उलवे नोड : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत गावच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहणानंतर ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचन करून ते कायम करण्यात आले तसेच शासनाकडील परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. सन २०२६-२७साठी कर आकारणी (डिमांड) मंजूर करण्यात आली. ग्रामस्थांकडून आलेल्या विविध अर्जांवरही चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले.
उलवे नोड सेक्टर १२मधील प्लॉट क्र. ४वर प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या विषयावर ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली. सिडको या जागेसाठी आकारत असलेले पाच कोटी ३४ लाख रुपये देण्यास ग्रामस्थांनी ठाम विरोध करत एकमताने ठराव मंजूर केला. यापूर्वी इतर सामाजिक व धार्मिक संस्थांना नाममात्र एक रुपया दराने जागा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर शिवरायांच्या पुतळ्यासाठी असलेल्या जागेला तसेच रामशेठ ठाकूर मैदानालाही एक रुपया दर लागू करावा, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. या संदर्भात ग्रामपंचायतीमार्फत सिडकोला अधिकृत पत्र पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याचप्रमाणे प्लॉट क्र.४ व प्लेग्राऊंड प्लॉट क्र. ६ या जागांसाठी कंपाऊंड उभारणीबाबत सिडकोकडे पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या दोन्ही विषयांवर एकमताने ठराव संमत केला.
यावेळी अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, माजी सदस्य हरिभाऊ पाटील, रत्नप्रभा घरत, माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, सचिन घरत, हेमंत ठाकूर, अजय भगत, विश्वनाथ कोळी, वसंत म्हात्रे, हेमंत पाटील, वैभव देशमुख, अमृत भगत आदी उपस्थित होते. ग्रामसभेत ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
Check Also
युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …
RamPrahar – The Panvel Daily Paper