Breaking News

स्टुडिओ अनेक गोष्टींसाठी ‘फेमस’ होता…

मुंबई वेगाने बदलतेय हे वेगळे सांगायला नकोच… त्या बदलात बरीचशी जुनी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जावून मल्टीप्लेक्सच्या कलरफुल संस्कृतीने जम बसवलाय. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो रेल्वे, नवीन मुंबईत विमानतळ, लांबलचक फ्लाय ओव्हर, उंचच उंच प्रचंड उंच इमारती, त्यात मिनी थिएटर, व्यायामशाळा व स्वीमिंग पूल असे केवढे तरी बदलच बदल. या शतकाच्या पहिल्या दशकात जन्माला आलेली पिढी याच मल्टीप्लेक्स, ओटीटी, वीकेण्ड पिकनिक, नवीन छान छान हॉटेल्सचा खानापिना, आयफोन यांची क्रेझी आहे. हृतिक रोशनची धडाकेबाज भूमिका असलेल्या वॉर 2 या चित्रपटाच्या वडाळा येथील आयमॅक्स मल्टीप्लेक्समध्ये पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता हाऊसफुल्ल गर्दी होती.
या बदलात आता एकेक करत करत काही जुने चित्रपट स्टुडिओ इतिहासजमा होताहेत. व्हीएफएक्स आणि एआय यांच्या युगात मोठ्या चित्रपट स्टुडिओची खरंच गरज आहे का, असाही एक प्रश्न आहेच म्हणा.
गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्तान स्टुडिओच्या विक्रीची बातमी जुन्या आठवणीत नेत असतानाच त्याचे पाडकामही सुरू झाले आणि अंथेरी पूर्वेकडील महाकाली येथील कमाल अमरोही स्टुडिओच्या (पूर्वीचे नाव कमालीस्तान स्टुडिओ) जागेवर वेगाने व्यावसायिक संकुल उभे राहताना दिसत आहे. यापाठोपाठ मुंबईतील आणखी एक चित्रपट स्टुडिओ काळाच्या पडद्याआड जात असल्याचे वृत्त समजले, पण त्यात फारसे आश्चर्य वाटले नाही आणि धक्कादेखील बसला नाही. मुंबईतील बॉम्बे टॉकीज (मालाड), नटराज (अंधेरी, पूर्व), फिल्मालय (आंबोली), कामराज (परेल), आर.के. (चेंबूर) असे अनेक चित्रपट स्टुडिओ हे एकेक करत बसस्थानकावरील नावापुरतेच राहिलेत हादेखील चित्रपटसृष्टीचा एक प्रवास आहे, तो स्वीकारायला हवाच.
फेमस स्टुडिओ पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्टेशनपासून फक्त एक बसस्थानक अंतरावर. चालत सात आठ मिनिटे. ई. मोसेज रोडवर अतिशय मोक्याच्या जागेवरचे ठिकाण. साडेसहा स्वेअर मिटर्स अशा जागेवर 2 जून 1943 रोजी या स्टुडिओच्या बांधकामास सुरुवात झाली आणि 1945 साली तो कार्यरत झाला. याची मालकी रुगढा कुटुंबियांकडे होती. यात चित्रीकरणासाठी मोठाच स्टेज, साऊंड रेकॉर्डिंग, मिक्सिंग, फोटो सेशन, म्युझिक सिटींग, मिनी थिएटर व अनेक लहान मोठ्या निर्मात्यांची कार्यालये ही या स्टुडिओची वैशिष्ट्य. चेतन आनंद, देव आनंद व विजय आनंद यांनी आपल्या नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली तेव्हा याच स्टुडिओत 147 क्रमांकाच्या जागेत त्यांनी आपले कार्यालय सुरू केले.
पहिलाच चित्रपट ‘अफसर’ (1950). साधारण सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत येथे नवकेतन फिल्मचे कार्यालय होते. मुंबईची सीमारेषा फार पूर्वी वांद्रे सायनपर्यंत असताना हा स्टुडिओ मध्यभागी होता. मग प्रथम अंधेरीपर्यंत आणि मग मुलुंड/बोरिवलीपर्यंत मुंबई उभी आडवी पसरताना हा स्टुडिओ एका बाजूस राहिला तरी सतत कार्यरत राहिला. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झालेच, पण मनोरंजन उपग्रह वाहिनीच्या युगात रिऍलिटी शो, म्युझिकल शोज, म्युझिक अल्बम यांचे अतिशय मोठ्याच प्रमाणावर सातत्याने चित्रीकरण होत राहिले. अनेक जाहिरातपटांचेही येथे चित्रीकरण होत राहिले.
फार पूर्वी येथे प्रसिद्ध चित्रपट प्रसिद्धीप्रमुख बनी रुबेन यांचे याच स्टुडिओत प्रशस्त कार्यालय होते. बनी रुबेन हे राज कपूरची आर.के. फिल्म, आनंद बंधुंची नवकेतन फिल्म, बी.आर. चोप्रा यांची बी.आर. फिल्म, यश चोप्रा यांची यशराज फिल्म, गुलशन रॉय यांची त्रिमूर्ती फिल्म, शक्ती सामता यांची शक्ती फिल्म अशा त्या काळातील आघाडीच्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या चित्रपटांची प्रसिद्धी यंत्रणा सांभाळत. त्यामुळे या फेमस स्टुडिओत अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पूर्वप्रसिद्धीचे कामकाज झाले आहे. अनेक मोठे निर्माते व दिग्दर्शक बनी रुबेन यांच्या भेटीसाठी फेमस स्टुडिओत येत व आपल्या चित्रपटाचे कॅम्पेन आखत. चित्रपट पब्लिसिटीत बनी रुबेन एक मोठं प्रस्थ. ते या स्टुडिओत रूजले.
या स्टुडिओच्या गौरवशाली इतिहासात ही गोष्ट विशेष उल्लेखनीय. बनी रुबेन यांना भेटण्यासाठी मी 1983 साली या स्टुडिओत पहिल्यांदाच गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत या स्टुडिओत सातत्याने जात होतो. मुंबईतील सर्वच लहान मोठ्या वा जुन्या काळातील अनेक स्टुडिओत माझे जाणे होत असल्याने आठवणी वेगळ्या आणि खूप.
याच स्टुडिओत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या मिनी थिएटरमध्ये अनेक मराठी व हिंदी चित्रपट पाहण्याचा मला सातत्याने योग येत आहे आणि त्यात काही आठवणीही आहेत. जॉन मॅथ्युज दिग्दर्शित ‘सरफरोझ’ या चित्रपटाच्या वेळेस एक रिळ मागेपुढे झाल्याने अचानक चित्रपट बराच पुढे गेला होता. अर्थात खेळ थांबवून मग ती चूक सुधारली. प्रियांका चोप्राने आपली भूमिका असलेल्या ‘व्हॉट्स युवर राशी’ या चित्रपटाचा आम्हा काही निमंत्रितांसाठी येथेच आयोजित केलेल्या शोला तिने प्रत्येकाचे हसून स्वागत केले आणि चित्रपट पूर्ण होईपर्यंत ती थांबली. अवधूत गुप्ते यांनी आपल्या ‘झेंडा’ या चित्रपटाची कलाप्रेमी राज ठाकरे यांजसाठी येथेच विशेष खेळाचे आयोजन केले होते. आम्हा चित्रपट समीक्षकांच्या खेळास येथे अनेक कलाकार उपस्थित राहिलेत. आता नवीन चित्रपटाच्या फर्स्ट लूक सोहळ्याचे येथे मोठ्याच प्रमाणावर आयोजन करण्यात येत असताना अनेक कलाकार या स्टुडिओत येतात. त्यामुळे नवीन पिढीतील सेलिब्रिटीजना फेमस स्टुडिओ माहीत होत गेला. फेमस स्टुडिओच्या ग्लॅमरमध्ये ती भरच म्हणायची. राणी मुखर्जी, प्रियाका चोप्रापासून पूजा सावंत, अमृता खानविलकरपर्यंत अनेक सेलेब्रिटीज फेमस स्टुडिओत आल्याचं विविध निमित्ताने मी पाहिले.
या मिनी थिएटरला लावलेली कृष्ण धवल अर्थात ब्लँक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटांच्या फोटोंनी जुन्या काळात डोकावण्याची उत्तम सोनेरी, रूपेरी, चंदेरी संधी मिळे.
याच स्टुडिओतील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे यात वरच्या मजल्यावर कामत फोटो फ्लॅशची लॅब होती, तर तळमजल्यावर मागील बाजूस कामत फोटो फ्लॅश यांचे अतिशय प्रशस्त कार्यालय होते. अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे सेटवरचे फोटो (त्याला स्टील फोटोग्राफी म्हणतात), चित्रपट पूर्ण होताच त्याच्या पूर्वप्रसिद्धीचे खास फोटोसेशन अशी कामत फोटो फ्लॅशची खास वैशिष्ट्य. त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचा चौफेर इतिहास जपलाय. कालांतराने त्यांचे कार्यालय अंधेरी पश्चिमेकडे गेले. दामोदर कामत हे कामत फोटो फ्लॅशचे जन्मदाते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा विद्याधर कामत यांनी ती धुरा यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे. अलिकडेच नरीमन पॉईंट येथील पिरामल कला दालनांत कामत फोटो फ्लॅशच्या वतीने भरवण्यात आलेल्या टाईमलेस फ्रेम या प्रदर्शनाच्या निमित्ताने फेमस स्टुडिओची आठवण आलीच. एखाद्या चित्रपट स्टुडिओचे असेही एक देणे असते.
फेमस स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक. येथेच जाहिरात क्षेत्रातील ख्यातनाम प्रल्हाद कक्कड यांचे कार्यालय होते आणि ते आपल्या स्टाफला सकाळी 7 वाजता येण्यास सांगत, कारण ते याच परिसरात राहत. फेमस स्टुडिओत अनेक वर्षे संकलन सुविधा उपलब्ध होती आणि त्यासाठी स्टेन बॅक मशिन होती. अनेक मराठी व हिंदी चित्रपट, जाहिरातपट यांचे संकलन येथेच झाले. काही वर्षांपूर्वी राणी मुखर्जीने याच स्टुडिओत केलेले फोटो सेशन खूप गाजले. गोष्ट छोटी वाटते पण खूप महत्त्वाची.
फार पूर्वी नवोदित कलाकार येथील निर्मात्यांच्या कार्यालयांना सदिच्छा भेट देऊन आपले फोटो देत. त्या काळात असे फोटोसेशन करणे अनेक नवोदित कलाकारांना महाग वाटत असे, पण निर्मात्यांना तर भेटायला हवे. फेमस स्टुडिओत तळमजल्यावरील कॅन्टीनमध्ये अधूनमधून सुशोभीकरण करण्यात येत असे. हे कॅन्टीन काहीसे उच्च दर्जाचे. जाहिरातीपटाच्या क्षेत्रात वावरणार्‍यांना आपलेसे वाटणारे. येथे अनेक जाहिरातींचे चित्रीकरण झाल्याचा हा परिणाम असावा. फेमस स्टुडिओ इतिहासजमा झाल्यावर तेथे तब्बल 69 मजली उत्तुंग इमारती उभ्या राहणार आहेत आणि ते अपेक्षितच आहे.
आज मुंबई उभी वाढतेय. उंच उंचच चकाचक इमारती उभ्या राहताहेत आणि त्यातील काहींच्या मुळाशी जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे आणि चित्रीकरणाचे स्टुडिओ आहेत. अगदी काही सेलिब्रिटीजचे बंगलेही असेच इतिहासजमा झाले. वांद्रे येथील टर्नर रोडवरील माला सिन्हाचा व कार्टर रोडवरील राजेश खन्नाचा आशीर्वाद बंगला पाडून तेथे उंच इमारत उभी राहिलीय.
जुन्या काळातील चित्रपटातील श्रेयनामावलीत मिक्सिंग फेमस स्टुडिओ असे कायमच वाचायला मिळेल. खरंतर मुंबईतील अशा पडद्याआड जात असलेल्या चित्रपट स्टुडिओवर एखाद्या माहितीपटाची निर्मिती व्हायला हवी. तो एक चित्रपटसृष्टीचा इतिहास आहे, जुन्या मुंबईची ओळख आहेत जुन्या काळातील अनेक चित्रपटासह पडद्यावर दिसणार आहे. हेही नसे थोडके. चित्रपट पाहताना त्यातील श्रेयनामावली वाचल्यानेही चित्रपट जगतातील अनेक संदर्भ मिळतात.
मुंबईतील फेमसचा इतिहास आणखी वेगळाही आहे. तो असा, फेमस स्टुडिओ (महालक्ष्मी). मोक्याच्या जागेवरील स्पॉट, महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ, समोरच अतिशय भव्य असे रेस कोर्स, एकिकडे सात रस्ता, तर दुसरीकडे वरळी अगदी जवळ. 79/80वर्षांपूर्वी हा स्टुडिओ सुरू झाला तेव्हाची मुंबई मात्र सायन चेंबूरपर्यंत होती. शांत वातावरण होते. चित्रपटसृष्टीदेखील हळूहळू आकार घेत होती.
फेमस पिक्चर्स चित्रपट निर्मिती संस्था व रेकॉर्डिंग स्टुडिओ दादरला कीर्ती कॉलेजजवळ होता. तो फार पूर्वीच पाडण्यात आला… संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांच्या जसं घडलं तसं या आत्मचरित्रात याबाबत त्यांच्या स्वानुभवासह बरीच उपयुक्त माहिती मिळते.
फेमस रेकॉर्डिंग ताडदेव येथे होते. सरदार पावभाजी शेजारी. ते केव्हाच बंद होऊन तेथे बँक आली आहे…. तेथील गाण्याच्या रेकॉर्डिगच्या आठवणी अनेक. उदाहरणार्थ अरविंद सामंत निर्मित व राजदत्त दिग्दर्शित माझं घर माझा संसार या चित्रपटाच्या गाण्यांचे रेकॉर्डिग मी येथे अनुभवलय.
तीनही फेमस आता इतिहासजमा झालेत. महालक्ष्मीचा फेमस स्टुडिओ आता बसस्थानकापुरता राहिलाय. कारदार स्टुडिओ (परळ), आर.के. स्टुडिओ (चेंबूर), कमालिस्तान स्टुडिओ (महाकाली), बॉम्बे टॉकीज (मालाड) मुंबईतील असे अनेक चित्रपट स्टुडिओ असे बसस्थानकाच्या नावाने ओळखले जात आहेत, त्यात एक भर. चित्रपटाचा इतिहास सांगताना त्यात मुंबईतील अतिशय जुन्या काळातील स्टुडिओपासूनचा फ्लॅशबॅक असावा.

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply