Breaking News

लाडक्या बहिणींबरोबर युवक, शेतकरी, विद्यार्थ्यांनाही बळ देणार

मुख्यमंत्री शिंदे यांची माणगावातील वचनपूर्ती सोहळ्यात ग्वाही

माणगाव ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा एक हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे बुधवारी (दि.9) माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य मार्ग पहिवहन महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले, पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालय अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला व बालविकास विभाग सचिव डॉ. अनुपकुमार यादव, कोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख, महिला व बालविकास विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त डॉ.कैलास पगारे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका पनवेल मंगेश चितळे, शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. राजीव साबळे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या अ‍ॅड. सायली दळवी, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माणगाव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे
आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओद्वारे
शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावेत हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे.
दिवाळीपूर्वीच महिलांना भाऊबीज देण्यात आली आहे. आज राज्यातील महिलांच्या खात्यात 17 हजार 200 कोटी रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत राज्यात दोन कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे कौतुक करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिला व बालविकास विभागाने सचिव अनुपकुमार यांच्या नियंत्रणाखाली अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आजचा दिवस हा महिला व बालविकास विभागसाठी अभिमानाचा दिवस आहे. नवरात्रीत सर्व देवींची पूजा केली जाते. येथे उपस्थित सर्व महिला देवींच्या लेकी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या तिनही लाडक्या भावांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक स्त्री ही आपल्या परिवारासाठी संसारासाठी जगत असते, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता महाराष्ट्रातील स्त्री ही स्वतःसाठी जगणार आहे. ही योजना भविष्यात निरंतर चालावी यासाठी शासनाने आर्थिक नियोजनासह तरतूद केली आहे.
समाजातील प्रत्येकाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध -उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे. त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply