Breaking News

यश ‘शोले’चे आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’चे

गणित एकदम सोपे आहे, मिनर्व्हा चित्रपटगृहातील ‘शोले’चा पाच वर्षांचा खणखणीत मुक्काम आणि ‘डीडीएलजे’ अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेचा मराठा मंदिर चित्रपटगृहातील मॅटीनी शोचा तब्बल एकोणतीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेला प्रवास, यात पारडे कोणाचे जड? प्रश्न एकदम सोप्पा, पण उत्तर? शोले (मुंबईत प्रदर्शित 15 ऑगस्ट 1975)च्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत असूनही त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रातील प्रभाव आजही कायम आहे. बातम्या ते मिम्स असा या चित्रपटाचा प्रवास आहे. आजही एखाद्या लहान मोठ्या शहरांतील रिक्षावर शोलेची बसंती अथवा गब्बरसिंगचे स्टीकर असते. हेदेखील यशच. शोलेने मिनर्व्हात दिवसा तीन खेळ याप्रमाणे 31 ऑगस्ट 1978 रोजीपर्यंत हाऊसफुल्ल गर्दीत प्रवास केला. त्यानंतर तेथेच मॅटीनी शोला चित्रपट शिफ्ट केल्यावर तो आणखी दोन वर्ष असा मिळून एकूण पाच वर्ष मुक्काम केला. डीडीएलजे मुंबईत न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला (तो दिवस दिवाळीचा पाडवा होता). तेथे पन्नास आठवड्यांचा मुक्काम केल्यावर तो मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केल्यावर आजही, अगदी आजही मॅटीनी शोला सुरूच आहे.
चित्रपटाचे यश असे आकड्यात मोजायचे असते काय? निर्मितीचा खर्च इतका आणि कमाई इतकी असे सरळ रेषेत जाणारे ते गणित असते काय? त्यापलिकडे जात चित्रपट यशस्वी ठरतो.
काजोलने एकदा डीडीएलजेच्या निमित्ताने एक्सवर (अर्थात ट्विटरवर) पोस्ट केली हे विशेषच. करवा चौथचा संदर्भ देत या चित्रपटावर सोशल मिडियात काही पोस्ट झाल्या.
या दोन्ही चित्रपटांनी मुद्रित माध्यम ते डिजिटल युग, लॅण्डलाईन फोन ते मोबाईल फोन, सिंगल स्क्रीन थिएटर्स ते मल्टीप्लेक्स, ओटीटी लोकल ट्रेन ते मेट्रो असा सर्वच स्तरावर प्रवास केला आहे. आणि हेदेखील एक लोकप्रिय चित्रपटाचे वैशिष्ट्य.
मी आवर्जून जवळपास प्रत्येक वर्षी 19 अथवा 20 ऑक्टोबर रोजी या मराठा मंदिर चित्रपटगृहाला भेट देऊन डीडीएलजेचा ’आठवड्याचा वाढलेला आकडा तो किती बघूया’ असा मनोमन विचार करत नजर टाकतो. यावेळी ही संख्या आहे, 1511वा आठवडा. अबब म्हणावा असाच हा विक्रमी मुक्काम. जगभरातील कोणत्याही भाषेतील चित्रपट असा इतकी वर्ष, इतके आठवडे चित्रपटगृहात मुक्काम करू शकत नाही. चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल अजिबात वाद नाही. कितीदाही पहावा झक्कास दिलखुलास, तजेलदार मनोरंजन आहे. बरं मराठा मंदिर चित्रपटगृहात तिकीट दर किती? तर ड्रेस सर्कल तीस रुपये आणि बाल्कनी चाळीस रुपये असे. सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या परंपरेतील आहेत. मल्टीप्लेक्स युगात चित्रपट पाहणे महाग झाले असताना तर हे तिकीट दर खिशाला परवडणारे (ऑनलाईन पेमेंटच्या तुलनेत स्वस्तच म्हणायचे.)
