Breaking News

विचुंबे येथील गाढी नदीवर नवीन पुलाचे लोकार्पण

विविध विकासकामांचेही भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 9) झाले. या पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेले अनेक वर्ष विचुंबे येथे नवीन पूल उभारावा अशी मागणी होत होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाला मान्यता देत हा पूल पूर्णत्वास नेला. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसर्ली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत असताना म्हटले की, देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे, तर दुसरीकडे कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे गेली तीन वर्ष जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचार करून लोकांना देशोधडीला लावणार्‍या विवेक पाटलांचा फोटो शेकापच्या बॅनरवर लावायला लागतो, त्यांनी आम्हाला अकल्ल शिकवू नये.
कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी अजूनही तीन हजार लोकांना परत द्यायच्या बाकी आहेत. विवेक पाटलांची पनवेलच्या कोर्टात ज्या वेळेस जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती त्या वेळेस शेकापचे पुढारी कोर्टात जाऊन बसायचे आणि आज साहेबांची सुटका होईल, पुढच्या तारखेला साहेबांची सुटका होईल आणि एकदा सुटका झाली की आम्ही हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढू अशा वल्गना करीत होते. शेकाप पुढार्‍यांची ही मानसिकता आहे. विवेक पाटील काही कोणत्या आंदोलनामुळे जेलमध्ये गेले नाहीत, तर ते लोकांच्या घामाचे पैसे लुबाडून घोटाळा करून जेलमध्ये गेले आहेत. हजारो ठेवीदार, खातेदारांचा तळतळाट अजूनही विवेक पाटलांना लागतोय आणि म्हणूनच त्यांना जामीन मिळत नाही हे त्यांच्या बगलबच्चांनी लक्षात ठेवले पाहिजे, अशा शब्दांत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कानउघडणी केली.
दरम्यान, या वेळी 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन, तर एक कोटी रुपयांच्या निधीतून विचुंबे गावात अंतर्गत गल्लीचे काँक्रीटीकरण, 50 लाख रुपयांच्या निधीतून विचुंबे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, विचुंबे बौद्धवाडा ते ग्रीन व्हॅलीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण आणि विचुंबे पोलीस चौकी ते सारनाथ बुद्धविहार ओमकार पार्कपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले.
या सोहळ्यांना भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, उसर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन भगत, अध्यक्ष के.सी. पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, बळीराम पाटील, रवींद्र भोईर, अविनाश गायकवाड, जगदीश भोईर, डी.के. भोईर, संजित भिंगारकर, तुकाराम भोर्ईर, विवेक भोईर, सदस्य मुकेश भगत, अमित भोर्ईर, भरत पाटील, अप्पा गायकवाड, विभूती सरते, आरती गायकवाड, श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अमित म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, जयश्री म्हात्रे, ज्योती भोईर, स्वाती सुरते, रंजना सुरते, हर्षदा भिंगारकर, बबिता भोईर, सोनम म्हात्रे, निलम भिंगारकर, नविता भोईर, विशाखा सुरते, अक्षता गायकवाड, भावना भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply