आमदार रमेश पाटील यांची मागणी; केंद्राकडे पाठपुरावा करणार -मंत्री मुनगंटीवार
मुरुड : प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये भाजप आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांनी मच्छीमार बांधवांच्या अनेक समस्यांवर मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष लक्ष वेधले आहे. या सभेत आमदार पाटील यांनी मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करावे व नवीन डी.सी.आर. तयार करून त्याचा 2034 च्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात यावा. तसेच सागरी जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे देखील सीमांकन लवकरात लवकर करावे. कोकण किनारपट्टीवर वारंवार नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत मिळत असल्याने एन.डी.आर.एफ.चे निकष बदलण्यात यावे, नैसर्गिक आपत्तीमध्ये सागरी किनारी असणार्या मच्छीमार बांधवांच्या घरांचे संरक्षण करण्याकरिता धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावे व शेतकर्यांची 1 रुपयांमध्ये विमा पॉलिसी उतरवली जाते त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान व अपघात झालेल्या मच्छीमार बांधवांना मदत मिळण्याकरिता मच्छीमार बांधवांची देखील 1 रुपयांमध्ये विमा पॉलिसी काढण्यात यावी.
तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेअंतर्गत मच्छीमार बांधवांचे थकीत असलेले 588 कोटी रुपये कर्ज माफ करून मच्छीमार बांधवांचा उर्वरित डिझेल परतावा देण्यात यावा अशी मागणी केले. तसचे किनारपट्टीवरील 173 बंदरातील गाळ काढावा अशा मागण्या मंत्र्यांकडे करून शासनाने मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रमेश पाटील यांनी मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे
केली आहे.
निकष बदलण्यासाठी प्रयत्नशील
मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एनडीआरएफचे निकष बदलण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून सागरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी मच्छीमार बांधवांच्या घरांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याकरीता सर्व सागरी जिल्ह्यात पीडब्ल्यूडी विभागामार्फत धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात येतील असे अभिवचन दिले.
मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत सरकार अनुकूल असून पुढील काळात या समस्यांची सोडवणूक करून मच्छीमार बांधवांना सरकार नक्की दिलासा देईल
-रमेश पाटील, भाजप आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष