अशोक सराफ व निवेदिता यांच्या अंधेरीतील घरी जाण्याचा योग कायमच सुखावह असतोच, पण त्याबरोबरच त्यांच्या घरी असलेले पुरस्कार लक्षवेधक ठरतात. ते त्यांनी आपली गुणवत्ता, मेहनत, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन यातून मिळवले आहेत. अशोक सराफ यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने, भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झी चोवीस तास या वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सोहळा अतिशय उत्तम रितीने रंगला. अशोक सराफ यांचा त्यांच्या पंचावन्न वर्षाच्या अष्टपैलू बहुरूपी वाटचालीत राजा चित्रपट महोत्सवात अनेकदा तरी सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, राज्यातील अनेक मान्यवर संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आणि असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या घरात प्रवेश करताच आपले स्वागत करतात. निवेदिता सराफ यांनीही आपल्या यशस्वी वाटचालीत अनेक पुरस्कार प्राप्त केले. ते पुरस्कारदेखील लक्ष वेधून घेतात. अशा पद्धतीने आपल्या पुरस्कारांची मांडणी करणे म्हणजे त्या पुरस्कारांचा आदर करणे असेदेखील आहे.
आणखी एक गोष्ट सांगतो, राजेश खन्ना ’चित्रपटाच्या सेटवर’ मुलाखत देण्यापेक्षा खारच्या आपल्या आशीर्वाद फिल्मच्या अतिशय प्रशस्त चकाचक ऑफिसमध्ये आम्हा सिनेपत्रकारांना अगदी सवडीने आणि एका दिवशी एकाच पत्रकाराला स्वतंत्रपणे आणि सविस्तर मुलाखत देणे पसंत करे. छान अनुभव असे. स्वारीचा मूड चांगला हवा इतकेच. (कुछ भी पुछो हे त्याचं स्वातंत्र्य जास्त भारी होतं), पण व्हायचं काय? त्याच्यापेक्षा त्याच्या उबदार खुर्चीमागे असलेल्या सिल्व्हर वा गोल्डन ज्युबिली ट्रॉफिजकडे जास्त लक्ष जायचं. बरं त्याचे इतके पिक्चर्स सुपर हिट की त्या ट्रॉफिजच त्याचं यश सांगत होत्या. बंधन, आराधना, आनंद, दो रास्ते, इत्तफाक, सफर, अमर प्रेम, कटी पतंग, हाथी मेरे साथी, आन मिलो सजना, मर्यादा, आप की कसम, सच्चा झूठा, प्रेम नगर, दुश्मन, दाग, रोटी, अजनबी, नमक हराम अशा अनेक चित्रपटाच्या यशाच्या ट्रॉफी राजेश खन्नाचे सुपर स्टार वैभव सांगत होत्या. आनंद चित्रपटासाठीचा फिल्म फेअर पुरस्कार लक्षवेधक होता. स्मृतीचिन्ह बोलतात असे म्हटले तरी चालेल. यशाची ती वैशिष्ट्यपूर्ण आठवण असते.
सुलोचनादिदींच्या घरीही अशाच अनेक मराठी व हिंदी चित्रपटांच्या यशाच्या ज्युबिली ट्रॉफिज लक्ष वेधून घेणार हे ठरलेलेच. त्या मांडणीतील आत्मियता मला कायमच जाणवे. आणि त्यांनी अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारल्यात हेही त्यात अधोरेखित होई. कलाकाराचे घर असावे तर असे असं कायमच मला वाटतं आलं. सुलोचनादिदी यांच्याशी त्या स्मृती चिन्हाच्या सहवासात गप्पा रंगणार हा अनुभव लिहितांना वेगळाच आनंद मिळे. एखाद्या कलाकाराचे घर असावे तर असे हे मनात यायलाच हवे.
आमच्या गिरगावातील जुन्या रॉक्सी थिएटरमध्ये अनेकदा पिक्चर पाह्यला जाणे होई. तेव्हा लॉबी कार्ड्स, शो कार्ड्सबरोबरच एका शोकेसमधील ज्युबिली हिट ट्रॉफिज बघण्यात विशेष आनंद होई. खरंतर प्रत्येक वेळी त्याच त्याच अथवा त्यात आणखीन एकादी नवीन भर पडे इतकेच, पण पुन्हा पाहण्यातही गंमत असे. एक फूल दो माली, आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, कुंवारा बाप, स्वर्ग नरक, एक दुजे के लिए यांच्या ज्युबिली हिट ट्रॉफिज असत… प्लाझा चित्रपटगृहातही अनेक मराठी चित्रपटांची स्मृतीचिन्ह पहायला मिळतात. विशेषतः अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, आत्मविश्वास, हमाल दे धमाल, धडाकेबाज, थरथराट या चित्रपटांची स्मृतीचिन्ह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ती पाहत असतानाच मला प्लाझा चित्रपटगृहातील अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज यांचे दिलखुलास, उत्साही प्रीमियर खेळही आठवतात. प्लाझा चित्रपटगृहाच्या बाल्कनीत चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व आम्ही चित्रपट समीक्षक एकत्र असू आणि खाली स्टॉल, अप्पर स्टॉल येथे चित्रपट पाहण्यासाठी झालेली जनसामान्य प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी असे. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून हा चित्रपट रसिकांना आवडतोय, तो नक्कीच सुपरहिट ठरणार आणि प्लाझा चित्रपटगृहात यशाची आणखी एक ट्रॉफी येणार याची जणू खात्रीच पटे. तो विश्वास खराच ठरे. चित्रपटांचे प्रीमियर असे जनसामान्यांसोबत व्हावेत असे म्हणूनच मनोमन वाटते.
राजकमल कलामंदिर स्टुडिओत आजही राजकमल फिल्मच्या दो आंखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, नवरंग, पिंजरा यांच्या ज्युबिलीसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार लक्ष वेधून घेतात. ते एक प्रकारचे वैभव आहे. इतिहास आहे, आठवणी आहेत.
चित्रपट स्टुडिओ, रेकॉर्डिंग स्टुडिओ, निर्माता व दिग्दर्शकांची कार्यालये, कलाकारांची घरे, एकाद्या तंत्रज्ञाचे घर, तेव्हाची पारंपरिक सिंगल स्क्रीन थिएटर्स यात अशा अनेक ट्रॉफिज पहायला मिळत. तो एक वेगळाच आनंद असे. तीदेखील एक छान संस्कृतीच.
पिक्चर हिट झाले रे झाले एक ट्रॉफिज आपल्याकडे येणार याची खात्री असे आणि त्याचा सोहळाही छान रंगे. यशाचे सेलिब्रेशन करावे ते फिल्मवाल्यांनी. माझ्या आठवणीत मी अनुभवलेले असे अनेक ज्युबिली हिट ट्रॉफिज देण्याचे इव्हेन्टस आहेत.
दादा कोंडके यांनी जितेंद्रच्या शुभ हस्ते ’पळवापळवी’च्या सिल्व्हर ज्युबिली हिट ट्रॉफिजचे दिलखुलास वितरण केले. कौतुकाची गोष्ट अशी, दादांनी या इव्हेन्टसला अशोक सराफ, सचिन पिळगावकर व महेश कोठारे यांनाही आवर्जून आमंत्रित केले. नेमका त्या दिवसांत लक्ष्मीकांत बेर्डे कोल्हापूरला होता. अन्यथा त्या काळातील ’टॉप फाईव्ह’ एकाच सोहळ्यात असा मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय दुर्मिळ योग आल्याचे आणि भेटीचा योग आला असता.
जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये किरण शांताराम निर्मित व सचिन पिळगावकर दिग्दर्शित ’अशी ही बनवाबनवी’च्या गोल्डन ज्युबिली हिटच्या ट्रॉफिज चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमार यांच्या शुभहस्ते देण्यात आल्या, तेव्हा व्ही. शांताराम व दिलीपकुमार यांना एकत्र पाहणे, ऐकणे, अनुभवणे, डोळ्यात साचवणे हा आयुष्यभर जपून ठेवावा असाच क्षण ठरला. चित्रपटाची यशोगाथा अशीही पुढे वाटचाल करत असते. अशी ही बनवाबनवी आजही चालणारे हुकमी नाणे आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुवर्ण महोत्सवी सोहळा अतिशय उत्तम रंगला हे आठवतेय.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित ’एकापेक्षा एक’च्या ज्युबिली हिट सोहळ्यास निर्माते सतिश कुलकर्णी यांनी खास अमिताभ बच्चनलाच आमंत्रित करण्यात यश प्राप्त केले. अमिताभची ही मराठीतील पहिली उपस्थिती. आदबशीर अशी शाल लपेटून अमिताभ आला होता. मला आठवतंय त्याच दिवशी त्याची भूमिका असलेला मुकुल आनंद दिग्दर्शित ’हम’ प्रदर्शित झाला. अमिताभच्या येण्याने ’एकापेक्षा एक’च्या यशाची उंची आणखी वाढली. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शानदार सोहळ्यात प्रसन्न वातावरण होते. मी ते अनुभवले आहे.
विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ’माहेरची साडी’ची सक्सेस पार्टी अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उशिरापर्यंत रंगली. खासदार सुनील दत्त पाहुणे होते, तर विजय कोंडके यांनी आवर्जून हिंदी चित्रपटसृष्टीतील जी.पी. सिप्पी, शक्ती सामंता अशा अनेक बड्या हस्तींना बोलावून मराठीचं वैभव त्यांना दाखवले. नाझ चित्रपटगृह इमारतीमधील अनेक वितरकांची कार्यालयात व मराठी चित्रपटसृष्टीत या पार्टीची बरेच दिवस रंगतदार चर्चा होती. अलका आठल्येच्या घरी अनेक ट्रॉफीज आहेत हे वेगळे सांगायला नकोच. त्यात ‘माहेरची साडी’ची ट्रॉफी विशेष लक्ष वेधून घेते.
एन. चंद्रा दिग्दर्शित ’प्रतिघात’च्या ज्युबिली हिट पार्टीचे राजश्री प्रॉडक्सन्सच्या वतीने आयोजन गेट वे ऑफ इंडियाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करताना ’ओली पार्टी’ न करता फक्त ट्रॉफिज वाटप आणि शाकाहारी मेन्यू असा ठेवल्याची बरेच दिवस ’सुकी सुकी’ चर्चा रंगली. हे वेगळेपणही म्हणता येईल. ज्युबिली हिटची पार्टी म्हणजे शॅम्पेन आणि स्कॉचच हवी असे थोडेच आहे? ती असेल तर क्या बात है. रात्री उशिरापर्यंत ओली पार्टी आणि नवे गॉसिप. अनेक किस्से.
गुलशन रॉय हे त्या काळातील चित्रपट निर्मिती (त्रिमूर्ती फिल्म) आणि वितरण (मॉडर्न मुव्हीज) यातील मोठे प्रस्थ. त्यांनी आपला पुत्र राजीव रॉय दिग्दर्शित ’त्रिदेव’च्या यशाची केम्प्स कॉर्नरच्या हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला पिक्चरमधील सगळ्या स्टार कास्टने हे यश भारीच एन्जॉय केले.
पिक्चर ज्युबिली झाले की आता पार्टी हमखास हे समीकरण त्या काळात एकदम हिट होते. आणि तो सगळाच आँखो देखा हाल माझ्यासाठी सुखद पर्वणीच ठरला. तेवढ्या आठवणींची साठवणी माझ्याकडे वाढत वाढत गेली, त्याचं व्याज आज मला मिळतंय. त्या लाईव्ह आठवणी आज मी नवीन पिढीसमोर आणतोय.
पिक्चर आजही सुपर हिट होताहेत. शंभर दोनशे कोटी सहज जमतात असे यशाच्या बातम्यात असते. आकडा वाढतही जातो, पण ते ज्युबिलीचे दिवस इतिहासजमा झालेत. जास्तीत जास्त चार सहा आठवडे हिटचा मुक्काम. पण ’हिटची ट्रॉफिज’ही आठवणीत गेली. हेही ठीक हो, पण अनेकदा हिटच्या ओल्या पार्टीत फक्त आणि फक्त त्या चित्रपटातील वरच्या अथवा पहिल्या फळीतीलच आमंत्रित असं का? चित्रपट निर्मिती हे भलं मोठ टीमवर्क आहे. पूर्वी अशा इव्हेन्टसमध्ये अनेक टेक्निशियन्स आणि मुंबईसह बाहेरगावच्या थिएटरवाल्यानाही ट्रॉफिज आवर्जून प्रेमाने ट्रॉफिज दिली जाई आणि त्यांचा चित्रपटाच्या यशातील सहभाग मोलाचा मानला जाई. अशी ही बनवाबनवीच्या सुपर हिटची रंगभूषाकार मोहन पाठारे याला स्मृतीचिन्ह स्वीकारल्याचा आनंद आजही तो व्यक्त करतोय. हीच आपल्या कामावरची निष्ठा असते. असे अनेक रंगभूषाकार, कला दिग्दर्शक, वेशभूषाकार या मनोरंजन क्षेत्रात आहेत. जे अनुभवतोय तेच सांगतोय हो. प्रत्येक पिक्चर हिट व्हायला हवा. त्याच्या आनंद सोहळ्यात सर्वांनाच सहभागी करता यायला हवे. बघा पटतंय का?, प्रत्येक स्मृतीचिन्ह केवळ एक आठवण नसते तर ती एक भावनिक ओढ असते. आपण केलेल्या प्रगतीचा चढता आलेख असतो. तो प्रचंड उर्जा देतो. मनोमन सुखावतो. एक ट्रॉफी एक आठवण असते. मग ती गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ची शंभर आठवडे पूर्ण झाल्याची असेल तर चित्रपट रसिक आठवणीत जातात, चित्रपटाच्या यशात प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग असतोच…
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper