पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची जी वाटचाल राहिली आहे, त्यात केवळ निवडणूक जिंकणे हे आमचे तत्व किंवा उद्देश कधीच राहिला नाही, तर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला दिलेला शब्द आणि अभिवचने पूर्ण करणे हेच आमचे प्रमुख काम आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार समारंभात केले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि पनवेल महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार समारंभ पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडक नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम आणि पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, एखादी व्यक्ती पदावर किती काळ आहे, यापेक्षा त्या पदावर राहून त्याने लोकहिताची काय कामे केली यावरूनच त्याचे यश मोजले जाते. या कसोटीवर माझे सर्व सहाकरी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या आधारे यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला भाजप जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे, सरचिटणीस विनोद जोशी यांच्यासह इतर मान्यवर आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper