काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा एक प्रकारचा ’खेळ’ कायम अधोरेखित होत असतोच. सामना चित्रपट अस्साच. हा चित्रपट म्हणताच रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर बरेच काही आले असेल.
पुणे शहरात रामदास फुटाणे निर्मित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ 10 जानेवारी 1975 रोजी प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला (ही महत्त्वाची तारीख या चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांजकडून) या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. कालखंड खूपच मोठा. त्यात सामनाचा प्रवासही खूपच मोठा व वळणावळणाचा.
’सामना’ निर्मितीची सुरुवात अशी, कोल्हापुरात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या हस्ते फटमार, अभिनेते चंद्रकांत मांढरे यांच्या हस्ते फुटलेला मुहूर्ताचा नारळ आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅमेर्यामागे राहून केलेले पहिल्या दृश्याचे चित्रीकरण… एक अद्भुत योग… 20 जानेवारी 1974 रोजी सामनाचा मुहूर्त झाला… (तत्कालिन) ग्रामीण भागातील राजकारणावर विजय तेंडुलकर यांच्या सशक्त प्रभावी लेखणीतून साकारलेले टोकदार भाष्य… डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या जबरदस्त अभिनयाचा ‘सामना’… 378 रुपये पगार असलेले चित्रकला शिक्षक रामदास फुटाणे यांचे निर्माता आणि डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत (दृश्य माध्यमात) झालेले पदार्पण… भास्कर चंदावरकर यांच्या संगीताने नटलेली गीते… जी आजही लोकप्रिय आहेत. तीही या कलाकृतीची ओळख.
या चित्रपटासंदर्भात एकदा डॉ. श्रीराम लागू यांनी केलेले भाष्य खूपच बोलके आहे. ते म्हणाले होते, ’सामना’ हा संवेदनशील आणि मोठा आवाका असलेला चित्रपट आहे. सुरुवातीला आम्ही आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. फार महत्त्वाच्या चित्रपटामध्ये काम करायला अपुरा पडलो असे वाटते. मला स्वीकारले याबद्दल मी रसिकांचा आभारी आहे, अशी भावना डॉ. श्रीराम लागू यांनी व्यक्त केली. निळूभाऊ फुले या माणसाची महाराष्ट्राने म्हणावी तेवढी कदर केली नाही, असेही त्यांनी म्हटले.
विजय तेंडुलकर यांची लेखक म्हणून केलेली निवड यामध्येच चित्रपटाचे यश निश्चित होते, असे एकदा रामदास फुटाणे यांनी सांगितले. ‘सोंगाड्या’ (1971) चित्रपटाच्या वेळी दादा कोंडके यांच्याकडे प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून केलेल्या कामाचा निर्माता म्हणून फायदा झाला. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट झाला, पण तेही जमा करताना कष्ट पडले. बर्लिन चित्रपटासाठी निवड झाल्यानंतर तेथे जाण्यासाठी एका दिवसामध्ये झालेला पासपोर्ट आणि 67 हजार रुपयांवरून 27 हजार रुपयांपर्यंत कमी झालेले विमानभाडे हा किस्साही रामदास फुटाणे यांनी एकदा मला सांगितला. आजही ‘सामना’चा विषय निघाला की रामदास फुटाणे अतिशय भरभरून बोलतात. हा त्यांना एक ओळख मिळवून देणारा ठरलाय.
रामदास फुटाणे यांनी नेहमीच आवर्जून सांगितलेय, ‘सामना’ची निर्मिती माझ्या हातून घडायला निमित्त झालं ते दादा कोंडके यांचं. ‘सोंगाड्या’च्या निर्मितीच्या वेळी दादांनी मला कोल्हापुरात बोलावून घेतलं होतं. त्या वेळी मी मुंबईच्या एका विद्यालयात चित्रकलेचा शिक्षक होतो. चित्रकला शिक्षक असतानाच दादांशी मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीपोटी ते म्हणाले, की नोकरी सोडा आणि प्रॉडक्शन पाहा. मी नोकरी सोडली नाही, पण दादांसोबत कोल्हापुराला गेलो. महिन्याला दहा दिवस रजा घेऊन मी ‘सोंगाड्या’चं प्रॉडक्शन (निर्मिती व्यवस्थापन) पहायचो. सदिच्छा चित्र हे दादा कोंडके यांचे चित्रपट निर्मिती बॅनर. ‘सोंगाड्या’ प्रदर्शित झाल्यावर (तेव्हा तो एक लाखात केला होता. स्वस्ताई होती खूपच, 1970/71ची गोष्ट ही) ‘एकटा जीव सदाशिव’ही (1972) केला होता. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते. त्यानंतर गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित ‘हर्या नार्या झिंदाबाद’ (1972) हा एक सिनेमा केला. वसंत सबनीसांनी लिहिला होता. शुभं करोती चित्रच्या या चित्रपटाचेही प्रॉडक्शन मी केलं होतं. निळू फुले, सरला येवलेकर व राम नगरकर यांच्या भूमिका होत्या.
या एकूणच अनुभवातून या धंद्यात सिनेमा काढण्यासाठी किती पैसे लागतात, कोणत्या डिपार्टमेंटला किती खर्च येतो याचा एक आराखडा मनात निश्चित होता आणि काय काय करायचं नाही हे नक्की केलं होतं. रामदास फुटाणे ‘सामना’ निर्मितीच्या आठवणीत रमतात.
विजय तेंडुलकर यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा, एखादा चित्रपट लिहून द्या अशी मागणी त्यांच्याकडं केली. सहा महिने त्याचा पाठपुरावा करत होतो. ते तयार झाले तेव्हा त्यांनी एक आग्रह धरला. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू हे दोन अभिनेते चित्रपटात असायला हवेत. मी तो मान्य केला. त्या दोघांनाच केंद्रस्थानी ठेवून तेंडुलकर यांनी ’सामना’ लिहिला. चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले, तेव्हा निळू फुलेंना डॉ. लागू बारकाईने न्याहाळत होते. त्यांनी उभे केलेल्या पात्रापेक्षा वेगळे काहीतरी करायला हवे, असा डॉ. लागूंचा विचार होता. झालेही तसेच. दोन्ही कलावंतांनी परस्पर भिन्न पात्रे साकारुन चित्रपटाच्या संहितेला न्याय दिला. तेव्हा अभिनेते म्हणून ही दोन्ही माणसे विलक्षण होती. याची
प्रचिती आली.
’सामना’ पुणे आणि मुंबईतील काही भाग वगळता अक्षरश: फ्लॉप झाला. समिक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. तरी चित्रपट रसिकांना फारसा आवडला नव्हता. या पडद्यावर चित्रपट सुरू असतानाच डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांची दृश्ये सुरू असताना लोक झोपतात, अशा प्रतिक्रिया दुर्दैवाने आम्हाला येत होत्या, असे रामदास फुटाणे सांगतात तेव्हा फारच आश्चर्य वाटते. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हीदेखील एक गोष्ट लक्षात येते.
रामदास फुटाणे सांगतात, चित्रपटाची ही परिस्थिती असतानाच अचानक सामनाची बर्लिनच्या चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याची बातमी रेडिओ आकाशवाणीद्वारे आमच्यापर्यंत आली आणि त्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही बर्लिनला जाऊ शकलो. त्यांच्यामुळे घडलेला हा पहिला दौरा कधीच विसरू शकणार नाही. नवी दिल्लीत यासाठीचा खेळ आयोजित करण्यात नर्गिस दत्त यांचे सहकार्य मिळाले होते. बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखल झालेला हा पहिला मराठी चित्रपट,’ अशा भावना व्यक्त रामदास फुटाणे यांनी आठवणींना उजाळा दिला होता.
सामना चित्रपटगृहात अपयशी ठरूनही तो बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात निवडला गेल्याची बातमी आली. लागलीच डॉ. लागूंचे घर गाठले आणि निधीसाठी त्यांना मंत्रालयात येण्याची विनंती केली. कोणासमोर कधीही हात न पसरलेल्या डॉ. लागूंनी त्या दिवशी सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा करून निधीची व्यवस्था केली आणि आमचा परदेश दौरा निश्चित झाला, अशी आठवणीही फुटाणे यांनी सांगितली होती.
तेंडुलकरांनी या सिनेमाचं नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असं दिलं होतं, मात्र हे नाटकाचं शीर्षक वाटत होतं आणि ते खरेही होते. अनेकांना ते पटलं नव्हतं. तेंडुलकरांना मग आम्ही ते बदलण्याची विनंती केली. नंतर आठ-दहा दिवसांनी त्यांनीच ‘सामना’ हे शीर्षक ठेवलं. मग आम्ही भास्कर चंदावरकरांच्या घरीच बसलो. तेंडुलकरांनी अप्रतिम वाचन केलं. माझ्या तर डोळ्यांत पाणी आलं ते ऐकताना! सिनेमाच्या मुहूर्तासाठी आम्ही कोल्हापुरात गेलो. भालजींना (पेंढारकर) भेटलो. त्यांच्या हस्ते मुहूर्त व्हावा, असं वाटत होतं, पण त्याच वेळी लता मंगेशकर कोल्हापुरात होत्या, असं भालजींनी सांगितलं. मग त्यांना भेटलो. त्यांनी होकार दिला. मग त्यांच्या अन् चंद्रकांत मांडरेंच्या उपस्थितीत ‘सामना’च्या मुहूर्ताचा नारळ फुटला… मुहूर्ताचा शॉट निळू फुलेंवर होता. त्यांनी त्यांच्या त्या खास खर्जातल्या आवाजात ते ‘जगदंब… जगदंब…’ म्हटलं अन् ‘सामना’ सुरू झाला!
सामना चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरात प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा जेमतेम थिएटर भाडयाचे पैसे मिळाले. त्यानंतर सांगली शहरातील आनंद व पंढरपूर येथील अकबर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. 14 फेब्रुवारी रोजी मुंबईत गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह आणि गोरेगाव येथील अनुपम चित्रपटगृहात सामना प्रदर्शित झाला. (याच शुक्रवारी मुंबईत गुलजार दिग्दर्शित आंधी प्रदर्शित झाला.) मुंबईमध्येही 30 हजार
रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत सामना प्रदर्शित करताना वृत्तपत्राच्या जाहिरातीत म्हटले होते, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवालसारखी प्रक्षोभक नाटके देणार्या विजय तेंडुलकरांच्या लेखणीचा नवा मराठी चित्रावतार. (ही जाहिरात आणि सामनाचे बुकलेट माझ्या कलेक्शनमध्ये आहे हे विशेषच.)
19 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित करण्यात आली व सामना, आंधी इत्यादी काही चित्रपटांचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले. मत स्वातंत्र्याची गळचेपी असे यावर आजही म्हटले जाते. हा एक वेगळाच ’सामना’. एकोणीस महिन्यांनंतर आणीबाणी उठल्यावर देशातील लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे सरकार आले आणि सामना, आंधी इत्यादी चित्रपटांचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. ‘सामना’चे मूळ वितरक टेम्पल मुव्हीज प्रकाशनकडून सामनाचे हक्क रामदास फुटाणे यांजकडे आले. त्यांनी तोपर्यंत सर्वाचे देणे फेडले होते. बर्लिन महोत्सवानंतर हा चित्रपट एकदम चर्चेत आला आणि यशस्वी झाला. आता सामना चित्रपट हा रामदास फुटाणे यांच्यासाठी निवृत्तिवेतन म्हणजे पेन्शनची रक्कम देणारा ठरला. त्यांनी 8 एप्रिल 1977 रोजी मुंबईत प्लाझा चित्रपटगृहात रोज चार खेळ असा सामना पुन्हा प्रदर्शित करताच आठवड्यातील सर्वच्या सर्व अठ्ठावीस खेळ हाऊसफुल्ल ठरले. चित्रपटाच्या जगात यश म्हणजेच चलनी नाणे. असा हाऊसफुल्ल चित्रपट आपल्याही चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायलाच हवा असे चित्रपटगृह प्रदर्शकांना वाटणे अगदी स्वाभाविकच. (ही तर दीर्घकालीन व्यावहारिक मानसिकता) रामदास फुटाणे यांनी मात्र चित्रपटगृह चालकांशी करारमदार करताना आपल्या काही व्यावहारिक अटी/शर्ती ठेवल्या आणि त्या मान्यदेखील झाल्या.
‘सामना’ आता राज्यातील अनेक शहरात, तालुक्याच्या ठिकाणी एकेक करत प्रदर्शित होत राहिला. मी स्वतः अलिबागमधील महेश चित्रपटगृहात पाहिला (आता त्याजागी ब्रह्मा विष्णु महेश अशी जुळी थिएटर्स उभी राहिलीत.) ते माझे शालेय वय होते. त्या काळातील मार्मिक, रसरंग, प्रभंजन, मनोहर, सोबत अशा साप्ताहिकता 1975 साली ‘सामना’चे परीक्षण वाचले, त्यानंतर त्यावरील बंदीवरचा फोकस समजला आणि 1977 साली सामना पुन्हा प्रदर्शित होत असल्याचे समजले आणि सामना चित्रपट पाह्यलाच हवा याबाबत माझी उत्सुकता वाढली. 1975 ते 1977 या कालखंडात सर्वच वयोगटातील चित्रपट रसिकांची अशीच भावना असेल. आज साठी ओलांडलेले जुन्या आठवणीत गेलेही असतील. चित्रपटाकडे आपण जाण्याचीही एक प्रक्रिया असतेच. ती सामनासारख्या चित्रपटांच्या बाबतीत महत्त्वाची असते.
सामना चित्रपट म्हणजे, ग्रामीण भागातील राजकारणावर विजय तेंडुलकर यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेले भाष्य अशी मुहूर्तापासूनच चर्चा होऊ लागली होती. त्या काळात असे होत असे. मुद्रित माध्यमातून चित्रपट मुहूर्ताच्या बातम्या फोटोसह येत. मग गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले. चार रिळांचे शूटिंग झाले. आणखी एक चित्रीकरण सत्र पार पडले असे करत करत चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत असे. ‘सामना’चे चित्रीकरण कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ व शालिनी स्टुडिओत झाले.
डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या कसदार अभिनयाचा ‘सामना’ असं हा आजही तेच म्हटले जाते. रामदास फुटाणे यांचे निर्माता आणि डॉ. जब्बार पटेल यांचे
दिग्दर्शक म्हणून चित्रसृष्टीत झालेले पदार्पण हेही ’सामना’चे वैशिष्ट्य. ’मारुती कांबळेचं काय झालं’ या रोखठोक संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी अशी वैशिष्ट्य. हा कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळातील, मग दूरदर्शन, चॅनेल, यू ट्यूब चॅनेल आणि एखाद्या चित्रपट महोत्सवात अधूनमधून त्याचा शो असा या चित्रपटाचा प्रवास सुरू आहे.
सत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहकारी साखर कारखानदारी आणि त्यातूनच निर्माण होत असलेले महत्त्वाकांक्षी स्थानिक नेतृत्व असा सामाजिक राजकीय बदल होत होता. तोपर्यंत मराठी चित्रपटात गावातील ’पाटील’ दिसे. ’सामना’ने त्यात बदल घडवून आणला. त्याची गरज होतीच. सहकारसम्राट धोंडे-पाटील यांच्या भूमिकेत निळू फुले (त्यांची तोपर्यंतची वाटचाल पाहता अशी व्यक्तिरेखा त्यांना मिळणे आवश्यक होतेच.) आणि गांधीवादी मास्तरांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू असा हा अभिनयाचा कसदार ’सामना’ रंगला. अभिनयासाठी हा आदर्श चित्रपट आहे. कधीही पहावा.
एका मुलाखतीत डॉ. श्रीराम लागू यांनी ’सामना’च्या आठवणी जाग्या करीत म्हटलं, हा संवेदनशील आणि मोठा आवाका असलेला चित्रपट होता आणि आहे. अगदी कायमच तसा राहिल. सुरुवातीला आम्ही म्हणजेच निर्माता, दिग्दर्शक व कलाकार यांनी आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. फार महत्त्वाच्या चित्रपटामध्ये काम करायला अपुरा पडलो असेही मला वाटते. मला स्वीकारले याबद्दल मी रसिकांचा आभारी आहे. निळूभाऊ फुले या माणसाची महाराष्ट्राने म्हणावी तेवढी कदर केली नाही, असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
निर्माते रामदास फुटाणे अधूनमधून संवाद असतो. ते एकदा मला म्हणाले होते, सामना या चित्रपटासाठी विजय तेंडुलकर यांची लेखक म्हणून केलेली निवड यामध्येच चित्रपटाचे यश निश्चित होते. नाटक असो वा चित्रपट, दोन्हीत लेखक खूपच महत्त्वाचा असतो. सोंगाड्या चित्रपटाच्या वेळी दादा कोंडके यांच्याकडे प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून केलेल्या कामाचा निर्माता म्हणून फायदा झाला. त्या वेळी अवघ्या लाख दीड लाख रुपयांत चित्रपट झाला, पण तेही जमा करताना कष्ट पडले.
असो. ‘सामना’च्या फर्स्ट रनच्या नुकसानीतून सर्वाचे देणे फिटल्यानंतर दोन वर्षांनी चित्रपटाचे हक्क रामदास फुटाणेंकडे आले. बर्लिन महोत्सवानंतर या चित्रपटाची वारेमाप चर्चा झाल्यावर हा चित्रपट यशस्वी झाला. आणीबाणीतील या चित्रपटावरची बंदीही तोपर्यंत उठली होती आणि पुन्हा चित्रपट प्रदर्शित केला. आता सामना चित्रपट हा माझ्यासाठी निवृत्तिवेतन म्हणजे पेन्शनची रक्कम देणारा ठरला असल्याचे रामदास फुटाणे नेहमीच सांगतात.
सामना चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण आहे. अनेक कारणास्तव हा चित्रपट चर्चेत राहिला आणि आजही त्याची चर्चा होत असते. गिरीराज पिक्चर्सच्या या चित्रपटाने राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली.
विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणार्या या चित्रपटाला अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘सामना’ला उत्कृष्ट मराठी चित्रपट रजत कमळ पुरस्काराने गौरविण्यात आले. तेराव्या राज्य चित्रपट महोत्सवात (1975) ‘सामना’ला उत्कृष्ट चित्रपट व्दितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले. त्यासह उत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक डॉ. जब्बार पटेल, उत्कृष्ट अभिनेता निळू फुले, उत्कृष्ट कथा विजय तेंडुलकर, उत्कृष्ट छायाचित्रणकार सूर्यकांत लवंदे आणि उत्कृष्ट ध्वनिमुद्रक रामनाथ जठार अशी पारितोषिके पटकावली.
डॉ. जब्बार पटेल प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते, ’सामना’व्दारे ते चित्रपट माध्यमात आले, तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गानबोटे हे होते. बर्लिन महोत्सवात भारताची प्रवेशिका म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट.
या चित्रपटात विलास रकटे, मोहन आगाशे, लालन सारंग, उषा नाईक, संजीवनी बिडकर, स्मिता पाटील, आशा पाटील, रजनी चव्हाण, सुरेखा शहा, आबू, भालचंद्र कुलकर्णी, नंदू पोळ इत्यादी कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पन्नास वर्षांनंतरही आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच कौतुकाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरू असतेच. या चित्रपटाची गीते आरती प्रभू, जगदीश खेबूडकर यांची असून भास्कर चंदावरकर यांचे संगीत आहे. या चित्रपटातील कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, सख्या रे घायाळ मी हरिणी, कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय (या गाण्यात स्मिता पाटीलचे दर्शन घडते) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण सूर्यकांत लवंदे यांचे, तर संकलन एन.एस. वैद्य यांचे आहे. आजही सोशल मीडियात सामना या चित्रपटाची अनेक संदर्भात दखल घेतली जाते. ’सामना’नंतरचा डॉ. जब्बार पटेल यांचा चित्रपट कोणता असेल याची मराठी चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे आणि चित्रपट रसिकांत विशेष उत्सुकता होतीच. तो चित्रपट होता सिंहासन.
’सिंहासन’मध्ये सत्तरच्या दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट मांडला होता. सत्तेच्या वर्तुळातील महत्त्वाकांक्षा व स्पर्धा, मंत्रिमंडळातील सत्ताचक्र, त्यातील डावपेच, मुंबईतील कामगारवर्गाचा नेता आणि मुख्यमंत्री यांच्यातील छुपा तर कधी उघड संघर्ष, कुरघोडीचे राजकारण आणि या सगळ्यावर राजकीय पत्रकार दिगू टिपणीस याचे निरीक्षण, भाष्य व विश्लेषण. आणि सगळा डाव-प्रतिडाव अनुभवल्यावर दिगू टिपणीस सैरभैर होणे, विक्षिप्त हसत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो.
सामना चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ही खूपच मोठी सामाजिक, सांस्कृतिक व माध्यम क्षेत्रातील गोष्ट. या काळात चित्रपट बदलला, प्रेक्षक बदलला, प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचण्याची माध्यमे बदलली, राज्यातील ग्रामीण भागातील राजकारणातील संदर्भ बदलले, मानसिकता बदलली. सामना चित्रपटाची ताकद व वैशिष्ट्ये कायम राहिली.
सामना चित्रपटाला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 2014 साली पुणे शहरात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी चित्रपटविषयक परिसंवादात सामना चित्रपटाचा कायमच उल्लेख होतो. मराठीतील राजकीय चित्रपटातही सामनाचा संदर्भ असतो. आणीबाणीतील सांस्कृतिक क्षेत्रावरील बंदी या गोष्टीतही सामना असतोच.
अनेक विषयासंदर्भात सामना चित्रपटाचे अस्तित्व कायम टिकून आहे. अशा कलाकृती एकदाच बनतात आणि कायमचा आपला प्रभाव कायम ठेवतात.
- दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक