Breaking News

‘बॉर्डर 2’ लोकप्रिय होतोय तोच ‘बॉर्डर 3’ची तयारी

आपल्या चित्रपटसृष्टीला आता जराही उसंत अशी नको झालीय… ‘बॉर्डर 2’ आज देश विदेशात लोकप्रिय ठरलाय तोच ‘बॉर्डर 3’ पडद्यावर आणणार आहोत याची जे.पी. फिल्मची निधी दत्ता आणि टी सिरीजचे भूषणकुमार यांनी घोषणा केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होत आहे…
‘बॉर्डर 2’मध्येही 1971 सालचे पाकिस्तानवर विजय मिळवला त्याचं जमिनीवरील युद्ध, हवेतील युद्ध आणि समुद्रातील युद्ध आपल्याला रोमांचक पद्धतीने पहायला मिळते. त्या युद्धावर जाताना त्या तीनही दलाच्या जवानांना त्यांची आई वेगळ्या पद्धतीने आशीर्वाद देते ही गोष्ट खास उल्लेखनीय,
एक आई म्हणते : बेटा युद्ध के लिए जा रहा है. यावर मुलगा म्हणतो, मुझे आशीर्वाद दो की दुश्मनों को मार करके ही वापस आऊं. मां कहती है – बेटा तुम्हारे दुश्मनों की भी तो कोई मां होगी. वे भी अपनी मां से लम्बी उमर का आशीर्वाद लेकर आये होंगे.
दुसरी आई म्हणते : मैं कभी नहीं चाहती थी कि मेरा बेटा भी तुम्हारी तरह फौज में जाए, लेकिन जिस दिन मैंने उसे फौज की वर्दी पहने शपथ लेते हुए देखा -मुझे उस पर बड़ा फ़ख़्र हुआ.
तिसरी आई म्हणते, जाओ, दोनों जंग जीतकर आओ. एक यह जंग और दूसरी जो तुम्हारे भीतर चल रही है.
चित्रपटाच्या उत्तरार्धात आपल्याला अतिशय थरारक असे युद्ध पहायला मिळते. त्यासाठी व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला असून त्याचा विलक्षण प्रभाव पडद्यावर दिसतो.
जहाँ से भी घुसोगे सामने हिन्दुस्थानी फौजी खडा पाओगे… जे.पी. दत्ता निर्मित आणि अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’च्या टीझरला अतिशय वेगाने लाईक्स वाढल्या आणि तेव्हाच या चित्रपटाचं व्यावसायिक यश स्पष्ट झाले. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला नवीन चित्रपटांचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर जास्त महत्त्वाचे. ‘धुरंदर’पाठोपाठ ‘बॉर्डर 2’ने तेच अधोरेखित केले.
या युद्धपटात सनी देओल, वरुण धवन, आयुष्यमान खुराणा, अहान शेट्टी, दिलजीत दोसाझ इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. जे.पी. दत्ता दिग्दर्शित बॉर्डर (1997) या चित्रपटाचा दुसरा भाग बॉर्डर 2 आणि आता तिसरा भाग बॉर्डर 3ची तयारी…
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत युद्धपटाची यशस्वी परंपरा आहे. एक विशेष उल्लेखनीय युद्धपट सांगायचा, तर अब तुम्हारे हवाले वतन साथियो… चित्रपटाच्या क्लायमॅक्सला हे गाणे पडद्यावर येते आणि चित्रपटगृहातील प्रेक्षक भावनाविवश होत असतानाच त्यांच्यातील देशभक्तीची भावना विलक्षण जागी होते. चित्रपटाचा योग्य असा परिणाम झालेला दिसत असतो. ते कमालीचे स्तब्ध झालेले असतात. येथे दिग्दर्शक दिसतो असेही म्हणता येईल.
चेतन आनंद दिग्दर्शित ’हकिकत’ (मुंबईत रिलीज 20 एप्रिल 1964. मेन थिएटर रॉक्सी)च्या विलक्षण प्रभावाने प्रेक्षक अंतर्मुख झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिला युद्धपट. हा एक क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. 1962 साली भारत आणि चीन यांच्यातील युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. आपण यावर चित्रपट निर्माण करावा असे चेतन आनंदना वाटले, पण युद्धासारख्या वास्तव घटनांवर आधारित चित्रपट निर्माण करायचा तर शासनाची परवानगी हवी आणि युद्धपट निर्माण करायचा तर तसे बजेट हवे. सुदैवाने चेतन आनंदना दोन्हीत प्रयत्नपूर्वक का होईना पण यश प्राप्त झाले. तेव्हाच्या पंजाब सरकारकडून आर्थिक मदत झाली, तर केंद्र शासनाकडून लडाख येथे चित्रीकरणाला परवानगी मिळाली.
या चित्रपटासाठी विजय आनंद कास्टिंग दिग्दर्शक होता. चेतन आनंद व विजय आनंदने ’हकिकत’चे कलाकार निश्चित केले. बलराज साहनी, जयंत असे अनुभवी, धर्मेंद्रसारखा तोपर्यंत चित्रपटसृष्टीत हळूहळू जम बसवत असलेला कलाकार, खुद्द विजय आनंद याबरोबरच नवखा संजय खान, सुधीर, इंद्राणी मुखर्जी यांच्यासह प्रिया राजवंश. तेव्हा ती इंग्लंडची रहिवाशी होती, तिकडे Royal Academy of Dramatic art यात कार्यरत होती, अभिनयाची आवड होती आणि आपणास हिंदी चित्रपटात काम करायचयं असे तिने चेतन आनंद वगैरेना पत्र लिहिले होते. चेतन आनंदनी तिला प्रतिसाद दिला आणि ती मुंबईत आली.
शूटिंगची तयारी, कलाकारांची निवड हे होत असतानाच कैफी आझमी यांच्या गीतांना मदन मोहनचे संगीत, गाण्याचे रेकॉर्डिंग हे सगळे झाले. मदन मोहननी दिल्लीत एका हॉटेलमध्ये भूपिंदर सिंगला गिटार वाजवताना पाहिले. त्याला मुंबईत मोहम्मद रफींसोबत हो के मजबूर हमे हे गाणे गायला बोलावले, पण चारच ओळींची संधी मिळाल्याने तो नाखूष होता. चित्रपटातही त्याला छोटीशी भूमिका मिळाली.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या कलाकारांना या चित्रपटात मानधनाशिवाय काम करायचे ठरवले. अब तुम्हारे…. गाणे चित्रपटाच्या अगदी शेवटी असावे, अतिशय चांगला परिणाम साध्य होईल असे कैफी आझमीचे म्हणणे होते. चेतन आनंदना ते मान्य नव्हते. हा निर्णय साहसी वाटत होता. तोपर्यंत हिंदी चित्रपट फारशी चौकट मोडत नव्हता. पण हा निर्णय योग्य ठरला. या चित्रपटाला या गाण्याने अधिकच उंचीवर नेले आणि तेव्हापासून हे राष्ट्रभक्तीने प्रेरीत गाणे म्हणून ओळखले जाते. प्रत्येक राष्ट्रीय सणाला लाऊडस्पीकरवर हे गाणे हमखास लावले जाऊ लागले. अशा भारावलेपणाने चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या रसिकांनी या चित्रपटाचे विलक्षण कौतुक केले. माऊथ पब्लिसिटीवर हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचत राहिला यात आश्चर्य नाही. इतकेच नव्हे तर या चित्रपटावर त्यानंतर वारंवार मुद्रित माध्यमातून लिहिले गेले, याची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत राहिली त्यामुळे हा चित्रपट पुढील पिढीतही जात राहिला. मी स्वतः सत्तरच्या दशकात मॅटीनी शोला, गल्ली चित्रपटात पुन्हा पुन्हा पाहिला. या चित्रपटाचे मेकिंगच भारावून टाकणारे आहे. हा चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात असून या चित्रपटात तो रंग काही वेगळाच अनुभव देणारा ठरतो. हा एक उत्तम आदर्श युद्धपट म्हणून गणला जातो.
या चित्रपटात बलराज साहनी (मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र (कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद (मेजर प्रताप सिंग) तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील जरा सी आहट होती है (पार्श्वगायिका लता मंगेशकर), अब तुम्हारे हवाले वतन साथियो (मोहम्मद रफी), हो के मजबूर मुझे ( मोहम्मद रफी, भूपेन्द्र सिंग), मै यह सोचकर (मोहम्मद रफी), आई अबके साल दीवाली (लता मंगेशकर) ही या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. अनेक यशस्वी चित्रपट गाण्यांच्या लोकप्रियतेने सतत पुढील पिढीला माहिती होत राहिले. 1965 साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दुसर्‍या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तर 2012 साली आधुनिक तांत्रिक सोपस्काराने हा चित्रपट रंगीत करण्यात आला तरी मूळ ब्लॅक अँड व्हाईट काळातील चित्रपट ही त्याची ओळख जास्त प्रभावी आणि पहिला युद्धपट हा ठसा जास्त उल्लेखनीय.
चेतन आनंद यांनी दशकभरानंतर ’हिन्दुस्थान की कसम’ (1973) हा 1971च्या भारत व पाकिस्तान यांच्यातील युध्दावर आधारित युध्दाच्या अधिकाधिक साहसी दृश्यांचा युध्दपट दिग्दर्शित केला, पण तो ’हकिकत’चा दर्जा साध्य करु शकला नाही… हकिकत म्हणताक्षणीच या युध्दपटातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, काही भावस्पर्षी दृश्यही आठवतात आणि त्यातील गाणी ओठांवर येतात तर मग आणखी काय हवे.
आपल्या देशात हॉलीवूडच्या दर्जाचे अस्सल थरारक युध्दपट निर्माण होत नाहीत, असे म्हणणारा एक वर्ग आपल्या देशात आहे.
आदित्य धर दिग्दर्शित ’उरी द सर्जिकल स्ट्राईक’ (2018) हा आजच्या मल्टीप्लेक्स युगातील लक्षवेधक आणि प्रभावी असा युध्दपट आहे.
1971 साली बांगलादेश निर्माण झाला तेव्हाच्या भारताने युध्दात पाकिस्तानवर मात करत देदीप्यमान विजय प्राप्त केला तेव्हा संपूर्ण देशभरात एक वेगळेच सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते आणि तेव्हा मोठ्याच प्रमाणावर देशभक्तीवरचे चित्रपट निर्माण झाले. काही विशेष उल्लेखनीय चित्रपट सांगायचे तर रामानंद सागर निर्मित व दिग्दर्शित ’ललकार’ (1972), चेतन आनंद दिग्दर्शित ’हिन्दुस्तान की कसम’ (1973), जे. ओम प्रकाश निर्मित ’आक्रमण’ (1975)मध्ये सैनिक आणि युध्द यांच्या पार्श्वभूमीवरील प्रेमाचा त्रिकोण होता. संजीवकुमार, रेखा व राकेश रोशन हे कलाकार होते.
अभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक जोगिंदर याने सैनिकाच्या आयुष्यावर आधारित ’फौजी’ हा चित्रपट निर्मित व दिग्दर्शित केला. सुनील दत्त दिग्दर्शित ’डाकू और जवान’ हा चित्रपट याच काळात निर्माण झाला. त्या काळात अनेक चित्रपटात लहान मोठ्या संदर्भात या युध्दाचा प्रभाव दिसे. आय.एस. जोहरने चक्क ’जोय बांगलादेश’ या नावाचा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाची त्याने मोठ्याच प्रमाणावर पब्लिसिटी केली, पण सेन्सॉरने या नावालाच हरकत घेतली त्यामुळे या चित्रपटाचे नाव बदलून ’आगे बढो’ असे करण्यात आले. याशिवाय ’मेरा देश मेरा धरम’ वगैरे चित्रपट त्या काळात पडद्यावर आले.
याच युध्दाच्या पार्श्वभूमीवरचा जे. पी. दत्ता दिग्दर्शित ’बॉर्डर’ (1997)ला पिरियड चित्रपट असेही म्हणता येईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 साली झालेल्या युद्धावर आधारित चित्रपट. या युद्धातील लोंगोवाल करार, भारतीय सैन्याचा विजय, जवानांना येत असलेली घरची आठवण, पत्रातून मनमोकळेपणाने भावना व्यक्त करण्याचं माध्यम, युद्धभुमीवरचे वातावरण याभोवती हा चित्रपट आहे. जे.पी. दत्ताने एकूणच या संदर्भात भरपूर माहिती मिळवली. त्या युध्दाशी संबंधित हयात असलेल्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ही एक मोठी प्रक्रिया असते. प्रत्यक्ष घटनेवर आधारित चित्रपट असल्याने तर अधिकाधिक योग्य ती माहिती, तपशील, संदर्भ मिळवणे आवश्यक होते. 1995च्या सप्टेंबरमध्ये पटकथेवर काम सुरु केले आणि ते 1996च्या एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे सात महिने चालले. हे सगळे होत असताना चित्रपटासाठी तंत्रज्ञ आणि कलाकारांची निवड याची प्रक्रिया सुरु होते. महत्त्वाचे होते ते कला दिग्दर्शन आणि छायाचित्रणकार. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण राजस्थानातील बिकानेर आणि जोधपूर येथे करायचे होते. कला दिग्दर्शन रत्नाकर फडके यांचे तर छायाचित्रण ईश्वर बिरदी आणि निर्मल जानी यांचे आहे. हे सगळे होत असताना भारतीय लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून बरीच मदत झाली. थीमनुसार अनेक तपशील, गोष्टी, संदर्भ तर मिळालेच, पण युद्धातील वाहने, रायफल, मशीनगन, गणवेश यांची बरीच माहिती मिळाली. 1971च्या युद्धावर आता पंचवीस वर्षानंतर चित्रपट आकार घेत होता. त्याबरोबरच तेव्हाच्या युध्दातील सामुग्रीची माहिती महत्वाची होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानी टाईप 59 सारख्या टी 55 टाक्या, ब्रेन मशीनगन, एसएलआर सारखी शस्रे, हॉकर हॅटर्स, मिग 21 याची माहिती दिली आणि मग त्यानुसार बरीच तयारी करावी लागली. इतका मोठा युध्दपट सहजी आकाराला येत नाही हेच खरे. अनेक संदर्भ, पटकथा, विविध स्तरांवरील परवानगी, उच्च दर्जाचे छायाचित्रण, तंत्रज्ञान असं करत करत युद्धपट आकार घेत जातो.
चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला असताना सर्वप्रथम गाजले ते जावेद अख्तर लिखित आणि अन्नू मलिकने स्वरबद्ध केलेल्या ’संदेसे आते है, हमे ले जाते है’ हे गाणे. आजही हे गाणे लोकप्रिय आहे. युद्ध सीमेवरील जवान आणि त्यांचे दूरवर राहत असलेले कुटुंबिय यांच्यातील संपर्काचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे पत्र. हे एकमेकांची ख्याली खुशाली विचारणारे आणि कळवणारे पत्र म्हणजे कमालीची भावनिक ओढ. उत्कट नाते. मनमोकळ्या होत असलेल्या भावना. ‘बॉर्डर 2’मध्येही या गाण्याचा तशाच उत्कटतेने पटकथेत समावेश करण्यात आला आहे.
’बॉर्डर’ची पूर्णतेची आणि कॅसेट रिलीजची जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील जंगी पार्टी मला आजही आठवतेय. एक अतिशय भव्य युध्दपट येतो आहे हे या वेळी याची गाणी पाहताना (त्या काळात नवीन चित्रपटाची अशी गाणी दाखवण्याची प्रथा होती.) जाणवले.
या चित्रपटात सनी देओल (मेजर कुलदीपसिंह चांदपुरी), जॅकी श्रॉफ (विग कमांडर एंडी बजवा), सुनील शेट्टी (कॅप्टन शेखावत), अक्षय खन्ना (सेकंड लेफलन्ट धरमवीर) यांच्यासह राखी गुलजार, तब्बू, पूजा भट्ट, कुलभूषण खरबंदा, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, राजीव गोस्वामी, अमृत पाल इत्यादींच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी तेव्हा त्या सोहळ्याचा अनुभव घेतला असता चित्रपटाशी संबंधित सगळेच जुन्या आठवणीत रमल्याचे आणि थोडेसे भावूकही झाल्याचे जाणवले. एखाद्या कलाकृतीशी असे जोडलेले असणे या ग्लॅमरस क्षेत्रातील एक प्रकारचे माणूसपण आहे.
