विविध विकासकामांचे होणार उद्घाटन आणि भूमिपूजन
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) मुंबईत येत आहेत. या दौर्यात वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधानांना हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पंतप्रधान मोेदी हे त्यांनीच काही वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या मुंबई मेट्रोच्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गांचे लोकार्पण करणार असून त्यानंतर ते मुंबई मेट्रोने प्रवासही करणार आहेत. यासह ते 38 हजार कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांची पायाभरणी करतील. मुंबईतील सर्व मेट्रो, लोकल आणि बस येथे चालू शकणार्या मुंबई वन मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल.
17 हजार 200 कोटी रुपयांच्या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी, वरळी येथे हे प्रकल्प उभारले जातील. त्यांची एकत्रित क्षमता 2460 एमएलडी आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 20 ठिकाणी उघडला जात असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील. येथे आरोग्य तपासणी, औषधोपचार, रोगनिदान व तपासणी या गोष्टी विनामूल्य होतील. 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, गोरेगावचे सिद्धार्थ नगर हॉस्पिटल (306 खाटा) व ओशिवरा मॅटर्निटी होम (152 खाटा) यांची पायाभरणीही पंतप्रधान करतील.
याशिवाय ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्राकडे पाठवला होता. पुनर्विकासाचा एकूण खर्च एक हजार 813 कोटी रुपये आहे.
पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्य मंत्री, प्रमुख नेते, वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.