Breaking News

पनवेलमध्ये आज भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 800 प्रतिनिधींची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 22) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, युवा नेते विनोद साबळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सरचिटणीस दीपक बेहेरे, अमरिश कोळी आदी उपस्थित होते.
केशव उपाध्ये यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध मोर्चा-आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य असे सुमारे 800 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संबोधनाने, तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने होईल.
बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळविल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजप-शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील. शेतीविषयक प्रस्ताव भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणार्‍या या बैठकीत राजकीय सद्यस्थितीविषयी चर्चा होईल तसेच आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती उपाध्ये यांनी दिली.
पत्रकारांशी संवाद साधताना केशव उपाध्ये यांनी लोकांचा विश्वासघात करणारे सरकार गेले असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे सरकार राज्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. गेल्या अडीच वर्षांत ओबीसींचे आरक्षण घालवण्याचे काम महाविकास आघाडीने केले असल्याचे सांगतानाच शिंदे- फडणवीस सरकारने ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्याचेही अधोरेखित केले  तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या लोकभावनेचा सन्मान शिंदे-फडणवीस सरकारने केल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. याशिवाय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून लोकांना दिलासा दिल्याचेही सांगितले. आताचे सरकार जनतेच्या भावना जाणणारे सरकार आहे. त्यामुळे येत्या काळातही जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सरकार करणार असल्याचे उपाध्ये यांनी या वेळी म्हटले.

प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवारी पनवेलमध्ये होत आहे. अत्यंत कमी वेळातही जबाबदारीने नियोजनबद्ध तयारी या ठिकाणी झाली आहे. त्याबद्दल मी पनवेलकरांचे आभार व्यक्त करतो.
-केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते,महाराष्ट्र प्रदेश भाजप

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply