पनवेल : रामप्रहर वृत्त
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने विराट मशाल मोर्चाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी बनलेला हा मोर्चा संपूर्ण परिसरात दहशतवादाविरोधात जागृतीचा संदेश ठरला.
आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल परिसरातील खांदा कॉलनी ते नवीन पनवेलदरम्यान निघालेल्या या विराट मशाल मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, युवक-युवती, शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी भारत माता की जय या घोषणेने परिसर देशभक्तीने निनादला, तर पाकिस्तानचा झेंडा जाळत दहशतवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत संतापही व्यक्त झाला.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी असल्याच्या भावना व्यक्त झाल्या. त्याचप्रमाणे देशाच्या एकात्मतेला हादरा देणारे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सरकारच्या पाठीशी अखंडपणे उभे राहण्याचा निर्धार या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या मशाल मोर्चात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, जगदीश घरत, ज्योती देशमाने, भीमराव पोवार, किशोर चौतमोल, शिवाजी भगत, गोपीनाथ मुंडे, सय्यद अकबर, रूपेश नागवेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, उपाध्यक्ष शिवानी घरत, रोहित जगताप, खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, गौरव कांडपिळे, प्रीतम म्हात्रे, राकेश भुजबळ, कोमल कोळी, देवांशु प्रभाळे, अक्षय सिंग, रोहित कोळी, शुभम कांबळे, श्रवण घोसाळकर, मोतीलाल कोळी, यश भोईर, राजू महापूरकर, वरुण डंगर, कुलबीर सिंग, आशा मुंडे, रामनाथ पाटील, युवराज बेडसे, विश्वास काथारा, उदय काथारा यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले विचार मांडताना म्हटले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना दिली. जगभरातले पर्यटक काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले असताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली. निष्पाप पर्यटकांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. आपल्या पनवेलचे दिलीप देसले यांनाही गोळ्या झाडून मारण्यात आले. धर्म विचारून हिंदू लोकांची हत्या करणार्या या घटनेचा मी निषेध करतो. पुढे बोलताना त्यांनी, आपल्याला या पाकिस्तानबद्दल चीड असणारे जे जे प्रसंग आहेत ते मनात साठवून ठेवले पाहिजेत आणि त्या प्रसंगाची आठवण प्रत्येक क्षणाला आपल्याला झाली पाहिजे. देश बांधवांची अशा पद्धतीने हत्या करणार्या शक्तींना मी कुठे थारा देत नाहीये ना याचा विचार आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला करावा लागणार आहे, असेही म्हटले.
पहलगाम येथे झालेला हल्ला हा फक्त मानवतेवर नसून हिंदू धर्मावर झालेला हल्ला आहे आणि म्हणून आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने मशाल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. ही मशाल सतत आपण पेटती ठेवली पाहिजे, असे मत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार आपल्या भावना व्यक्त करीत असताना म्हणाले की, नवीन पनवेल येथील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानी काल लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आम्ही त्यांच्यासोबत होतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देसले कुटुंबियांना कोणतीही मदत लागल्यास माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे असतील, असे आश्वासित केल्याचे नमूद केले.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper