विविध विकासकामांचा शुभारंभ; रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच ई-गव्हनर्सला प्रोत्साहन दिले आहे. त्या दृष्टीने इज ऑफ डूइंग बिझनेसला चालना देण्यासाठी पनवेल कनेक्ट अॅपच्या माध्यमातून येथील महापालिका नागरिकांना विविध सुविधा ऑनलाईन देत आहे. सेवेची हमी देण्याच्या दृष्टीने महापालिकेने अग्रेसर राहून उत्तम पाऊल उचलले, सेवा केंद्र उभारली, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 13) येथे काढले.
पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयात पनवेल कनेक्ट अॅप, स्वच्छता विभागाकडील गाड्यांचे लोकार्पण, माहिती प्रसारण डिजिटल बोर्डचे अनावरण, महा-ई सेवा हमी केंद्र तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून महापालिका ही कार्यक्षेत्रातील प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबद्दल महापालिकेचे व आयुक्तांचे त्यांनी या वेळी अभिनंदन केले.
कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक-नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मंगला माळवे, स्वरूप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, श्रीराम पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
या वेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिका पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान प्रशासन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत आहे, असे सांगितले. याचबरोबर सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तसेच ई गव्हनर्सच्या दृष्टीने मनपाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यासाठी महापालिकेने महा ई-सेवा केंद्र सुरू केली आहेत तसेच नागरिकांच्या प्रत्येक अर्जाची दखल घेऊन त्यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने पनवेल कनेक्ट अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिक व मनपा यांच्यामध्ये सुसंवाद साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांनी अत्यंत विश्वासाने व धैर्याने मुलाखतीस सामोरे जाऊन नोकरी मिळवावी, असा सल्ला व शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
शासनाने दिलेल्या 100 दिवसीय कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमांवर आधारित विविध योजनांचे या कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविकात कैलास गावडे यांनी महापालिकेतर्फे होत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी मानले. निषकेन फाऊंडेशनचे किरण रहाणे, दीपक पवार व अमोल उंडे यांच्या सहकार्यातून महापालिकेने या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper