पनवेल : रामप्रहर वृत्त
सिन्नर (नाशिक) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. रायगडचे दोन्ही संघ तुल्यबळ असून खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. सर्वांनी एकजुटीने खेळ करत उत्तम यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, सराव शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देत स्पर्धेत यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल पुरुष व महिला संघांच्या वतीने त्यांचा क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तयारीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरुष व महिला कबड्डी संघाच्या सराव शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, संघ व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे, सुनील पाटील, विनोद नाईक, विश्वनाथ पाटील, संकेत म्हात्रे, मंदार मुंबईकर, विपुल मोकल, पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
सिन्नर (जि. नाशिक) येथे 2 ते 6 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाची सक्षम तयारी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सराव शिबिर दररोज सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत क्रीडांगणावर होत असून दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी पुरुष व महिला कबड्डी संघ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेसाठी सिन्नर, नाशिक येथे रवाना होणार आहेत.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper