Breaking News

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 300 रुग्ण

रायगड जिल्ह्याचा एकूण आकडा चारशेपार

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोना रुग्ण आढळले असून त्यामध्ये विचुंबे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 20 नवीन रुग्ण आढळले असून, आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 14) महापालिका क्षेत्रात कामोठे आठ, खारघर आठ, कळंबोली तीन आणि नवीन पनवेलमध्ये एक कोरोना रुग्ण आढळला. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या 219 आणि तालुक्यात कोरोनाचे 300 रुग्ण झाले असून, नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खालापूर दोन आणि महाड व पेण येथील प्रत्येकी नवीन रुग्ण मिळून जिल्ह्याचा एकूण आकडा 428 वर पोहोचला आहे. दरम्यान, मुरूड तालुक्यातील मिठेखार येथील मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 20 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यामध्ये खारघर आणि कामोठे येथील प्रत्येकी आठ आणि कळंबोली तीन व नवीन पनवेलमधील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांची संख्या चार, बेस्ट कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीयांची संख्या पाच, मुंबईतील रुग्णालयासंबंधित दोन, मुंबई बँक कर्मचारी कुटुंबीय तीन, एचपीसीएल कंपनीतील एक कर्मचारी, एपीएमसी मार्केट संबंधित दोन आणि नवीन पनवेलमधील ए टाईपमधील फळ विक्रेत्याचा समावेश आहे.खारघर सेक्टर 21मधील ज्ञानसाधना सोसायटीतील बेस्टमधील वाहकाच्या कुटुंबातील दोन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कामोठे येथील मारुती धाम सोसायटीतील मुंबई बँक कर्मचार्‍याच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्याचा रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आला आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 13मधील ए टाईपमधील फळ विक्रेत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. खारघर सेक्टर 35 आणि 10मधील व्यक्ती एपीएमसी मार्केटमध्ये खरेदीसाठी जात होता. त्या  ठिकाणी त्यांना  संसर्ग झाला असावा.  
कामोठे सेक्टर 10मधील अष्टविनायक कृपा सोसायटीतील महिलेचा रिपोर्ट 30 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आल्यावर मुंबईला रुग्णालयात उपचार घेऊन बरी झाल्याने 12 मे रोजी ती परत आली आहे. त्याची माहिती शासनाकडून मिळाल्याने आजच्या रुग्णांमध्ये तिचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1643 जणांची कोरोनाची टेस्ट केली आहे. त्यापैकी 54 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी 116  जणांवर उपचार सुरू असून 96 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज कोरोनाचे आठ रुग्ण बरे झाल्याने  त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये कामोठे पाच, खारघर दोन आणि पनवेलमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीण भागात गुरुवारी सुकापूर येथील साक्षी पार्क सोसायटीमधील रहिवासी पोलीस कॉन्स्टेबलला  शिवाजीनगर, गोवंडी येथे कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. विचुंबेमध्ये पाच कोरोना रुग्ण आढळले असून कोप्रोली आणि उलवे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. विचुंबे येथील ग्रीन व्हॅली सोसायटीत एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्या कुटुंबातील सदस्याला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. कोप्रोली येथील फॉर्च्युन गार्डन सोसायटीत राहणार्‍या मुंबईतील संत मुक्ताबाई रुग्णालयातील कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. उलवेच्या नील सिध्दी जोयामध्ये राहणार्‍या मुंबई पोलीस दलात कुलाबा पोलीस ठाण्यात काम करणार्‍या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. विचुंबेमधील तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाचे 81 रुग्ण झाले असून, 14 जण बरे झाले, 64 जणांवर उपचार सुरू आहेत, तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply