्पा मोचेमाडकर, खजिनदार दीपक तावडे, बाबाजी नेरुरकर, वासुदेव सावंत, प्रदिप रावले यांच्यासह कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले. वैभवी मराळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रंगनाथ नेरुरकर यांनी तंत्रसहाय्य केले.