नागोठणे : प्रतिनिधी
रिलायन्स कंपनीविरोधात सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या जगदिश वारगुडे याचा 21 डिसेंबर रोजी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा लोकशासन आंदोलन समितीने घेतल्याने मृतदेह पनवेल येथील शवागारात ठेवण्यात आला होता. मृताच्या नातेवाइकांच्या मागणीनुसार मंगळवारी (दि. 29) सायंकाळी वारगुडेचा मृतदेह त्याच्या मूळगावी वेलशेत येथे आणण्यात आला व पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.
नागोठणे येथील रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाविरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्तांनी 27 नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा बुधवारी (दि. 30) 34वा दिवस होता. आंदोलनात पहिल्या दिवसापासून सक्रिय असलेल्या जगदिश वारगुडे या तरुणाला 21 डिसेंबर रोजी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांच्या सहमतीने समितीचे अध्यक्ष कोळसे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी आंदोलनस्थळी घोषणा केली होती. दरम्यान, जगदिश वारगुडेचा मृतदेह पनवेल येथील शवागारात ठेवण्यात आला होता.
जगदिशचा लहान भाऊ भारतीय सैन्यात असून, सध्या आसाम सीमेवर सेवा बजावत आहे. भावाचा मृत्यू झाल्याने ते तातडीने आपल्या गावी निघून आले होते. मृत्यू होऊन नऊ दिवस झाले तरी कोणताही निर्णय झाला नसल्याने मंगळवारी (दि. 29) सकाळी वारगुडे कुटुंबीयांनी लोकशासन संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून मृतदेह आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी मृतदेह वेलशेत येथे आणल्यावर लगेचच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पिगोंडेचे सरपंच संतोष कोळी यांच्यासह ग्रामस्थ आणि संघटनेचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, चेतन जाधव, गंगाराम मिणमिणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.