Breaking News

लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मिळून सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत 200पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. 6) केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज पुरोहित, कृपाशंकर सिंह, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की , अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपची विचारधारा रूजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाची स्थापना करताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.
या पुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली पाहिजेत. तीन कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा आणि भाजप-शिवसेना युती मिळून लोकसभेच्या सर्व 48 जागा, विधानसभेच्या 200पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असे बावनकुळे यांनी नमूद केले. या वेळी त्यांच्या हस्ते जनसंघापासून काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्याआधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या आयुष्मान भारत सेलतर्फे आयोजित आयुष्मान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाचा प्रारंभही त्यांच्या हस्ते झाला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply