आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त
निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, आल्हाददायक वातावरण आणि ऊर्जेने भरलेले ट्रेकर्स अशा आनंददायी वातावरणात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक शनिवारी (दि.२२) मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत नागरिक, युवक, महिला आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वनराईच्या सानिध्यात ट्रेकिंगचा आनंद लुटला.
धोदाणी बस स्टॉप येथील श्री राम मंदिरापासून सकाळी ट्रेकला सुरुवात झाली. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मार्गक्रमण करत धोदाणी ते माथेरानचा निसर्गरम्य डोंगराळ मार्ग ट्रेकर्सनी उत्साहाने सर केला. वाटेत दिसणाऱ्या हिरव्यागार डोंगररांगा, घाटवाटा आणि मनमोहक निसर्गदृश्यांनी ट्रेकर्सचा उत्साह अधिकच वाढवला. ट्रेकदरम्यान फिटनेस, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या ट्रेकमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन धनराज विसपुते, पनवेल शहराध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंजारराव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश भगत, शहर चिटणीस रूपेश नागवेकर, विश्वजीत पाटील, अनेश ढवळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हिमेश बहिरा, सरपंच सीताराम चौधरी, प्रशांत मोरबाळे, अंकुश पाटील, सतीश मालुसरे, निलेश भोईर, मंगेश पिलविळकर यांच्यासह इतर पदाधिकारीसुद्धा सहभागी झाले होते.
आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव
या ट्रेकचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः सहभागी होत नागरिकांसोबत ट्रेकिंगचा आनंद घेतला. युवक, महिला, नागरिक आणि निसर्गप्रेमींसोबत संवाद साधत त्यांनी सहभागींच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव घेण्याचा हा उपक्रम सहभागींसाठी संस्मरणीय ठरला. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नागरिकांनी काही काळ दैनंदिन व्यापापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, शारीरिक तंदुरूस्तीला प्राधान्य द्यावे आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
आत्मविश्वास आणि समूहभावना वृद्धिंगत
ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या युवकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. चढ-उतार, डोंगरवाटा आणि निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करताना सहभागींच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसून येत होता. ट्रेकिंगच्या माध्यमातून शारीरिक व्यायामासोबतच आत्मविश्वास, साहस, संयम आणि समूहभावना वाढण्यास मदत होते, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. मित्र-परिवारासह सहभागी झालेल्या नागरिकांनी निसर्गरम्य परिसरातील विविध क्षण आपल्या आठवणींमध्ये साठवले. डोंगरमाथ्यावर पोहचल्यानंतर सहभागींच्या उत्साहाला उधाण आले. ‘निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाचे संवर्धन करा’ या संदेशाने संपूर्ण ट्रेकमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
हा केवळ मनोरंजनासाठी आयोजित केलेला ट्रेक नाही, तर पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा उपक्रम ठरला. निसर्गाचा आनंद घेताना त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे याची जाणीव सहभागींना करून देण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा न टाकणे आणि निसर्गसंपदेचे जतन करणे याबाबतही सकारात्मक संदेश देण्यात आला.
आयोजनाबद्दल मानले आभार
धोदाणी ते माथेरान या निसर्गरम्य मार्गावर अशा आगळ्यावेगळ्या आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सहभागी नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनापासून आभार मानले. धावपळीच्या जीवनातून नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात आणत फिटनेस, साहस आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना सहभागीांनी व्यक्त केली. विशेषतः युवकांना ट्रेकिंग, फिटनेस आणि निसर्ग संवर्धनाकडे आकर्षित करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही सहभागींनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper