रस्त्यावर दगड टाकल्यामुळे रुग्णवाहिकेला होतो अडथळा; रुग्णांना मनस्ताप
कर्जत : बातमीदार
माथेरानमध्ये विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे तेथे घोड्यांवरून मालवाहतूक केली जाते. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तेथे घोडेवाले दगड, रेती, सिमेंट घेऊन जातात व तो रस्त्यातच टाकतात. ठेकेदार हा माल उचलत नाही. त्यामुळे रुग्णांना घेऊन धावणार्या रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होत असून रुग्ण व रुग्णवाहिका चालकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
माथेरानमध्ये विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारे दगड, रेती, सिमेंट आणण्याची ऑर्डर ठेकेदार घोडेवाल्याला देऊन मोकळा होतो. हे घोडेमालक घोड्यावरून आणलेला माल रस्त्यावर टाकतात. ठेकेदार व त्याचे कर्मचारी हा माल उचलत नाहीत व तो रस्त्यावर पडून राहतो.
सध्या कोरोना काळात रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका सतत धावत असते. मात्र तिला रस्त्यावर टाकलेल्या दगडांचा अडथळा होत आहे. चालकाला रुग्णवाहिका थांबवून रस्त्यावर टाकण्यात आलेले दगड दूर करावे लागत आहेत. घोड्यावर लादलेल्या मालाच्या धकडेमुळे रुग्णवाहिकेची मोडतोड होते. याचा त्रास रुग्णाला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या बांधकाम साहित्याबाबत नगर परिषदेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
येथील कस्तुरबा रोडवर सर्वत्र दगड, खडी गोणी टाकण्यात आल्या आहेत. तेथून रुग्णवाहिका जाण्यास जागा राहिली नसल्याने मला त्या गोण्या बाजूला हटवाव्या लागल्या. त्यात खूप वेळ गेला. त्याचा त्रास रुग्णाला सहन करावा लागला.
– प्रशांत कदम, रुग्णवाहिकाचालक