Breaking News

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान लवकरच ई-वॉटर टॅक्सीसेवा होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी पुढील महिन्यात मुंबईत दाखल होऊ शकतात.
गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीच्या मदतीने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली होती. 200 प्रवासी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी अल्प प्रतिसादामुळे कालांतराने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीसेवा सुरू करण्यात येत आहे. मुंबई सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांच्या वतीने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ही सेवा सुरू केली जाणार आहे.
मुंबईतून नवी मुंबई गाठायचे म्हटल्यास रस्तेमार्गे एक तासाचा वेळ लागतो. कार्यालयीन कामाच्या वेळात वाहतूक कोंडीमुळे अधिकचा वेळ लागतो. ते लक्षात घेता नवी मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एक पर्याय समोर आला आहे. ई-वॉटर टॅक्सीमुळे एक तासाच्या आत गेट वे ते बेलापूरपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल. शिवाय वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रिकवर चालणारी असल्याने प्रदुषणालाही आळा बसणार आहे. हार्बर सर्व्हिस या खासगी संस्थेद्वारे ती चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात ई-वॉटर टॅक्सीसेवा सुरू होणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दैनंदिन जलवाहतूक सुरू होईल, अशी माहिती हार्बर सर्व्हिस कंपनीकडून देण्यात आली. 24 प्रवासी आसन क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी तूर्तास गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी सुरू करण्यात येत आहे. तशी परवानगी मुंबई बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने दिली आहे.
प्रवासी भाडे आणि वेळापत्रक
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने गेट वे आणि बेलापूर जेट्टीवरून ई-वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज दहा फेर्‍या होतील. ई-वॉटर टॅक्सी इतर बोटींच्या तुलनेत अधिक वेगवान असून त्यामुळे बेलापूरला एक तासात, तर एलिफंटाला अर्ध्या तासात पोहचता येणार आहे. या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply