वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. अशा आपल्या मराठी माणसाचं भावविश्व समृद्ध केलेल्या वडापावचा २३ ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज पुन्हा एकदा वडापाव खा.
वडापाव आणि फिल्मवाले यांचेही जबरा नातं आहे. मला काही फिल्म दीवाने प्रश्न करतात, तुम्ही मिनर्व्हा चित्रपटगृहात शोले पुन्हा पुन्हा एन्जॉय केलेल्या पिढीतील आहात, तेव्हा वडापाव किती पैशात मिळे…. यावर मी पटकन उत्तर देतो, पन्नास वर्षांपूर्वी वडापाव दहा पैशांत मिळे. आणि विशेष म्हणजे, त्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पिक्चरचे मध्यंतर होताच बाहेर रस्त्यावरही यायला मिळे आणि रस्त्यावरचा लसूण चटनीसह वडापाव मुठीत पकडून पुन्हा आत जाऊन पडद्यावरचा चित्रपट पाहत पाहत तो खात असू. ‘शोले’च्या त्या जबरदस्त क्रेझ असल्याच्या दिवसांत मिनर्व्हा चित्रपटगृहाबाहेर वडापाव विकण्याचा व्यवसाय करणाऱ्याने पाच वर्षांनी स्वतःचे हॉटेल सुरू केले अशी त्या काळात एका इंग्रजी सायं दैनिकात विशेष ‘सक्सेस स्टोरी’ प्रसिद्ध केली आणि आजही ही गोष्ट चवीचवीने सांगितली जाते.
मी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल चित्रपटगृहापासून ताडदेवच्या डायना थियेटरपर्यतच्या कुठेही पिक्चर पाहायला गेलो की मध्यंतर होताच बाहेर रस्त्यावर येऊन वृत्तपत्राच्या कागदात मिळणारा वडापाव आवर्जून खात असे आणि माझ्यासारखे अनेक फिल्म दीवाने हे जणू व्रत असल्यासारखे एन्जॉय करत. रॉक्सी, स्वस्तिक अशा काही चित्रपटगृहातील कॅन्टीनमध्ये वडापाव मिळे, पण तो पंधरा पैसे असे आणि माझ्यासारखे मध्यमवर्गीय विचार करत असे पाच पैसे वाचवले तर काही महिन्यांनी एक रुपया पाच पैसे तिकीटात मॅटीनी शोला एकादा जुना चित्रपट पाहू.
मी मिडीयात आल्यावर गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ऐंशीच्या दशकात असलेल्या कॅन्टीनमध्ये वडापाव खाऊनच मराठी अथवा हिंदी चित्रपटाच्या सेटवर जात असे.
एकदा कपिल शर्मा शोमध्ये जयाप्रदाने सेटवर राजेश खन्नाच्या उशिरा येण्याचा किस्सा रंगवून सांगितला. ती म्हणाली, सकाळी दहा वाजल्यापासून मी मेकअप करून तयार असे. राजेश खन्ना दुपारी चार वाजता स्टुडिओत येई. आल्यावर वडापाव खाई आणि मग चित्रीकरणाला सुरुवात होई. जयाप्रदाने स्वतःच हा अनुभव सांगितला. यावरून मला वाटतं, राजेश खन्ना अनेक वर्षे आमच्या गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरील सरस्वती निवास येथे रहायचा, म्हणून त्याला वडापाव आवडता झाला असेल आणि ती आवड तो कधीच विसरला नाही.
तुम्ही आम्हीदेखील वडापाव खातोय, त्याचे हुकमी चवीचे ‘हॉट स्पॉट’ आपल्यालाही सवयीचे झालेत. जिभेला काही गरमागरम खावसं वाटलं की आपण एकाद्या कॉर्नरचा असो, नाक्यावरचा असो, रस्त्यावरचा असो, शिवसेना शाखेबाहेरचा असो, हॉटेलचा असो आपली पावले आपोआपच तेथे वळतात. मल्टीप्लेक्समधला वडापाव मात्र महाग आहे. सर्वच मल्टीप्लेक्समध्ये तो मिळत नाही. जेथे आहे तेथे दोनशे रुपयांत दोन वडापाव असं आहे. कसा परवडेल?
ते काही असो. वडापाव ही मुंबईची एक ओळख आहे, खाद्य संस्कृतीतील एक हुकमी फंडा आहेच. म्हणून तर ‘ॲपल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक हे आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्याच स्टोअर्सच्या उदघाटनासाठी मुंबईत आले असताना आपल्या माधुरी दीक्षितने त्यांना वांद्रा कुर्ला संकुलातील बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये वडापाव खिलवला याची ब्रेकिंग न्यूज झाली. माधुरी दीक्षित म्हणजे बातमी हे सुपर डुपर हिट समीकरण आहे.मिडीयात ही बातमी फोटोसह हुकमी ठरली. हे श्रेय वडापावचे आणि माधुरीचेही.
पडद्यावरही माधुरी दीक्षितने बटाटा वडा एन्जॉय केलाय. मजा अशी की बटाटा वडा महाराष्ट्रीय, पण गीत संगीत नृत्य साऊथ इंडियन असा अजब मामला रंगला. अर्थात, तुम्हालाही माहित्येय पारंपरिक मसालेदार मनोरंजक लोकप्रिय चित्रपटात केव्हाही/ कधीही/काहीही घडू/बिघडू शकते, त्याच अलिखित नियमानुसार हे गीत संगीत व नृत्य झाले म्हणावे, पण म्हणून काय बटाटा वडा गाणे चक्क साऊथ इंडियन पद्धतीचे असावे? प्रयाग राज दिग्दर्शित ‘हिफाजत’ (१९८७) या चित्रपटात अगदी तस्सेच झाले. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यावरचे बटाटा वडा हे मसालेदार टेस्टी गाणे अगदी तस्सेच आहे. विशेष म्हणजे दक्षिणेकडील तीन चार रुपात ते साकारलयं. आणखी एक विशेष म्हणजे अनिल कपूर या चित्रपटात रामकुमार आणि राजकुमार अशा दुहेरी भूमिकेत आहे, तर माधुरी दीक्षित जानकी या साऊथ इंडियन युवतीच्या भूमिकेत आहे. आता तिला सिनेमात का असेना पण वडापाव हवासा झाला तेव्हा ती मुंबईकर झाली म्हणायचे. त्या दिवसांत ती मुंबईत अंधेरी पूर्वच्या जे.बी. नगर भागात रहायची आणि तेथे वडापाव टेस्टी मिळतो असे तीच त्या दिवसांत आपल्या मुलाखतीत सांगायची.
एखाद्या गोष्टीला किती कनेटीव्हीटी असते बघा. ‘हिफाजत’चे निर्माते ए. सूर्यनारायण हे साऊथ इंडियन असल्याने गाण्यात तसे झाले असावे. दिग्दर्शक प्रयाग राज हे मनमोहन देसाईंच्या चित्रपटाच्या लेखकांपैकी एक होते. मनजींच्या चित्रपटात काय वाट्टेल ती धमाल चालायची, तशीच ती येथेही चालेल असे वाटले असण्याची दाट शक्यता आहे आणि हे गाणे लोकप्रिय झाले आणि त्यामुळेच हा चित्रपट माहिती झाल्याने तर या गाण्याचा हेतू साध्य झाला असेच म्हणावे लागेल. हे गीत मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहिले असून संगीत राहुल देव बर्मनचे संगीत आहे. आशा भोसले आणि एस. बालसुब्रह्मण्यम यांनी ते गायले आहे. येथेही महाराष्ट्रीय आणि साऊथ इंडियन असे जबरा कॉम्बिनेशन आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे तर अशा अनेक गोष्टींची सरमिसळ होतच असते. ती वडापावसारखी टेस्टी हवी.. ती एन्जॉय करायची इतकेच!
