खोपोली ः प्रतिनिधी
शहरातील सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे, मात्र खोपोली पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
सुभाषनगर वसाहतीत अंदाजे 350 घरे असून या धोकादायक दरडीची पहाणी काही वर्षांपूर्वी भूगर्भ तज्ज्ञांनी पाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरडीखाली येणारी बाधित घरे गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरड प्रतिबंध विभाग व खोपोली नगरपालिका प्रशासन कोणती उपाययोजना करतेय याकडे डोळे लावून बसली आहेत. पावसाळ्यात मात्र दरवर्षी या वसाहीतीत जिल्हाधिकारी यांचा दरड प्रकरणी खबरदारीचा आदेश म्हणून नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे, असा फलक नगरपालिका प्रशासनाकडून लावला जात असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी व खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी आधिकार्यांसह घटनास्थळाची पहाणी करून धोकादायक दरड डोंगर कड्यापासून संरक्षण प्रकरणी तेथील रहिवाशांची मागणी तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, तर रहिवाशांशी संवाद साधताना धोकादायक भागात तत्काळ संरक्षण जाळी टाकण्याबाबत चर्चा करून तसा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून संबंधित विभागाशी चर्चेतून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे रहिवाशांना व उपस्थित पत्रकारांना तहसीलदार आयुब तांबोळी यांनी घटनास्थळाची पाहणीच्या वेळी आश्वासित केले होते.
मधल्या काळात या दरड भागातील सुटलेले काही दगड काढण्याची मोहीम प्रशासनाकडून राबवण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली, परंतु परिस्थिती जैसे थे आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …