Breaking News

शोले 50 वर्ष; अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे, बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे

तू (अथवा तुम्ही) शोले पाहिला तेव्हा मिनर्व्हात तिकीट दर किती होते? आतापर्यंत सर्वाधिक वेळा मला केलेला प्रश्न. असा प्रश्न करणार्‍यांत चित्रपट रसिक, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील काही सिनेपत्रकार आणि ओटीटी युगातील काही फिल्मवाले असे मिलेजुले आहेत. मलाही हा प्रश्न आवडतो आणि मी त्यावर माहितीसह मनसोक्त मनमुराद उत्तर देतो. फ्लॅशबॅकमध्ये जाण्याची एक फिल्मी संधीच.
आज मल्टीप्लेक्स युगात चित्रपटाच्या खेळाच्या वेळेनुसार तिकीट दर असतात याची आपणासही कल्पना आहे. सकाळी नऊचा खेळ कमी रुपयांत आणि मिडनाईट मॅटीनी शो महागड्या तिकीट दरात हे आपणास माहीत आहेच. पडद्यावरचा चित्रपट तोच, पण वेळेनुसार त्याची किंमत बदलते असे आजचे युग. पूर्वी असे नव्हते असे अनेक बाबतीत प्रत्येक पिढी जुनी होत जाताना हमखास म्हणते त्यात हीदेखील एक गोष्ट. सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहाच्या चलतीच्या युगात दिवसा तीन खेळ तिकीट दर फिक्स असत आणि त्याच चित्रपटगृहात मॅटीनी शोला जुने चित्रपट प्रदर्शित होताना तिकीट दर उतरते असत. त्या काळातील आम्हा चित्रपट रसिकांच्या डोक्यात व खिशात हे समीकरण फिट्ट होते.
नाझ चित्रपटगृहाचा अनुभव सांगतो. नासिर हुसेन दिग्दर्शित ‘यादों की बारात’ असो, जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ‘आप की कसम’ असो, स्टॉल तिकीट दर दोन रुपये वीस रुपये (शोच्या वेळेपूर्वी वीस मिनिटे अगोदर ही खिडकी उघडली जाई), अप्पर स्टॉल तीन रुपये तीस पैसे व बाल्कनी चार रुपये चाळीस पैसे असे तिकीट दर होते (या तिकीटांची आगाऊ तिकीट विक्री होत असे. तिकीटे शिल्लक राहिलीच तर करंट बुकिंगची खिडकी उघडे). याच नाझ चित्रपटगृहात मॅटीनी शोला एका आठवड्यासाठी प्रदर्शित होणारे जुने चित्रपट पुढील पिढीसमोर उत्तम पर्वणी असत. याच नाझमध्ये मी मॅटीनी शोला विजय आनंद दिग्दर्शित ‘नौ दो ग्यारह’, सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘जंगली’, नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘बंधन’ असे अनेक जुने चित्रपट एन्जॉय केले. म्युझिकल सुपरहिट चित्रपट हे त्या काळातील मोठेच वैशिष्ट्य. नाझला मॅटीनी शोला स्टॉल एक रुपया पासष्ट पैसे, अप्पर स्टॉल दोन रुपये वीस पैसे व बाल्कनी दोन रुपये पंचाहत्तर पैसे असे तिकीट दर असत.
गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृहात, डॉ. भडकमकर मार्गावरील इंपिरियल चित्रपटगृहात मॅटीनी शोला हेच दर स्टॉल एक रुपया पाच पैसे, अप्पर स्टॉल एक रुपया पासष्ट पैसे व बाल्कनी दोन रुपये वीस पैसे असे तिकीट दर होते. आज वयाची साठी अथवा पासष्टी ओलांडलेले चित्रपट रसिक एव्हाना नक्कीच फ्लॅशबॅकमध्ये गेले असतील. उपनगरात, अन्य शहरांत, ग्रामीण भागात यापेक्षाही कमी दरात चित्रपट एन्जॉय करता येई. तो खरा चित्रपटाचा सुवर्ण काळ होता. पडद्यावरच्या जगात हरवून हरखून जाता येई. भारी आवडलेला चित्रपट पडद्यावर ठेवून बाहेर पडले जात नव्हते.
…आणि अशातच मुंबईत 15 ऑगस्ट 1975 रोजी ‘शोले’ आला. मिनर्व्हा व न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात सत्तर एमएम व स्टीरिओफोनिक साऊंड अशा भव्य रुपात आणि मुंबईतील गीता, गणेश, शारदा, बादल, कलामंदिर, मिलन, बहार, चंदन इत्यादी तसेच ठाणे शहरातील आनंद व वंदना चित्रपटगृह, कल्याणमधील न्यू प्रकाश इत्यादी चित्रपटगृहात पस्तीस एमएम अशा स्वरुपात जी.पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले आणि त्याच शुक्रवारी शालिमार चित्रपटगृहात मॅटीनी शो व इतरत्र गरीबी हटाव हा चित्रपट प्रदर्शित झाला. आर.के. मोठा नावाचे दिग्दर्शक होते आणि या चित्रपटात राजवंश, रचना, नरेंद्रनाथ, पद्मा खन्ना, अनिता गुहा इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. म्हणजेच सामना एकतर्फी होता. या दोन्ही चित्रपटांच्या जाहिराती माझ्या कलेक्शनमध्ये आहेत. तोपर्यंत मुंबईत यश चोप्रा दिग्दर्शित दीवार (24 जानेवारीला प्रदर्शित) रौप्य महोत्सवी आठवड्यानंतरची घोडदौड सुरू केली होती. मिनर्व्हावरून मोती चित्रपटगृहात पुढचा प्रवास सुरु झाला होता (त्यानंतर तोच प्रवास लिबर्टीत मॅटीनी शोला शंभराव्या आठवड्यापर्यंत चालला), ‘जय संतोषी मा’ (30 मे रोजी प्रदर्शित) अलंकार मॅटीनी शो, एडवर्ड, किस्मत या चित्रपटगृहात हाऊसफुल्ल गर्दीत सुरू होता के.एस. सेतुमाधवन दिग्दर्शित ‘ज्युली’ (18 एप्रिल), फिरोज खान दिग्दर्शित ‘धर्मात्मा’ व दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित ‘पांडू हवालदार’ हे दोन्ही चित्रपट एकाच शुक्रवारी म्हणजेच 9 मे रोजी प्रदर्शित होऊन लोकप्रिय ठरले होते. 16 मे रोजी मुंबईत रवि टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल मे’ रिलीज झाला. असे करत करत आणखी काही चित्रपट प्रदर्शित होत होत असतानाच ‘शोले’ आला रे आला आणि पडला पडला असे म्हणता म्हणता असा काही सुपरहिट झाला की असं वाटतयं की तो आजही पडद्यावर सुरू आहे. मिनर्व्हाची इमारत केव्हाच पाडलीय, पण आजही तेथून जाताना गब्बरसिंगची दहशत जाणवते. पिक्चर असा इतपत मुरायला हवा. याला पिक्चरची ताकद म्हणतात.
‘शोले’साठी मिनर्व्हात स्टॉलच्या पहिल्या चार रांगा रिकाम्या असत, कारण तेथे बसून सत्तर एमएमच्या पडदाभरचा शोले पाहणे जिकरीचे होते. अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे व बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट दर आज किरकोळ वाटतात. पन्नास वर्षांपूर्वी मात्र ते थोडे महाग वाटत. पिक्चर मोठा म्हणून तिकीट दर चढे हे समीकरण पटेल न पटेल पण होते हे खरे. त्या काळातील मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी नक्कीच थोडे जास्त होते आणि पिक्चर हिट झाल्यावर हेच तिकीट दर परवडण्यासारखे झाले. हीच तर आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती आहे.
‘शोले’ मिनर्व्हात हाऊसफुल्ल गर्दीत (या चित्रपटगृहाची प्रेक्षक संख्या 1499 अशी भरपूर) पडदाभर पाहण्यात एक वेगळेच थ्रील होते. माझी आणि माझ्या अगोदरची पिढी याबाबत भाग्यवान. चित्रपट मोठ्याच पडद्यावर पहायचा असतो हे त्या काळात सांगावे लागत नव्हते. तीच तर पद्धत होती. स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीमचा परिणाम ‘शोले’ची रोमांचकता वाढवत होते. धडधड करीत जाणारी माल ट्रेन, गब्बरसिंग व टोळीची बेभान घोडेस्वारी, जय व वीरू यांच्यातील नाणेफेकीचा प्रसंग, राहुल देव बर्मनचे पार्श्वसंगीत, गब्बरसिंगचे विशिष्ट लयीत बोलणे हे सगळेच मिनर्व्हात एक रोमांचक अनुभव देई. तिकीटावर ते लिहिलेले कसे असेल? पण वाढत्या तिकीट दरात हे अनुभवता येई आणि ते पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठीच मिनर्व्हात पुन्हा पुन्हा जाणारे, रांगेत उभे राहून तिकीट काढणारे फिल्म दीवाने अनेक. पुन्हा पुन्हा चित्रपट एन्जॉय करणारे आणि त्यावर मनापासून बोलणारे चित्रपट रसिक जास्त यश देत असतात. या प्रेक्षकांच्या बळावर चित्रपट ज्युबिली हिटचा प्रवास सहज करीत. मिनर्व्हात शोले दिवसा तीन खेळ याप्रमाणे 31 ऑगस्ट 1978पर्यंत मुक्कामाला होता आणि मग तेथेच मॅटीनी शोला शिफ्ट केल्यावर आणखी दोन वर्ष असा एकूण पाच वर्ष शोलेने प्रवास केला. त्या काळात गावाकडील नातेवाईक वा ओळखीचे मुंबईतील नातेवाईकांकडे आल्यावर त्यांना मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, मलबार हिल, शिवाजी पार्क याबरोबरच मिनर्व्हात शोलेही दाखवत अशी सामाजिक सांस्कृतिक स्थिती होते. शोलेचे हे वेगळेच यश.
शोलेच्या पन्नास वर्षांच्या खणखणीत वाटचालीत या चित्रपटावर इतकं नि असं सातत्याने लिहिले जातेय की हा कदाचित जागतिक पातळीवरील विक्रम ठरावा. त्यात त्याचे तेव्हाचे मिनर्व्हातील तिकीट दर हा कदाचित छोटी गोष्ट वाटेलही, पण तसे अजिबात नाही. याचे कारण सत्तरच्या दशकात सिंगल स्क्रीन थिएटर्समधील स्टॉलचा पब्लिक म्हणून पडदाभरचा चित्रपट पाहताना त्या काळातील तिकीट दर ही एक वेगळीच सवय होती. ऑनलाईनच्या आजच्या युगात त्यात काय एवढेसे असे वाटत असेलही, पण त्या काळातील हा तिकीट दराचा अनुभव काही वेगळाच. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हाही एक रंगतदार फंडा.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply