मोहोपाडा : प्रतिनिधी
आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच (भाजप) तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी नागरिकांसाठी आधारकार्ड अपडेट शिबिर आयोजित केले होते. सन 2015 पासून देशामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. बायोमेट्रिक प्रमाणिकरणासह रहिवाशाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा सर्वांत व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्डचा वापर केला जात आहे. यापुढे शासकीय व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आधारकार्ड अद्ययावत (अपडेट) करून घेणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना आधारकार्ड मिळाले आहे, परंतु दहा वर्षांमध्ये एकदाही अद्ययावत केले नाही. त्यांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आधारकार्ड अपडेट शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 65 नागरिकांनी आपले आधारकार्ड अपडेट करून घेतले.