यश चोप्रा यांनी आपल्या दिग्दर्शनात जे भावनिकपण जपले (वक्त, इत्तेफाक, दाग,दीवार, मशाल, चांदनी, लम्हे यात ते अनेक दृश्यात आहे), रोमान्स खुलवला, गीत संगीत व नृत्याची बहार खुलवली, ते सगळे त्यांचा पुत्र आदित्य चोप्राने अतिशय आकर्षक पॅकेजमध्ये (काळ बदलला होता हो. मसाला मिक्स हा शब्द मागे पडला) पहिल्याच दिग्दर्शनात ते खुलवून रंगवून पडदाभर साकारले. आणि ते नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात सुसंगत होतेच. देशात जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यांचे वारे रुजत होते. समाजात नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग वाढत होता. महाग तेच चांगले अशीच एक प्रकारची मानसिकता समाजात मुरत होती. राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’( 1994)ने वातावरण बदलण्यास सुरुवात केली होतीच. चित्रपट इतिहासातील हे टप्पे खूपच महत्त्वाचे. चित्रपटाचा अभ्यास करताना दखल घ्यावेत असेच.
डीडीएलजेच्या एक हजाराव्या आठवड्यात शाहरूख खान आणि काजोल मराठा मंदिर चित्रपटगृहात आवर्जून आले होते. आपल्याच चित्रपटाच्या यशाचा असा प्रवास त्यांनी असा येऊन एकदा पहावा हे विशेष उल्लेखनीय आहे. रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही हा चित्रपट आपले महत्त्व टिकवून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा 112 वर्षांवर फोकस टाकताना शोले व डीडीएलजे पहिल्या पंचवीस चित्रपटात येतातच. डीडीएलजे हा नव्वदच्या दशकातील पिढीची भाषा बोलणारा हा चित्रपट आहे. या यशात बदलत्या समाज घटकाचे प्रतिबिंब निश्चित आहे.आणि ते असतेच. चित्रपट व समाज असाच जोडला गेला आहे.
खरंतर डीडीएलजे चित्रपटाचे यश कशात? राज मल्होत्रा (शाहरूख खान) आणि सिमरन सिंग (काजोल) यांच्यातील ही अगदी दिलखुलास, मिस्कील, मार्मिक, खेळकर, खोडकर अशी प्रसन्न प्रेमकथा आहे. इंग्लंडमधील देखणं आकर्षक शूटिंग आहे. झक्कास आऊटडोअर्स लोकेशन आहेत. आपण प्रत्यक्षात तेथे आहोत असेच वाटते. शोलेसाठी बंगलोरजवळील रामनगर येथे गावाचा सेट लावून त्याला रामगढ असे नाव दिले. पिक्चर हिट होताच हे रामगढ पर्यटनस्थळ झाले. तर शोलेतील जेलचा सेट राजकमल कलामंदिर स्टुडिओत उभारला.
शोलेची गाणी आजही लोकप्रिय. चित्रपट झाला तेव्हा मात्र ती गाणी इतकी काही खास नाहीत असा मतप्रवाह होता. चित्रपट हिट झाल्यावर तीही गाजू लागली. पार्श्वसंगीत मात्र एकदम कडक. प्रत्येक प्रसंगावर राहुल देव बर्मनच्या प्रभावी पार्श्वसंगीताचा प्रत्यय येतोच. शोलेच्या संवादाची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली, तीदेखील लोकप्रिय. पार्श्वसंगीताची ध्वनिमुद्रिका आली त्यालाही भारी मागणी. डीडीएलजेही संगीत सर्वकालीन सुपर हिट. तुझे देखा तो मै जाना सनम (पार्श्वगायक कुमार शानू व लता मंगेशकर), जरा सा झूम लू मै (आशा भोसले व अभिजित भट्टाचार्य), मेरे ख्वाबो मे जो आये (लता मंगेशकर), मेहंदी लगा के रखना (लता मंगेशकर व उदीत नारायण), हो गया है तुजको जो प्यार सजना (लता मंगेशकर व उदीत नारायण), रुक जा ओ दिल दीवाने (उदीत नारायण) एक गाणे होतेय तोच दुसरं हवेसे वाटते. आणि यातलं कोणतेही गाणे आठवले वा गुणगुणले तरी डोळ्यासमोर पडद्यावरचे गाणे येते. आणखी काय हवे? गाना हिट है तो पिक्चर भी सुपर हिट होना मंगता.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सर्वोत्कृष्ट दहा उत्तम पटकथा व तांत्रिकदृष्ट्या सकस चित्रपटात शोले तर प्रेमकथांमध्ये डीडीएलजेची राज आणि सिमरन यांच्या या प्रेमकथेचा समावेश होतोच. एक टप्पा राज कपूर दिग्दर्शित ’बॉबी’ (1973) या मोकळ्या ढाकळ्या तरुण प्रेमपटाचा होता. तोही एकावन्न वर्षांनंतरही तारुण्यात. इतकेच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीचा अभ्यास करताना शोलेपर्यंतचा चित्रपट, आणि शोले ते डीडीएलजे असा एक स्थित्यंतरचा टप्पा आणि डीडीएलजे ते त्यानंतरचा काळ असा तो फोकस टाकायला हवा. चित्रपट अभ्यासक्रमात हेही महत्त्वाचे.
शोले असो वा दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे हे चित्रपट प्रदर्शित झाले तेव्हा ते असा बहुस्तरीय आणि अबब म्हणावा असा प्रवास करतील असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. तरी बरं चित्रपटसृष्टीत ज्योतिषी खूप आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा यांची रेलचेल भन्नाट आहे. चित्रपटाच्या जबरदस्त यशाने त्याची सगळीच समिकरणे बदलून टाकलीत, बदल ही तर केवढी तरी मोठी गोष्ट आणि तेच त्याचे वेगळेपण आहे आणि मोठेच यश आहे. सिनेमाच्या जगात तर यश म्हणजेच बरेच काही असते…शोले असो वा डीडीएलजे हे चित्रपट सिंगल स्किन, व्हिडिओ कॅसेट , व्हीसीआर, डीव्हीडी ते मल्टीप्लेक्स, मोबाईल स्क्रीन, ओटीटी असा प्रवास सुरू आहे, चित्रपट समीक्षक ते सोशल मीडियातील ट्रोलर (कधी कधी नकोतच त्यांच्या त्या उलटसुलट प्रतिक्रिया) अशी प्रगती आहे. पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधून मोठा चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड शोलेने तर दिवाळीत चकाचक चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेण्डही डीडीएलजेने आणला आणि त्यात शाहरूख खान ’मेन हीरो’ राहिलाय…शाहरुखचे फॅन्स यात बेहद्द खुश.
एक सुपर हिट चित्रपट बरेच काही पेरत असतो, घडवत असतोच. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हेही एक वैशिष्ट्य. जगभरातील मिडियातून शोले व डीडीएलजेच्या यशस्वी वाटचालीवर कधी ना कधी फोकस टाकावा लागला यात बरेच काही आले…आज शोले पन्नास वर्ष सेलिब्रेशननिमित्त आपल्याकडील अनेक यशस्वी चित्रपटांचा फ्लॅशबॅक समोर येत आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर अनेक जुने यशस्वी चित्रपट येताहेत आणि त्यानिमित्त त्या अनेक जुन्या चित्रपटांची होत असलेली चर्चा आपल्या चित्रपटाचा चौफेर वैभवशाली इतिहासच समोर आणत आहेत.
माझा कौल शोलेला! पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट असे त्याचे वर्णन करता येईल. पाच वा दहा वेळा जाऊ देत, किमान पन्नास शंभर वेळा शोले पाहणारे अनेक फिल्म दीवाने आहेत. डीडीएलजेदेखील अनेकांनी अनेकदा एन्जॉय केलाय. पण सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रावर शोलेचा भारी प्रवाह आहे….तोही कायम स्वरूपाचा!
– दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply