Breaking News

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई ः प्रतिनिधी

न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने शुक्रवारी (दि. 17) अध्यादेश जारी केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाबाबत दिलासा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयामधील जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. प्रवेशाची मुदत 25 मेऐवजी 31 मेपर्यंत वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झालेले प्रवेश कायम ठेवण्यात येतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण लागू करण्याच्या निर्णयामुळे नुकसान होणार्‍या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीही राज्य सरकारकडून पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थीवर्गातून स्वागत करण्यात

आले आहे.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply