Breaking News

लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रमास पनवेलमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप मुंबई आयोजित लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून विविध भागांमध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधला.
या कार्यक्रमास पनवेल येथे प्रमुख मान्यवरांसह भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी संध्या शारबिद्रे, मंजुषा कुद्रीमोती, वृषाली वाघमारे, पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात येत आहेत. या योजना अविरतपणे सुरू राहतील. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्षम आहेत. नाहीतर त्यांच्याआधीचे मुख्यमंत्री घरून, फेसबुकवरून कारभार पहायचे. मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दमदारपणे काम करीत आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने न्यायालयात वेळवर वकील दिला नाही. त्यामुळे ते आरक्षण गेले. ‘मविआ’वालेच आरक्षण जाण्यासाठी दोषी आहेत.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी म्हटले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुती सरकारने रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून भगिनींना ओवाळणी दिली आहे, तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या वेळी सोनाली महाडिक यांनी, विरोधक ही योजना पुढे बंद होईल असे सांगत आहेत, ते खरं आहे का, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले. त्यावर तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहेत तोपर्यंत हे पैसे तुम्हाला निश्चितपणे मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ललिता कदम यांनीही या वेळी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधत माझ्या मुलीने म्हणजे तुमच्या भाचीने तुमचे खास आभार मानले आहेत, असे सांगितले.
या वेळी महिलांनी आणलेल्या राख्या जमा करण्यात आल्या. या राख्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित महिलांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनाही राख्या बांधल्या. लाडकी बहीण योजनेचे 1400 फॉर्म भरणार्‍या हरजिंदर कौर यांच्यासह इतर महिलांचे कौतुक करण्यात आले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply