Breaking News

प्रकल्प उभारण्याबरोबरच जमिनी दिलेल्या शेतकर्यांना वाढीव दर द्या!; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर प्रकल्प उभारण्याबरोबरच या प्रकल्पासाठी यापूर्वीच जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांनाही वाढीव दर देण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली आहे. खारेपाटातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर 10 वर्षे होऊनही प्रकल्प उभा राहिला नाही. 10 वर्षांपूर्वीच्या दरात आणि आताच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असणार आहे. त्यामुळे अगोदर जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांचे नुकसानच झाले आहे. त्यांना वाढीव दर देण्याचे आमदार द्वयीने यातून अधोरेखित केले आहे.

अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर-धेरंड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने टाटा पॉवर कंपनीच्या औष्णिक प्रकल्पासाठी 10 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीवर अद्याप कोणताच प्रकल्प उभारण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारण्यात आलेला नसतानाही पुन्हा या परिसरातील सुमारे एक हजार 300 एकर जमीन संपादन करण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणी ज्या शेतकर्‍यांनी अगोदर जमिनी दिल्या आहेत, त्यांना प्रथम वाढीव दर देण्यात येऊन या संपादित केलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारण्याबाबतच्या मागणीकरिता शहापूर-धेरंडमधील काही शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता काय? तसेच या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता. या प्रश्नावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने टाटा पॉवर कंपनीच्या औष्णिक प्रकल्पासाठी 10 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीवर अद्याप कोणताच प्रकल्प उभारण्यात आला नसल्याची, तसेच पुन्हा या परिसरातील जमीन संपादनाची कार्यवाही सुरू असल्याची बाब खरी आहे. शहापूर येथील खातेदारांनी गावाचा विकास होण्याकामी महामंडळास जमिनी देण्यास तयारी असल्याचे निवेदन दिले आहे, तसेच जमिनी औद्योगिक कारणासाठी संपादन कराव्या याबाबत अलिबाग उपविभागीय अधिकारी यांच्याकडे स्वाक्षर्‍यांसह निवेदन सादर केले. त्यानुसार मौजे शहापूर (ता. अलिबाग, जि. रायगड) येथे खासगी 736.394 हे. आर व सरकारी 0.868 हे. आर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply