पेण दवणसर येथे गोशाळेचे नुकसान
दोन गायी दगावल्या, एक बेपत्ता
पेण : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने पेण तालुक्यात थैमान घातल्यानंतर या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचा सामना करणार्या जनतेला वादळी पावसाने हतबल केले आहे. या वादळात दवणसर येथील जगन्नाथ ठाकूर यांच्या श्री समर्थ कृपा गोशाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जगन्नाथ ठाकूर यांच्या श्री समर्थ कृपा गोशाळेत मोकाट फिरणारे बैल, गाय अशी अनेक जनावरे ठेवून त्यांची देखभाल केली जाते. ठाकूर यांनी लाखो रुपये खर्च करून सुसज्ज पद्धतीची गोशाळा बांधली आहे. निसर्ग चक्रीवादळात गोशाळेतील दोन गायींचा मृत्यू झाला असून, एक गाय गोठ्यातून बेपत्ता झाली आह, तर पत्र्यांसह शेड मोडकळीस आली आहे. त्याचप्रमाणे गाईंचे खाद्य, कडबा-कुट्टी, पेंढा, तसेच गुरांची औषधे, टीव्ही, फ्रीज यांचे एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे ठाकूर यांचे म्हणणे आहे.
नुकसानग्रस्त गोशाळेला राज्य शासनाने मदत करावी, अशी विनंती ठाकूर यांनी तहसीलदारांकडे केली असून, दानशूर व्यक्तींनीही आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीत 22 लाखांचे नुकसान
नागोठणे : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाचा नागोठणे विभागातील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आणि आंबेघर या दोन्ही गावांना फटका बसून 90 घरांचे तसेच सरकारी मालकीच्या अनेक वास्तूंचे नुकसान झाले असल्याचे सरपंच संतोष कोळी यांनी सांगितले.
वेलशेत तलाठी सजा यांच्याकडून 90 घरांचा पंचनामा करण्यात आला असून, 12 लाखांचे नुकसान झाले आहे, तर ग्रामपंचायत आणि सरकारी मालकीच्या स्मशानभूमी, शॉपिंग सेंटर, व्यायामशाळा, प्राथमिक माध्यमिक शाळा, पंप हाऊस शेड, बौद्ध विहार शेड, ग्रामपंचायत कार्यालय, वेलशेत हनुमान मंदिर सभागृह, आंबेघर गावदेवी सभागृह, समाजमंदिर यांचेसुद्धा पत्रे, कौले तसेच शेड उद्ध्वस्त झाल्या असून, 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सरपंच कोळी आणि उपसरपंच सखाराम घासे यांनी सांगितले, मात्र यांचा पंचनामे होणे बाकी असल्याने संबंधित बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष या वादळात भुईसपाट झाले आहेत. यातील काही वृक्ष जलवाहिन्यांवर कोसळल्याने जलवाहिनीला फटका बसून त्या फुटल्या आहेत, परंतु त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील दोन्ही गावांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. नागोठणे महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांच्या प्रयत्नातून वादळानंतर चौथ्या दिवशीच आंबेघर आणि वेलशेत या दोन्ही गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.