वडापावची चटकमटक इतक्यावरच थांबत नाही. एकदा शिल्पा शेट्टी जुन्या मुंबई-पुणे रोडने मुंबईला येत असतानाच तिला खोपोलीतील फेमस वडापाव सेंटर दिसताच तिने गाडी थांबवून गरमागरम वडापावचा मस्त आस्वाद घेतला. हातोहाती मोबाईल कॅमेरा असल्याच्या आजच्या डिजिटल युगात लगेचच या ‘खाद्य क्षणा’चे शूटिंग झाले आणि ती मुंबईत पोहचेपर्यंत ही चक्क वृत्तवाहिन्यांची बातमीही झाली. म्हटलं ना, सेलिब्रिटीजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून न्यूज जन्माला येते (म्हणून आता अनेक सेलिब्रिटीज कुठे कुठे वडापाव खाण्याची आपली रिल्स सोशल मिडियात पोस्टही करतील.) जॉन अब्राहम चित्रपटसृष्टीत नवीन असताना आपण अंधेरीतील जम्बो दर्शन सोसायटीत राहत असताना आपण वडापाव आवर्जून खायचो असे आवर्जून सांगायचा.
…तुम्ही राज कपूर दिग्दर्शित सर्वात तरुण चित्रपट ‘बॉबी’ अनेकदा एन्जॉय केला असेलच. त्यात राजा (ॠषि कपूर) जेव्हा मिसेस ब्रिगेन्झा (दुर्गा खोटे) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेली भेट पाहून त्यांना भेटायला वस्तीत जातो तेव्हा बॉबी (डिंपल कापडिया) दरवाजा उघडते तेव्हा ती किचनमधून आलेली असते आणि तिच्या उजव्या हाताला चणा पीठ लागलेले असते, अशातच त्याच हाताने ती बटा जरा बाजूला सरकवते, तेव्हा तिच्या केसांना तिच्या हाताचे चणा पीठ लागते. (डिंपलची ही मुद्रा मनात फिट्ट बसलीय. या एका दृश्यासाठी ‘बॉबी’ पुन्हा पुन्हा पाहू शकता.) आता चणा पीठ म्हटलं म्हणजे, भजी अथवा बटाटा वडा असू शकतो… नक्की काय ते राज कपूर जाणे, पण हा सीन भारी आहे..
सिनेमा आणि वडापाव हे नाते भन्नाट आहे हो. हिंदी चित्रपटसृष्टीत काही अमहाराष्ट्रायीन स्टार मुंबईतील आवडता पदार्थ म्हणून वडापाव सांगतात, मात्र ते आपलं उगाच बोलतात हे त्यांच्या एक्प्रेशनवरून जाणवते, पण फिल्मी मुलाखतीतील असे अनेक प्रश्न फार सिरीयसली घ्यायचे नसतात.
एकदा आपल्या विजय कदमला लंडनमध्ये वडापाव मिळाल्याची त्याने सोशल मिडियात फोटोसह पोस्ट शेअर केली. तशी वडापावला मुंबई, पुण्यात सर्वाधिक मागणी. विक्री. उलाढाल वगैरे वगैरे. कोणत्या खाऊगल्लीत टेस्टी बटाटा वडा मिळतो याची चवदार माहिती असलेले खादाडे खूपच. आठवणीही खूप.
प्रसाद ओकने आपल्या मराठी चित्रपटांची शंभरी गाठली त्या चित्रपटाचे नाव आहे “वडापाव.” आता वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा, आपलेपण आणि तिखटपणा, थोडासा झणझणीतपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ आहे. ही रूचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन आले. या चित्रपटात प्रसाद ओक पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकले.
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ‘वडापाव’ एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा असाच प्रयत्न या चित्रपटात केला.
एका अतिशय झगमगीत भव्य दिव्य दिमाखदार चित्रपट पुरस्कार सोहळ्यात शाहरूख खान चकचकीत महागड्या दिखाऊ चित्रपटांची तारीफ पे तारीफ करत असताना स्वाभिमानी इरफान खान आपल्या जागेवर उभा राहिला आणि म्हणाला, आपकी फिल्मे फिल्मे होती है, तो क्या ‘लंच बॉक्स’ जैसी हमारी फिल्मे क्या वडापाव होती है? त्याचं म्हणणं ऐकून सभोवार ग्लॅमरस रुपात बसलेल्या चिकन्या चुपड्या अशा मेकअपचा थर असलेले चेहरे ‘बघण्यासारखे’
झाले. असं काही घडेल हे त्यांना अपेक्षित नसणार…
असो. वडापाव आणि फिल्मवाले अशीही एक नातेसंबंधांची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक रंजक गोष्ट. म्हटलं तर नक्कीच जगावेगळी आहे.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper