पुणे ः मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याची टीका लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. तातडीचे प्रतिसाद पथक म्हणून एक पथक स्थापन केले आहे. पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे 15 अधिकार्यांची एक स्वतंत्र टीमच यासाठी तयार करण्यात आली आहे. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे 31 किलोमीटर अंतराचे दोन मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट, कृषी महाविद्यालय ते स्वारगेट व वनाज ते सिव्हिल कोर्ट, सिव्हिल कोर्ट ते रामवाडी असे या दोन्ही मार्गांचे चार भाग तयार केले आहेत. त्यातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या पाच किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे, मात्र वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट, सिव्हिल कोर्ट ते रामवाडी या तिन्ही मार्गांचे काम जोरात सुरू आहे. याच तीन मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
भारतीयांना सहज मिळणार ग्रीन कार्ड
वॉशिंग्टन ः अमेरिकेच्या सिनेटने ग्रीन कार्ड जारी करण्यासंदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातील हुशार आयटीयन्सना फायदा होणार आहे. अमेरिकेत स्थायिक होऊन नोकरीधंदा करायचा असेल, तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते. अमेरिकेने मंजूर केलेल्या या विधेयकामुळे प्रतिभावान आयटीयन्सना अमेरिकेत राहून काम करता येणार आहे. फेअरनेस ऑफ हाय स्कील इमिग्रेंट्स अॅक्ट 2019 किंवा एचआर 1044 नावाचे हे विधेयक 435 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये 365 मतांनी पारित झाले आहे, तर या विधेयकाच्या विरोधात 65 मते पडली आहेत. एप्रिल 2018पर्यंत अमेरिकेतील टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तीन लाख भारतीय असे आहेत की जे ग्रीन कार्डची वाट पाहताहेत. अमेरिकी सिनेटने प्रत्येक वर्षी सर्वच देशांतील सात टक्के ग्रीन कार्ड जारी करण्याची सीमा संपवली आहे. आता सहजरीत्या अमेरिकेत ग्रीन कार्ड धारण केलेल्या लोकांना स्थायी स्वरूपात राहणे आणि काम करण्याची परवानगी मिळणार आहे. बर्याच काळापासून जे लोक अमेरिकेत कायद्याने राहू इच्छितात, त्यांना आता दिलासा मिळणार आहे.