12 पोलिसांवर उपचार सुरू
कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून राज्यातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स तसेच खासगी हॉस्पिटलही शासनाने ताब्यात घेतली होती. त्यात शासनाच्या ताब्यात असलेल्या नेरळजवळील डिस्कव्हर हॉटेलचा समावेश होता. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस रुग्णांना आता या हॉटेलमध्ये ठेवून उपचार केले जात असून त्या ठिकाणी जे 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण क्वारंटाइन केले आहेत, त्या सर्व रुग्णांचे केवळ अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
जून महिन्यात कर्जत तालुक्यातील कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाने ग्रासले आहे. मागील काही दिवसांत सातत्याने पोलीस कर्मचारी कोरोनामुळे बाधित झाले आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबई, मरोळ येथील कोविड रुग्णालयात उपचार केले जात होते, मात्र मागील आठवड्यात नेरळ पोलीस ठाण्यातील तब्बल 12 पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील 10 पोलिसांत कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती. ज्या रुग्णांत कोरोनाची लक्षणे दिसत होती, त्यांच्यावर अन्य मोठ्या रुग्णालयांत उपचार केले जात आहेत, परंतु कोणतीही लक्षणे नसलेल्या नेरळ पोलीस ठाण्यातील 10 आणि कर्जत पोलीस ठाण्यातील दोन अशा 12 पोलिसांना नेरळजवळ असलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन करून आरोग्य विभागाने उपचार सुरू केले आहेत.
लक्षणे दिसत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सकाळ-संध्याकाळ तपासणी करीत आहेत. त्या ठिकाणी 12 पोलिसांसह अन्य दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही उपचार घेत आहेत. येथे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था झाली असून कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी नेरळ पोलीस स्टेशनकडून भोजनाची व्यवस्था केली जात आहे.