मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त
फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे पनवेल महापालिका हद्दीतील काही मालमत्ता करधारकांची फसवणूक होऊन त्यांना शास्ती (दंड) लागली होती. अशा प्रकारची शास्ती माफ व्हावी यासाठी आम्ही महापालिका, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांनी ही शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खारघरवासीयांसह पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
पनवेल महापालिकेच्या 84 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 11)आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पनवेलजवळ होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. यातून आपल्या परिसरातील युवकांना रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. विकासाबद्दल तसेच मालमत्ता करावरील शास्ती माफ केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे अभिनंदन केले व आभार मानले.
विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यास महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक, नगरसेविका, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, उपअभियंता विलास चव्हाण, राजेश कर्डिले, इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, प्रभाग क्र. 1 कोयनावेळे व घोट या गावांना जोडणार्या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पूल बांधणे, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान 2.0 पाणीपुरवठा योजनेंतर्गत सिद्धी करवले आणि आडीवली येथे तलाव पुनरूज्जीवन व सुशोभीकरण करणे, मुर्बी येथे 1.75 लक्ष लिटर्स क्षमतेचा उंच जलकुंभ बांधणे व डीआय पाईपची वितरण व्यवस्था करणे, खारघर से. 16 प्लॉट नं 13 येथे खेळाचे मैदान विकसित करणे, से. 15 प्लॉट नं. 25, 25बी येथे विरंगुळा केंद्र बांधकाम करणे, प्लॉट नं. 25, 25बी येथे उद्यान विकसित करणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण सन 2022-23 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हा स्तर) महापालिका क्षेत्रातील विविध तलाव व गार्डन परिसर विद्युत व्यवस्थेसह विकसित करणे, खारघर सेक्टर 5 प्लॉट नं. 10 व 19 येथे उद्यान विकसित करणे, महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या विशेष तरतूद वितरीत निधी अंतर्गत एकूण 64 ठिकाणी सोलार हायमास्ट बसविणे, अमृत अभियान 2.0 पाणीपुरवठा योजनेंतर्गत बेलपाडा येथे 4.80 लक्ष लिटर्स क्षमतेचा उंच जलकुंभ बांधणे व डीआय पाईपची वितरण व्यवस्था करणे, महापालिका क्षेत्रातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर) 2024-25 योजनेंतर्गत विविध उद्यानांचा विकास करणेसाठी नवनवीन साधने उपलब्ध करून देणे, उद्यानांमध्ये मुलांच्या विरंगुळ्यासाठी आधुनिक व आकर्षक साधने उपलब्ध करून देणे, उद्यानांमध्ये कलाकृती निर्मिती करणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याआधी 8 ऑक्टोबर रोजी 302 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला होता.
खारघरमधील शिल्प चौकाजवळील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानात प्लास्टिक बाटली इको ब्रीक पेटीचे उद्घाटन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रिसायकलिंगचे चिन्ह असणार्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा इको ब्रीकमध्ये वापर करता येतो. अशा वापरलेल्या बाटल्यांचे संकलन करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.