Breaking News

नवी मुंबई स्वाईन फ्ल्यू टेस्टींगला सुरूवात

कोव्हीड आरटी-पीसीआर लॅबमध्ये सुविधा

नवी मुंबई : बातमीदार

कोविड प्रभावित काळामध्ये आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसांच्या कालावधीत सुरू केलेल्या नवी मुंबई महपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील आरटी-पीसीआर लॅबमुळे जलद रिपोर्ट प्राप्त होऊन कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाली. प्रतिदिन 5000 टेस्ट्स क्षमतेच्या या लॅबमध्ये 4 ऑगस्ट 2020 पासून दोन वर्षांत आतापर्यंत 13 लाख 73 हजार 288 इतक्या कोविड टेस्ट झालेल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेची स्वत:च्या मालकीची ही अत्याधुनिक लॅब म्हणजे आरोग्य सुविधांच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपलब्धी असून कोविड नंतरच्या काळात ही लॅब इतर विविध तपासण्यांसाठी सुविधाजनक ठरेल असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सूचित केले होते. त्या अनुषंगाने सध्याचा स्वाईन फ्ल्यूचा वाढता प्रभाव बघता या लॅबमध्ये आता स्वाईन फ्ल्यूच्या एच 1 – एन 1 टेस्टिंगला सुरुवात झालेली आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आढळणार्‍या संशयित स्वाईन फ्ल्यू रूग्णांचे एच 1-एन 1 सॅम्पल एनआयव्ही, पुणे या लॅबला पाठवण्यात येत होते. तथापि तेथून रिपोर्ट प्राप्त होण्यास लागणारा काहीसा कालावधी आता नवी मुंबई महापालिकेच्या

स्वतःच्या लॅबमध्ये टेस्ट्स केल्याने वाचणार असून त्यामुळे संशयित रुग्णावर जलद सुयोग्य उपचार करणे शक्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीव्र लक्षणे असणार्‍या रुग्णांचेच सॅम्पल्स टेस्टींगकरिता घेतले जात असून पाच रुग्णांचे सॅम्पल्स टेस्टींगसाठी घेण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्ल्यूचा पहिला रुग्ण 19 जुलै 2022 रोजी आढळला होता. पालिका क्षेत्रात आत्तापर्यत एकूण 74968 इतक्या फ्ल्यू सदृष्य रुग्णांची ओपीडीमध्ये स्क्रिनिंग करण्यात आलेली असून 33 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. यापैकी सद्यस्थितीत सहा रुग्ण उपचाराधीन आहेत.

महापालिकेच्या वतीने मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची स्वाइन फ्लूची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचाराकरिता सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रुग्णांचे नमुने सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे संकलित करून माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहेत.

स्वाईन फ्ल्यू हा आजार एन्फ्लुएन्झा एच 1 – एन 1 या विषाणूमुळे होतो. नवी मुंबई पालिकेची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालये येथे प्रत्येक फ्ल्यू सदृश्य रुग्णांची ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी या लक्षणांबाबत विचारपूस करण्यात येते. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये इतर कोणतेही निदान झाले नसल्यास एन्फ्लुएन्झा करिता तपासणी करण्यात येते. अशा फ्ल्यू रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या आधारे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. त्यापैकी सौम्य फ्ल्यू रुग्णांवर लक्षणानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करण्यात येतो. व अशा रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही उपचार करण्यात येतो. अति जोखमीच्या घरगुती निकट सहवासितांना विशेष लक्ष देणेकरिता सल्ला देण्यात येऊन त्यांना प्रतिबंधात्मक स्वरूपात मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्यात येतात.

स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीचे आतापर्यंत 1499 लाभार्थी

स्वाइन फ्ल्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनामार्फत दुसर्‍या व तिसर्‍या तिमाहीतील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणार्‍या व्यक्ती तसेच फ्ल्यू रुग्णांची तपासणी देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांना स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस नवी मुंबई महापालिकेच्या तीन रुग्णालयात व 23 नागरी आरोग्य केंद्रात देण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीचा डोस 1499 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

शाळेत जाणारे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेत काम करणार्‍या इतर कर्मचार्‍यांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी आवश्यक वैद्यकिय उपचार घ्यावेत व शक्यतोवर लोकसंपर्क टाळावा. स्वाईन फ्लू आजाराबाबत घाबरून न जाता योग्य माहिती, योग्य वैदयकिय सल्ला व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आजाराचा प्रसार थांबवावा. -अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply