Breaking News

विद्यार्थी बसचालकांवर उपासमारीची वेळ

शासन उदासीन, संघटनेचा आंदोलनाचा इशारा

पेण : प्रतिनिधी  
कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा अद्याप पुर्ववत सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसचे मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्कूल बस रस्त्यावर धुळ खात उभ्या आहेत. त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बस मालकांना सहन करावा लागत आहे.
स्कूल बस व व्हॅनला केवळ शालेय वाहतुकीसाठीच परवाना दिला जातो. त्यामुळे त्या बस इतर कोणत्याही वाहतुकीसाठी वापरता येत नाहीत. वापर नसला तरी कर्ज काढून घेतलेल्या बसचे हप्ते भरण्यासाठी या बस मालकांकडे बँका तगादा लावत आहेत. तर अनेक मालकांनी बस आरटीओमधून नॉनयुज (वापरात नसलेल्या) करून घेतल्या आहेत. दरम्यान, या वापर नसलेल्या बस गेल्या काही महिन्यांपासून उभ्या असल्याने त्यांची अवस्था भंगार झाली आहे. अनेक स्कूल बसेच्या बॅटर्‍या, डिझेल, आरसे तसेच टायर चोरीला गेले आहेत. तर सीटला बुरशी लागून खराब झाल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत व पुढील सहा महिने शाळा सुरू होणार नाहीत. पर्यायाने स्कूल बससेवा अजूनही काही काळासाठी बंद राहणार आहे. मात्र या बसेसची दुरूस्ती आणि इन्शुरन्सचा खर्च सुरू आहे, अशी व्यथा बस चालकांनी मांडली.
स्कूल बस चालक, मालकांसाठी सरकारने सकारात्मक विचार करावा. टॅक्स व विम्यामध्ये 70 टक्क्यापर्यंत सवलत मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबतीत बसचालक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब याची नुकतीच पुण्यातील नेहरू मेमोरियल सेंटरमध्ये भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

स्कूल बस चालक, मालकांच्या मागण्यांचा शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील विविध संघटना मिळून मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
– हरिष बेकावडे, संस्थापक, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply