चित्रपट व चित्रपटसृष्टी यावर म्हणजेच पडद्यावर येत असलेली बरी वाईट (चांगली वा सामान्य वगैरे) कलाकृती आणि पडद्यामागच्या अगणित व अनेक प्रकारच्या घडामोडींवर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम, क्रीडा क्षेत्राचा बरा वाईट परिणाम होत असतोच. त्या दृष्टीकोनातूनही चित्रपटसृष्टीवर फोकस टाकायला हवा. आणि अशीच एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, आपल्या देशातील आणीबाणी पर्व. आपल्या देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाली. आणि ती एकोणीस महिने होती. या गोष्टीलाही पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. विविध माध्यमांतून त्यावर फोकस
टाकला जातोय.
याच आणीबाणीत काही चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आली आणि त्याची आजही चर्चा होत असते.
मराठी चित्रपटाबाबत सांगायचे तर, रामदास फुटाणे निर्मित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सामना या चित्रपटावरील आणीबाणीतील बंदी फारच वादग्रस्त ठरली. पुणे शहरात सामना चित्रपट 10 जानेवारी 1975 रोजी प्रदर्शित झाला तर मुंबईत हा चित्रपट 14 फेब्रुवारी 1975 रोजी प्रदर्शित झाला. त्या काळात चित्रपटाच्या प्रिन्ट असत आणि टप्प्याटप्प्याने सर्वच भाषेतील चित्रपट प्रदर्शित होत असत. अशातच देशात आणीबाणी लागू होताच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आली. सामना चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुणे शहरात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात आणीबाणीत या चित्रपटावर आलेल्या बंदीचा विषय निघालाच.
पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील राजकारणावर विजय तेंडुलकर यांच्या सशक्त प्रभावी लेखणीतून साकारलेले टोकदार भाष्य.. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या जबरदस्त अभिनयाचा ‘सामना’.. असे कायमच कौतुकाने म्हटले जाते.
विजय तेंडुलकर यांची लेखक म्हणून केलेली निवड यामध्येच चित्रपटाचे यश निश्चित होते, असे रामदास फुटाणे नेहमीच सांगतात. ‘सोंगाड्या’ (1971), एकटा जीव सदाशिव ( 1972) या चित्रपटांच्या वेळी दादा कोंडके यांच्याकडे प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून केलेल्या कामाचा निर्माता म्हणून फायदा झाला. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट झाला, पण तेही जमा करताना कष्ट पडले.
रामदास फुटाणे ’सामना’ निर्मितीच्या आठवणीत रमतात.
’विजय तेंडुलकर यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा, एखादा चित्रपट लिहून द्या अशी मागणी त्यांच्याकडं केली. सहा महिने त्याचा पाठपुरावा करत होतो. ते तयार झाले तेव्हा त्यांनी एक आग्रह धरला. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू हे दोन अभिनेते चित्रपटात असायला हवेत. मी तो मान्य केला. त्या दोघांनाच केंद्रस्थानी ठेवून तेंडुलकर यांनी ’सामना’ लिहिला. चित्रपटाचे शुटिंग सुरु झाले, तेव्हा निळू फुलेंना डॉ. लागू बारकाईने न्याहाळत होते. त्यांनी उभे केलेल्या पात्रापेक्षा वेगळे काहीतरी करायला हवे, असा डॉ. लागूंचा विचार होता. झालेही तसेच.. दोन्ही कलावंतांनी परस्पर भिन्न पात्रे साकारुन चित्रपटाच्या संहितेला न्याय दिला. तेव्हा अभिनेते म्हणून ही दोन्ही माणसे विलक्षण होती. याची प्रचिती आली.
’सामना’ पुणे आणि मुंबईतील काही भाग वगळता अक्षरश: फ्लॉप झाला. समिक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. तरी चित्रपट रसिकांना फारसा आवडला नव्हता. पडद्यावर चित्रपट सुरु असतानाच प्रेक्षक झोपतात, अशा प्रतिक्रिया दुर्दैवाने आम्हाला येत होत्या, असे रामदास फुटाणे सांगतात तेव्हा फारच आश्चर्य वाटते.
सामना चित्रपटगृहात अपयशी ठरुनही तो बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात निवडला गेल्याची बातमी आली. लागलीच डॉ. लागूंचे घर गाठले आणि निधीसाठी त्यांना मंत्रालयात येण्याची विनंती केली. कोणासमोर कधीही हात न पसरलेल्या डॉ. लागूंनी त्या दिवशी सांस्कृतिक मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करून निधीची व्यवस्था केली आणि आमचा परदेश दौरा निश्चित झाला,’ अशी आठवणीही फुटाणे यांनी सांगितली.
तेंडुलकरांनी या सिनेमाचं नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असं दिलं होतं. मात्र, हे नाटकाचं शीर्षक वाटत होतं. आणि ते खरेही होते. अनेकांना ते पटलं नव्हतं. तेंडुलकरांना मग आम्ही ते बदलण्याची विनंती केली. नंतर आठ-दहा दिवसांनी त्यांनीच ‘सामना’ हे शीर्षक ठेवलं.
मुंबईत सामना प्रदर्शित करताना वृत्तपत्राच्या जाहिरातीत म्हटले होते, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवालसारखी प्रक्षोभक नाटके देणार्या विजय तेंडुलकरांच्या लेखणीचा नवा मराठी चित्रावतार.
आणीबाणी उठल्यावर देशातील लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे सरकार आले. आणि सामना, आंधी इत्यादी चित्रपटांचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. सामनाचे मूळ वितरक टेम्पल मुव्हीज प्रकाशनकडून सामनाचे हक्क रामदास फुटाणे यांजकडे आले. त्यांनी तोपर्यंत सर्वाचे देणे फेडले होते. बर्लिन महोत्सवानंतर हा चित्रपट एकदम चर्चेत आला आणि यशस्वी झाला. आता ‘सामना’ चित्रपट हा रामदास फुटाणे यांनी 8 एप्रिल 1977 रोजी मुंबईत प्लाझा चित्रपटगृहात रोज चार खेळ असा सामना पुन्हा प्रदर्शित करताच आठवड्यातील सर्वच्या सर्व अठ्ठावीस खेळ हाऊसफुल्ल ठरले. उत्साह वाढवणारी गोष्ट. हे यश आजही कायम आहे.
’मारुती कांबळेचं काय झालं’ या रोखठोक संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी ही या माईलस्टोन चित्रपटाची वैशिष्ट्य.
सत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहकारी साखर कारखानदारी आणि त्यातूनच निर्माण होत असलेले महत्वाकांक्षी स्थानिक नेतृत्व असा सामाजिक राजकीय बदल होत होता. तोपर्यंत मराठी चित्रपटात गावातील ’पाटील ’ दिसे. ’सामना’ने त्यात बदल घडवून आणला. त्याची गरज होतीच. सहकार सम्राट धोंडे पाटील यांच्या भूमिकेत निळू फुले आणि गांधीवादी मास्तरांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू असा हा अभिनयाचा कसदार ’सामना’ रंगला. अभिनयासाठी हा आदर्श चित्रपट आहे. कधीही पहावा.
सामनाच्या फर्स्ट रनच्या नुकसानीतून सर्वाचे देणे फिटल्यानंतर दोन वर्षांनी चित्रपटाचे हक्क रामदास फुटाणेंकडे आले. आता ‘सामना’ चित्रपट हा माझ्यासाठी निवृत्तिवेतन म्हणजे पेन्शनची रक्कम देणारा ठरला असल्याचे रामदास फुटाणे नेहमीच सांगतात.
फिल्म कुंज या निर्मिती संस्थेचे जे. ओम प्रकाश निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित ’आंधी ’ (रिलीज 13 फेब्रुवारी 1975 मुंबईत मेट्रो व 14 फेब्रुवारी 1975 मुंबई उपनगर)
महत्वाकांक्षी राजकीय नेत्या आरतीदेवी (सुचित्रा सेन) आणि त्यांचे पती जे.के. (संजीवकुमार) यांच्या नातेसंबंधाची ही गोष्ट राजकीय चित्रपट म्हणून चर्चेत राहिली. या चित्रपटात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्यासह ओम शिवपुरी, मनमोहन, कमलदीप, ए.के. हनगल, हरीश, रणवीर, सी.एस. दुबे इत्यादींच्या भूमिका आहेत.
लेखक कमलेश्वर यांच्याकडे राजकीय नेत्या तारकेश्वरी सिन्हा यांच्या आयुष्यावर आधारित एक गोष्ट होती. गुलजार यांना ती आवडताच त्यांनी व भूषण वनमाली यांनी पटकथा लेखन केले. आणि नाव ठरले, आंधी .
आंधी प्रदर्शित झाला. त्याला रसिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत होता, सुचित्रा सेनने साकारलेली भूमिका तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर बेतली आहे असे म्हटले जात होते. पण गुलजार यांनी एका मुलाखतीत भाष्य केले, असे अजिबात नाही. हा गैरसमज आहे. चित्रपट लिहिताना व दिग्दर्शित करताना असा कोणताही विचार नव्हता. गुलजार यांचे म्हणणे काहीसं बाजूला पडले. अशातच गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुक आली आणि त्यात या चित्रपटात एका दृश्यात आरती देवी दारु सेवन करते या दृश्याचा विरोधी पक्षाकडून वापर करण्यात आला. हा चित्रपट निवडणूक आचार संहितेचा भंग करतोय या कारणास्तव या चित्रपटावर आणीबाणीत बंदी घालण्यात आली.
आंधी दिल्लीत प्रदर्शित होताना पोस्टरवर म्हटले होते, आजाद भारत की एक महान महिला नेता की कहानी… तर हैदराबाद येथील पोस्टरवर म्हटले होते, परदे पर देखिए अपने प्रधानमंत्री को…
आजही विविध कारणास्तव आणीबाणीच्या दिवसां’चा उल्लेख होता ( उदा. कंगना राणावतचा इमर्जन्सी या चित्रपटाचे अलिकडेच झालेले प्रदर्शन)
आणीबाणीच्या काळात सामना व आंधी या चित्रपटातील गाण्यांची लोकप्रियता वाढत राहिली आणि त्याचाही या चित्रपटांना आणीबाणीनंतर ते प्रदर्शित होत असताना बराच फायदा झाला. आजही या दोन्ही चित्रपटातील गाणी
लोकप्रिय आहेत.
‘आंधी’मधील गुलजार यांचा एक संवाद फारच गाजला.
चित्रपटातील राजकीय पक्षाचा कारभार सांभाळणारा चंद्रसेन ( ओम शिवपुरी) एका वृत्तपत्राच्या संपादकास म्हणतो, इलेक्शन के पहले आप हमारा खयाल रखिये, उसके बाद हम आपका…
यासह मदन मोहला निर्मित दिग्दर्शित दस नंबरी या चित्रपटात मोठ्याच प्रमाणावर हिंसा आहे या कारणास्तव बंदी घालण्यात आली. या चित्रपटात मनोजकुमार, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ, बिंदू, कामिनी कौशल इत्यादींच्या प्रमुख भूमिका होत्या. मुंबईत सुपर चित्रपटगृहात या चित्रपटाने शंभर दिवसाचे यश साध्य करुन त्याची पुढील वाटचाल सुरु असतानाच हा चित्रपट चित्रपटगृहातून उतरवावा लागला. विशेष उल्लेखनीय गोष्ट हा चित्रपट 1976 सालचा असून ऐन आणीबाणीत सेन्सॉर संमत झालाही होता. अशातच केन्द्रीय माहिती व प्रसारण खात्याने चित्रपट सेन्सॉर संदर्भात काही कडक नियम लागू केले, त्यात चित्रपटातील अनावश्यक हिंसेवर कात्री असेही होते. याचा या चित्रपटाला फटका बसला.
आणीबाणीत बंदी आल्याने प्रचंड गाजलेला चित्रपट म्हणजे, अमृतलाल नाहटा निर्मित व दिग्दर्शित किस्सा कुर्सी का . हा एक राजकीय व्यंग्यात्मक चित्रपट होता. पण त्यात सरकारी धोरणाविषयी भाष्य करण्यात आल्याचा ठपका ठेवून त्यावर बंदी घालण्यात आली. या चित्रपटात रेहाना सुलतान, शबाना आझमी, राज बब्बर, राज किरण, उत्पल दत्त, मनोहर सिंग इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटावरची बंदी खूपच मोठ्या प्रमाणावर गाजली. विशेषत: किस्सा कुर्सी का असे म्हणतच या बंदीची आणि त्यासह अन्य चित्रपटांवरच्या बंदीची दखल घेतली गेली. आणीबाणीनंतर या चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरण करुन तो प्रदर्शित करण्यात आला. तात्पर्य, निर्मात्यांनी अजिबात हार मानली नाही. त्यांनी आणीबाणी उठण्याची वाट पाहिली.
आय.एस. जोहर हा एक उपद्व्यापी सिनेमावाला म्हणून ओळखला जाणारा. विशेषत: नामवंत कलाकारांशी साम्य असलेले चेहरे घेऊन चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन करण्यात तरबेज आणि त्यात तो यशस्वीही ठरे. त्याने आणीबाणीच्या काळातील वीस कलमांतील नसबंदी या गोष्टीवर व्यंग्यात्मक असा नसबंदी या नावाचा चित्रपट निर्माण केला. चित्रपटात राकेश खन्ना (राजेश खन्ना), अनिताव बच्चन (अमिताभ बच्चन), सेव आनंद (देव आनंद) असे नकली चेहरे होते, पण चित्रपटाच्या मांडणीत नसबंदी योजनेची हुर्यो उडवल्याने सेन्सॉरने आक्षेप घेतला. त्यामुळेच आय.एस. जोहर यांस माघार घ्यावी लागली आणि आणीबाणी उठायची वाट पहावी लागली. या चित्रपटाला रसिकांनी स्वीकारले नाही.
लेख टंडन दिग्दर्शित आंदोलन चित्रपट आणीबाणीत सेन्सॉरच्या तावडीत सापडला. राकेश पांडे व नितू सिंग यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. सरकारी धोरणाविरोधात भूमिका घेतलेल्या कलाकृतींवर सेन्सॉर बोर्डाची अतिशय कडक नजर असे.
दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या क्रांती की तरंगे या माहितीपटावरही आणीबाणीत बंदी आली. पट्टाभि रामरेड्डी दिग्दर्शित चंदा मारुथा या कन्नड भाषेतील चित्रपटावरही आणीबाणीत बंदी आली. या चित्रपटातील नायिका व रामरेड्डी यांची पत्नी स्नेहलता यांना तर काही दिवस अडकही झाली होती.
आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली असतानाच त्यात काही चित्रपटांवर आलेल्या बंदीची दखल हवीच…
दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper