नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित होते.
भारत जगभरातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे. जगावर आपल्या देशाने छाप सोडली पाहिजे. देशातील विविधतेतील एकता आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. देशात अनेक गोष्टी एकत्र होताहेत. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळे एकत्रितरीत्या सुरू आहे. सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा अनुभव खूप सुखद होता. पूर्ण बहुमत मिळून एखाद्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली. देशात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचेच सरकार येणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
याआधी काहींना एक-दोन वर्षांसाठी सत्ता मिळाली किंवा एका परिवाराला सत्ता मिळाली, मात्र लोकांनी बहुमताने निवडलेले सरकार पाच वर्षे चालल्याची घटना अनेक वर्षांनी घडली. माझ्यासाठी निवडणूक प्रचार जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता. आम्हाला जनतेचा आशीर्वाद हवा आहे. देशातील प्रत्येक माणसापर्यंत विकासाच्या योजना पोहचवल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही मोदी यांनी आवर्जून सांगितले. देशातील जनतेचा कौल 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. देशाच्या विकासाचे अनेक निर्णय आम्ही घेत आहोत आणि यापुढेही घेऊ. आज पत्रकार परिषदेला येऊन खूप आनंद झाला. मी आधी हेच करीत होतो. आज खूप दिवसांनी पत्रकार परिषदेला आलो, असेही मोदी यांनी सांगितले. शेवटी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सर्व देशवासीयांचे आभार मानले.