’बॉर्डर’नंतरच्या दिग्दर्शक जे.पी. दत्ताच्या चित्रपटातील ’एलओसी कारगील’ (2003) आणि ’पलटण’ (2018) या युध्दपटांवर प्रचंड मेहनत घेतली, खूप खर्च केला, पण त्यांना ’बॉर्डर’ची उंची गाठता आली नाही… युद्धपटाची दखल घेताना ही नावे आवर्जून घ्यायला हवीत, गुंजन द कारगील, लक्ष्य, शेरशाह, भुज द प्राईड ऑफ इंडिया, कॅप्टन इंडिया, सॅम बहादूर, मेजर टॅन्गो चार्ली, पिप्पा वगैरे वगैरे. आदित्य धर दिग्दर्शित ’उरी द सर्जिकल स्ट्राईक’ (2019) हा अलिकडचा अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा युध्दपट आहे. पाकिस्तानने 2017 साली सीमारेषेवर हल्ला करणे, भारतीय भूमित शिरणे अशा काढलेल्या कुरापतींना भारतीय जवानांनी अतिशय निडरपणे हे आव्हान परतवून लावले आणि सतत डावपेच बदलत जे यश संपादन केले हा सगळा थरार या चित्रपटात आहे. या चित्रपटात विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहे. युद्धपटात थीमनुसार वातावरण निर्मिती खूपच महत्वाची असते. हे वातावरण एक प्रकारची व्यक्तिरेखाच असते.
’हकिकत’ आणि ’बॉर्डर’ हे हिंदीतील सर्वोत्कृष्ट युद्धपट आहेत. ते आठवले तरी देशभक्तीची भावना जागी होते आणि ते पाहताना स्फुरण चढते.
चेतन आनंद निर्मित व दिग्दर्शित ‘हिन्दुस्तान की कसम’ची कैफी आझमीची गाणी व मदन मोहनचे संगीत हे तर अप्रतिम. हर तरफ अब यही अफसाने है (पार्श्वगायक मन्ना डे), है तेरे साथ मेरी वफा (लता मंगेशकर) ही क्लासिक गाणी अगदी आवर्जून वेळ काढून ऐकावी. चित्रपटात राजकुमार, प्रिया राजवंश इत्यादींच्या प्रमुख भूमिका. ‘हिन्दुस्तान की कसम’ म्हटलं की चेतन आनंदचा चित्रपट ही
ओळख कायम.
‘हिन्दुस्तान की कसम’ वीरु देवगन यांनी दिग्दर्शित केला, पण पिक्चर फारसा रंगला नाही. अजय देवगनची दुहेरी भूमिका हे विशेष, पण गोष्टीत रंगतता नाही… अजय व जय मल्होत्रा (दोन्ही अजय देवगन) लहानपणी हरवतात. एक हिन्दुस्तानात सैन्यात भरती होतो, तर दुसरा पाकिस्तानात दहशतवादी. त्याचे नाव तौहिद असे ठेवले जाते. हे दोघे एकमेकांविरुध्द लढतात. त्या काळात पाकिस्तान कश्मीरमध्ये बर्‍याच कुरापती करीत असे आणि भारतीय सैन्य त्यांना अद्दल घडवे आणि काश्मीर सीमेवरचा वाढता दहशतवाद आणि त्याचा कणखरपणे होणारा पाडाव हे होत होते. मणि रत्नम दिग्दर्शित ‘रोजा’ असो वा अनिल शर्मा दिग्दर्शित ‘एलान ए जंग’ असो, अलिकडेच आलेला ‘एक्कीस’ असो, सीमेवरील दहशतवादाचा पाडाव वेगवेगळ्या प्रकारे रुपेरी पडद्यावर येत राहिला.
युद्धपट हे देशप्रेमाची भावना जागी करतात. देश रक्षणासाठी सीमेवर लढत असलेल्या सैनिकांच्या जीवन व संघर्ष, जिद्द व मेहनत यांचा प्रत्यय देतात. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आयुष्य जगतोय हे त्यातून अधोरेखित होत आहे. खरंतर जवळपास सर्वच युध्दपट हे सर्व राज्यात करमुक्त (आजच्या काळात जीएसटीमुक्त) करण्यात यावेत. त्यामुळे ते अधिकाधिक मेहनत पोहचतील. युद्धपट म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर त्यासह ते चित्रपट प्रबोधनही करीत आहेत.
‘बॉर्डर 3’च्या निमित्ताने असा फोकस हवाच. मल्टीप्लेक्सचा भव्य दिव्य दिमाखदार पडदा, उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम आणि फोर डी स्क्रीन असेल तर व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा थरारक अनुभव हे युद्धपटाला अतिशय पूरक आहे. सोशल मीडियात ‘बॉर्डर 3’चीही चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाचा प्रेक्षक जागरूक झाला आहे…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply