भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा थेट संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवाशक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने मंगळवारी पनवेलमध्ये तरुणाईचा उदंड उत्साह पहायला मिळाला. या यात्रेचे नेतृत्व करत असलेले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मार्केट यार्ड येथील बैठकीत बोलताना आपण सर्वांनी मिळून युवा मोर्चाचे एक मजबूत संघटन उभे करूया, असे आवाहन केले.
युवाशक्ती जागर यात्रेला उत्तर रायगडमधील युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने पनवेलमध्ये भाजपची मोठी ताकद दिसून आली. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक अजय बहिरा, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, शहर उपाध्यक्ष केदार भगत, अमित ओझे, तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, रोहित जगताप, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष हिमेश बहिरा, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष मयूर कदम, निखील जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी अतिशय नम्र भूमिका घेत सांगितले की, मी आज प्रदेशाध्यक्ष असलो तरी तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. मला तुमच्याकडूनही खूप काही शिकायचे आहे. तरुणांनी विविध क्षेत्रांत काम करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. त्यासाठी मी तुमच्यासोबत प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून सदैव पाठीशी उभा राहीन.
यावेळी प्रदेशाध्यक्ष महाडिक यांनी ठाकूर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव केला. ‘ठाकूर परिवाराने प्रगत आणि पावन केलेली ही भूमी म्हणजे पनवेल आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपला आदर व्यक्त केला.
प्रारंभी युवाशक्ती जागर यात्रा जेव्हा पनवेलमध्ये दाखल झाली तेव्हा गार्डन हॉटेलपासून काढण्यात आलेल्या एका भव्य बाईक रॅलीने स्वागत करण्यात आले. या रॅलीत शेकडो तरुण उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विशेष संवाद मेळावा पार पडला. यामध्ये आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे वडाळे तलाव येथे आयोजित केलेला ‘मीट-अप विथ के.एम.’ हा कार्यक्रम. या विशेष सत्रात प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी तरुण पिढी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत थेट संवाद साधला, ज्यामुळे तरुणांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. संपूर्ण जागर यात्रेच्या माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांच्यामध्ये नवीन राजकीय आणि सामाजिक चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाकडून यशस्वीपणे करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper