रात्रभर रस्ता बंद; 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊस
नेरळ ः प्रतिनिधी
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस रेड अलर्ट दिलेला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरानमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका पुन्हा एकदा माथेरानच्या घाटरस्त्याला बसला आहे. बुधवारी मध्यरात्री माथेरान घाटात दरड कोसळली. त्यामुळे रात्रभर वाहतूक बंद करण्यात आली होती.
माथेरान हे घाटमाध्यावर वसलेले आहे. यंदा पाऊसाने माथेरानमध्येदेखील कोसळधारा बरसवल्या आहेत. मागील 24 तासांत 398 मिमी तर गेल्या 48 तासांत 740.6 मिमी पाऊस पडला आहे. माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने जगभरातून येथे पर्यटक सर्व ऋतूमध्ये भेट देण्यासाठी येत असतात. त्यात वर्षा ऋतू हा तर पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असतो. त्यामुळेच माथेरानघाट रस्त्यात अनेकदा वाहतूक कोंडीसारख्या घटना घडत असतात. गेले काही वर्ष घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी मध्यरात्री माथेरान घाटात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली.
माथेरान वॉटरपाईप येथील वळणाच्या ठिकाणी ही दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडलेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात मातीचा मलबा, दगड रस्त्यावर येऊन पडल्याने रस्ता पूर्णतः बंद झाला होता.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती मिळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी सकाळी लवकरच हा मलबा बाजूला करीत रस्ता सुरळीत करण्यात आला.