Breaking News

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली

पनवेल : रामप्रहर वृत्त
बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत तक्का गावातील महिलांना दमदाटी आणि गंभीर मारहाण करणार्‍या रूपेश पगडे या दोन महिने फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या पनवेल पोलिसांनी आवळल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. विशेष म्हणजे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी गजाआड झालेल्या सुनील बहिरा या शेकापच्या माजी नगरसेवकाचा रूपेश हा सख्खा भाचा आहे. त्यामुळे मामा-भाचा जेरबंद झाल्याची चर्चा तक्का परिसरात रंगली आहे.
मारहाण आणि दमदाटी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे दीपिका धर्मा पगडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात दीपिका पगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पनवेल रेल्वेस्थानकाजवळ पूर्व बाजूस असलेल्या सईद मुल्ला यांच्या जागेवर आमचे कुटूंब 40 वर्षांपासून शेती करीत होते. काही दिवसांपूर्वी ही जमीन विकसित करण्यासाठी देण्यात आली असून त्या जागेवर मानस ग्रुप बिल्डर इमारती उभारण्याचे काम करीत आहे. गेली अनेक वर्षे जमीन कसत असल्याने भविष्यात त्या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या प्रकल्पामध्ये आम्हाला काम देण्याचे संमतीपत्र जमिनीचे मालक सईद मुल्ला यांनी दिले होते, पण मानस ग्रुपने सुनील बहिरा यांना वर्कऑर्डर देऊन त्यांच्याकडून कामे करून घेत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत वर्कऑर्डरची विचारणा करण्यासाठी संबंधित जागेवर आई संगीता व वडील धर्मा पगडे हे गेले होते.
यानंतर थोड्या वेळातच त्यांचा फोन आला की तक्का गावातील सोनू रूपेश पगडे, कृतिका कल्पेश बहिरा, सीमा निलेश बहिरा, निलेश बहिरा, रूपेश पगडे, तन्मय बहिरा, कल्पेश बहिरा आणि गोरख बहिरा हे आठ जण त्या ठिकाणी येऊन वर्कऑर्डरवरून वाद घालत शिवीगाळ करीत आहेत. त्यामुळे मी, माझी वाहिनी सोना व माझी काकी कल्पना भांडण सोडविण्यासाठी गेलो असता या आठ जणांनी आम्हालासुद्धा शिवीगाळ केली तसेच साईटवर असलेल्या लाकडी फळ्या व बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान रूपेश पगडे याने त्याच्या हातातील सेंटरिंगच्या लाकडी फळीने काकी कल्पना पगडे हिच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून जबर दुखापत केली तसेच निलेश बहिरा व तन्मय बहिरा यांनी त्यांच्या हातातील लाकडी फळीने वाहिनी सोना पगडे हिच्या पाठीवर व शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करून दुखापत केली. त्याचबरोबर निलेश बहिरा याने माझ्या पाठीवर लाकडी फळीने माझ्या पाठीवर मारहाण केली. तेथे जमलेल्या लोकांनी भांडण सोडवले. त्या वेळी ’तुम्ही परत कामासाठी इकडे आलात तर तुम्हाला परत मारू’ अशी धमकी देऊन ते सर्व आठ जण त्या ठिकाणहून निघून गेले. मग मी, माझी आई, काकू व मोठा भाऊ तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो असता आम्ही जखमी असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊन वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. काकू कल्पना हिच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्याने तिच्यावर निकम परमार या रुग्णालयात दुसर्‍या दिवशी ऑपरेशन करावे लागले, असेही दीपिका पगडे यांनी सांगितले.
दरम्यान, या गंभीर गुन्ह्याबद्दल पनवेल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र रूपेश पगडे आणि त्याच्या साथीदारांनी पलायन केले होते. त्यांच्यावर भारतीय दंड कलम 1860 नुसार 324, 143,144, 146, 147, 148, 149, 504, 506 तसेच 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेल्या आरोपींपैकी सात जणांचा अटकपूर्व जामीन झाला, तर रूपेश पगडे याला जामीन न झाल्याने तो फरारच होता. अखेरीस 21 नोव्हेंबरला आकुर्ली गावातून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याची 23 नोव्हेंबरला रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे तक्का गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करतानाच गावगुंडांना धडा शिकवल्याची प्रतिक्रिया गावात उमटत आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply