Breaking News

काँग्रेसची मानसिकता

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याबाबतच काँग्रेसने साशंकता व्यक्त करीत आपली मानसिकता दाखविली आहे. वास्तविक असे आरोप करण्यापूर्वी काँग्रेसने आपणही कधी काळी सत्तेत होतो हे सोईस्कररीत्या विसरलेले आहे. अशा प्रकारे आरोप करून काँग्रेसवाले सैन्य दलाचे खच्चीकरण करीत आहेत, असेच म्हणावे लागेल.

पुलवामा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हवाई दलाने केलेल्या कारवाईचे अवघा देश अभिमानाने समर्थन आणि कौतुक करीत असताना इकडे काँग्रेसने मात्र त्यात घाणेरडे राजकारण करण्यास सुरुवात करीत आपली मानसिकता दाखवून दिलेली आहे. हवाई हल्ल्याबाबतचे पुरावे सादर केले जावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी करीत एकप्रकारे भारतीय सैन्यावरच अविश्वास प्रकट केला आहे. पुलवामा हल्ल्याबाबत पाक, तसेच जैशने देखील हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. याचा बदला घेण्याची दर्पोक्तीदेखील पाकने केली आहे, असे असताना देखील काँग्रेसवाले चक्क हवाई दलाच्या कामगिरीवरच साशंकता व्यक्त करणार असतील, तर हा त्यांचा कृतघ्नपणाच म्हटला पाहिजे. कारण आजपर्यंत ज्या ज्या वेळी अशी संघर्षमय स्थिती निर्माण झाली त्या वेळी भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाने योग्य ती कारवाई करीत देशाचे संरक्षण करण्याचा जीवापाड प्रयत्न केला आहे. असे असताना त्यांच्या कारवाईबाबत अशी साशंकता घेणे काँग्रेससारख्या जबाबदार राजकीय पक्षाला न शोभणारे असेच आहे, असेच खेदाने नमूद करावे लागेल. एकीकडे अवघा देश कारवाईबाबत हवाई दलाला धन्यवाद देत आहे, त्यांच्या कौतुकाचे पोवाडे गात असताना काँग्रेसवाले मात्र नको तो मुद्दा उपस्थित करून किळसवाणे राजकारण करीत आहे. देशात काँग्रेसने 50 वर्षाहून अधिक काळ सत्ता उपभोगली. त्या वेळीही असेच संघर्षमय प्रसंग देशावर उद्भवले होते. त्या वेळी अवघा देश, सर्व राजकीय पक्ष परस्परांमधील राजकीय मतभेद विसरून केवळ देशप्रेमापोटी एकत्र आले होते. सन 1972 मध्ये पाकसमवेत युद्ध झाले त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी रणरागिणी, दुर्गादेवी असे केले होते. असे असताना आता मात्र काँग्रेसवाले मोदींना या कारवाईचे श्रेय मिळू नये म्हणून नको तो मुद्दा उपस्थित करून जनसामान्यांतील आपली प्रतिमा मलिन करीत आहेत, असेच खेदाने नमुद करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईचे सारे श्रेय हवाई दल, नौदल आणि भूदलाला दिलेले आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला कशाप्रकारे, कधी घ्यायचा हे लष्कराने ठरवावे, असे जाहीर करीत भाजप सरकारने त्यांना मोकळीकही दिली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे राजकीय बंधन न ठेवता हवाई दलाने पुलवाम्याचा बदला घेत आपली शक्ती दाखवून दिलेली आहे. या कृतीमुळे देशातच नव्हे तर अवघ्या विश्वात भारताची प्रतिमा उंचावली आहे. मोदींच्या नेतृत्वाची कदर केली जात आहे. त्यामुळेच काँग्रेसवाले कमालीचे अस्वस्थ होऊ लागले आहेत. हे असेच घडत राहिल्यास अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पूर्ण सफाया होईल, अशी भीती काँग्रेसजनांना वाटत आहे. आता प्रचारासाठी ठोस मुद्दाच काँग्रेसवाल्यांना नाही त्यामुळे काहीतरी खुसपट काढायचे आणि टीआरपी वाढवायचा एवढाच उद्योग दिग्विजय सिंगसारखी नाठाळ मंडळी करीत आहेत, पण त्या आरोपांचा भारतीय सैन्य अथवा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply