पेण : वार्ताहर – कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुद्धा या सर्व परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. यावर उपाययोजना म्हणून जनतेने घरी राहवे यासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र काही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. पोलीस व प्रशासनही आपली भूमिका चोख बंदोबस्त ठेवून पार पाडत आहेत.
या सर्व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापारी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करीत चढ्या भावाने विक्री करताना आढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी नितीन जाधव यांनी सांगितले आहे. व्यापारी व भाजीपाला विक्रेतेच्या संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला एकजुटीने व संयम ठेवुन करावयाचा आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये या करीता शासन प्रयत्नशील आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्यांनी आपल्या वाहनांचा नंबर, स्वतःचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, पुरवठा वस्तूचा प्रकार सहित अर्ज करण्याचेही आवाहन केले असून पास देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लहान मुले, वृध्द यांची विशेष काळजी घ्या, विनाकारण रस्त्यावर फिरु नका. घरी राहा जर महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा आपल्या परिवारासोबतच घरात राहा, असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांनी केले.
या वेळी स्वतः पेण नगरपालिकेच्या नाक्यावर उभे राहून येणार्या वाहनांची तपासणी तसेच नागरिकांनी तोंडाला माक्स लावण्याचे आवाहन ते करीत होते. एकूण 96 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या बंदोबस्तात पेण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप वेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नरेंद्र पाटील, महेश कदम, पोलीस कर्मचारी पांढरे, घरत, कवळे, आंबा गेंड आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.