माधुरी दीक्षितला आम्ही सिनेपत्रकारांनी सर्वाधिक वेळा विचारलेला प्रश्न कोणता?
एन. चंद्रा दिग्दर्शित तेजाब (1988)मधील एक दो तीन चार या तजेलदार तडफदार उत्फूर्त गीत संगीत नृत्यात तुला आव्हानात्मक काय वाटले हा प्रश्न की सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित हम आपके है कौन (1994)च्या सेटवरील कौटुंबिक खेळकर खोडकर वातावरणातील आठवणीतील क्षण कोणता? हे प्रश्न केले असतील की सुभाष घई दिग्दर्शित खलनायक (1993) चोली के पीछे क्या है या मसालेदार मनोरंजक गाण्याच्या उलटसुलट चर्चेच्या वादळात स्वत:ला गप्प ठेवण्यात यश कसे मिळवले हा प्रश्न असेल? यापैकी काहीच नाही.
यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिल तो पागल है’ 1997च्या दिवाळीत प्रदर्शित होत असतानाच आम्ही सिनेपत्रकार माधुरी दीक्षितच्या मुलाखतीचा योग आला असता, तू लग्न कधी करणार? असा प्रश्न करीत होतो. इंग्लिश गॉसिप्स मॅगझिन असो, हिंदी फिल्मी साप्ताहिके असो अथवा मराठी दैनिकातील मनोरंजन पुरवणी असो, माधुरीला लग्नाबद्दल प्रश्न ठरलेलाच. लग्न ही सगळ्यांचीच खासगी गोष्ट, पण नटीचे लग्न ही गोष्ट कोणत्याही काळात रंजकच राहिलीय. जणू महत्त्वाची बातमीच. माधुरीदेखील या प्रश्नावर उत्तर देताना, नेहमीप्रमाणेच हसत हसत म्हणायची, वेळ आली की समजेलच वा सांगेनच. माधुरीचं मी एक वैशिष्ट्य कायमच पाहिलयं अडचणीचे प्रश्न असोत, वादग्रस्त मुद्दा असो, ती उत्तर टाळणारच. आपल्या बोलण्यातून आणखी काही वाद विवाद जन्माला येऊ नयेत याकडे तिचा कल. काही झालं तरी ती संस्कारी आणि जबाबदारीची जाणीव असलेली सुपरस्टार.
ते काही असो, माधुरी दीक्षित लग्न कधी करणार याची तिचे जगभरातील चाहते, चित्रपटसृष्टी आणि चित्रपट प्रसारमाध्यमे अशी सगळीकडेच उत्सुकता होती. अशातच 1999च्या पहिल्या तिमाहीत तिने आपल्या पहिल्या हिरेन नाग दिग्दर्शित अबोध (1984) या चित्रपटापासूनच्या दिग्दर्शकांना जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शानदार पार्टी दिली तेव्हा अनेकांना वाटले, माधुरी लवकरच लग्न करणार असे दिसते. (आणि लग्न झाल्यावर चित्रपटसृष्टीला रामराम करणार की काय? नटीच्या लग्नातील जोड प्रश्न) मग तो भाग्यवान कोण बरे? तिचा होणारा पती चित्रपटसृष्टीतील असणार की अन्य क्षेत्रातील? मुंबईतील की भारताबाहेरील असे अनेक प्रश्न एकावर एक पडायला लागले. त्यात भर पडली तिने काही महिन्यातच आपल्या वाढदिवसानिमित्त (15 मे) मुंबईतील आम्हा निवडक सिनेपत्रकारांना जुहूच्या त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये चायनीज जेवणाची शानदार पार्टी दिली. सर्व खुर्च्याना पांढर्या शुभ्र कपड्यांनी छान सजवले होते हे आजही डोळ्यासमोर आहे. आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराचे तिने छान हसून स्वागत केले. तिच्या ज्या हास्यावर करोडो रसिक फिदा आहेत तेच दिलखुलास निखळ हास्य आपलं स्वागत करतेय, नशीबात आणखी काय हवे? अर्थात मी मीडियात असल्यानेच असे अनेक सुवर्ण क्षण अनुभवले. या पार्टीत माधुरी चक्क गायली. हा अनुभव तर एक्स्युझिव्हज आणि ही पार्टी तिच्या वाढदिवसानिमित्त असली तरी तिच्या लग्नाचा प्रश्न आलाच. तीदेखील हसून उत्तर देत होती तरी लक्षात येत होते की, त्या दिशेने ती चाललीय. उत्तर हवे होते, पण कोणाशी लग्न?
काही दिवसांनी माधुरी अमेरिकेत भावाकडे गेल्याचे समजले. सगळेच आपापल्या कामात बिझी झाले. चित्रपटसृष्टी कोणासाठी थांबणारी नाही. त्यामुळेच अनेक गोष्टी मागे पडत जातात आणि अशातच 5 नोव्हेंबर 1999 रोजी आज तक या उपग्रह वृत्तवाहिनीवर बातमी आली,
माधुरी दीक्षित ने 17 ऑक्टोबर 1999 को अमेरिका मे डॉ. श्रीराम नेने के साथ शादी रचाई… ही बातमी इतकी आणि अशी अनपेक्षित आणि धक्कादायक होती की नेमके काहीच लक्षात येईना. बरं ही बातमी तिचा स्टार सेक्रेटरी रिक्कू यानेच आज तक वाहिनीला दिली होती. (त्यात काळात दररोज रात्री साडेनऊ ते दहा या वेळेत आज तक उपग्रह वाहिनीवर बातम्या असत. त्या बातम्यांची विश्वासार्हता होती. या वाहिनीचा
स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग होता)
आता प्रश्न होता, माधुरी दीक्षितचा नवरा दिसतो कसा? माधुरी अमेरिकेवरुन कधी येणार? तिने अमेरिकेत लॉस एन्जल्स, दक्षिण कॅलिफोर्नियातील आपल्या मोठ्या भावाच्या घरी पारंपरिक पद्धतीनुसार लग्न केल्याचे समजले. बाकीच्या तपशीलांचे काय? सोशल मीडिया यायच्या अगोदरचा हा काळ होता. मोबाईल नवीनच होता. अमेरिका लांबच वाटत होती.
आणखी काही दिवस गेले. डॉ. श्रीराम नेने कसे दिसतात याची उत्सुकता विलक्षण ताणली जात होती. काही झाले तरी ते सुपरस्टार अभिनेत्रीचे पती आणि आपल्या समाजात नवदाम्पत्याबद्दल कायमच कुतूहल.
…आणि अशातच बातमी आली. माधुरी दीक्षित आपल्या पतीसोबत मुंबईत परतली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या लग्नाचे शानदार रिसेप्शन आहे. आता डॉ. श्रीराम नेनेंबद्दलची उत्सुकता विलक्षण वाढलेली. नटीचा नवरा या नावाचा अद्याप चित्रपट निर्माण झाला नसला तरी हा प्लॉट भारी आहे.
…अखेर तो दिवस (खरंतर संध्याकाळ) उजाडला. अंधेरी पश्चिमेकडील द क्लब येथे डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित यांच्या लग्नाचा शानदार स्वागत सोहळा अर्थात रिसेप्शन. आज तक वाहिनीने काही मिनिटांचे दाखवलेले लाईव्ह कव्हरेज भन्नाट ठरले. माधुरी दीक्षितचा पती तिच्या अगणित चाहत्यांना दिसण्याचा हा पहिलाच सुखद योग होता. दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर या नवदाम्पत्याचा छानसा चार कॉलम फोटो. दिसला गं बाई दिसला, माधुरी दीक्षितचा नवरा दिसला अशी छानशी प्रतिक्रियाही उमटली.
लोकल ट्रेनपासून ऑफिसमधील कॅन्टीनपर्यंत आणि इराणी हॉटेलपासून कॉलेज कट्टापर्यंत सगळीकडेच या नवदाम्पत्याबद्दल सकारात्मक चर्चा. कोणी कोणी म्हटलंही आपली माधुरी दीक्षितच सरस. खरंच आहे म्हणा.
लग्नानंतर काही चित्रपट पूर्ण होताच माधुरी अमेरिकेत गेलीदेखील. आता ती डेन्वरची रहिवासी होती. चित्रपटसृष्टी कोणासाठी थांबत नाही. पिक्चर हिट व फ्लॉपचा खेळ सुरूच असतो. नवीन दशकाची सुरुवात झाली होती. माधुरी आपली मुले अरिन (आज तो एकवीस वर्षांचा आहे) आणि रायन (आज तो एकोणीस वर्षांचा आहे) यांच्या पालनपोषणात रमली असतानाच 2011च्या ऑक्टोबरमध्ये ती आपले पती डॉ. श्रीराम नेने आणि दोन्ही मुलांसह मुंबईत आली ती पुन्हा कॅमेर्यासमोर उभी राहिली. दरम्यान एकदा येऊन तिने यशराज फिल्मच्या आजा नचले या चित्रपटात नृत्यप्रधान भूमिका साकारली, पण त्यात रंजकता नव्हती, परंतु पुन्हा आल्यावर ती आपला फिटनेस, आपलं नृत्य, आपलं ग्लॅमर, आपली लोकप्रियता, आपली व्यावसायिकता, आपले व्यावसायिक संबंध या सगळ्यांची बेरीज करून तिने पुन्हा मनोरंजन क्षेत्रातील आपली जागा पटकावली. आपल्या अष्टपैलू, मेहनती कारकिर्दीतील चाळीसाव्या वर्षीदेखील ती आजचीच तारका आहे, तर मग आणखी काय हवे? डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियात कार्यरत आहेत. आपण इराणी हॉटेलमधून खारी बिस्किटे घेतली अशा काही पोस्ट त्या टाकत असतात. वरळीतील एका अतिशय प्रशस्त घरात आता हे कुटुंब आनंदात राहतेय. माधुरी दीक्षित यू ट्यूब चॅनेलवरून जगभरातील अनेकांना नृत्याचे धडे शिकवतेय. सोशल मीडियाच्या युगात आपण वावरतोय याचे तिने पक्के
भान ठेवलेय.
लग्नानंतर पंचवीस वर्षांत माधुरी दीक्षितने संसार, संस्कार, अभिनेत्रीपण आणि लोकप्रियता या गुणांची बेरीज छान जपलीय. माधुरी दीक्षितने मराठी समाजाची सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून आपली ओळख छान जपलीय. संसारात कुरबुरी झाल्या असतीलही, पण त्या गॉसिप्स मॅगझिनमधून चवीने चघळल्या गेल्या नाहीत. अभिनेत्रीपण आणि घर यांचा समतोल छान साधलाय. तेच तर तिच्या यशाचे गमक आहे. आणि चित्रपटसृष्टीत यश हेच चलनी नाणे असते तर मग आणखी काय हवे?
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक