पनवेल : रामप्रहर वृत्त
कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावून पनवेल आणि महाराष्ट्रासह देशाचा गौरव वाढविला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्वस्तिकाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. २७) तिचा सत्कार केला. त्याचबरोबर तिला ५० हजार रुपये बक्षीस देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, जी.के. सुर्वे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक तसेच स्वस्तिकाचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते.
लहानपणापासूनच टेबल टेनिसकडे आकर्षित झालेल्या स्वस्तिकाने सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि खेळातील बारकावे आत्मसात करण्याची जिद्द या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. वेगवान हालचाली, आक्रमक शैली, अचूक फटके आणि प्रसंगावधान ही तिच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आत्मविश्वासाने खेळ करत तिने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना स्वस्तिकाने आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा प्रभावी वापर करून संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले.
यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी “स्वस्तिकाचे यश हे पनवेलच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळविणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिच्या मेहनत आणि जिद्दीतून युवा खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी,” अशा शब्दांत कौतुक केले, तर स्वस्तिकाला मिळालेले सुवर्णपदक जनार्दन भगत शिक्षण संस्थेला समर्पित करत असल्याची भावना तिचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष यांनी व्यक्त केली.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper