चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब असा माध्यमांनी प्रवास केला, वृत्तपत्रातील शुक्रवारची चित्रपट समिक्षा ते सोशल मीडियात काही सेकंदाच्या रिलमध्ये बरेच काही, आगाऊ तिकीट विक्रीसाठी लांबलचक रांगेत उभे रहाणे ते ऑनलाईन तिकीट, सकाळी घरी येत असलेल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातमी समजणे ते डिजिटल चॅनेलवरील काही घडतेय बिघडतेय तोच बातमी असा बराच प्रवास सुरू असला, काळ पुढे सरकत असला तरी काही चित्रपट कायमच तारुण्यात राहतात. त्या चित्रपटाच्या प्रिंटवर चरे पडत नाहीत अथवा त्या चित्रपटाची पोस्टर्स फाटली जात नाहीत.
राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित ‘बॉबी’ हा चित्रपट असाच आहे, आजही हा चित्रपट लोकप्रिय आहे. पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. हम तुम एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाए…आजच्या मोकळ्या ढाकळ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वातावरणात याचं कदाचित फार काही गैर वाटणार नाही (तसे ते गैरच. पण युवक युवतीमधील मैत्री, प्रेम यांचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत फारच मोकळं ढाकळ, बिनधास्त आणि बेधडक दिसतेच आहे. त्यातून काही समस्या निर्माण होत आहेत. नातेसंबंध महत्वाचा की फायदा तोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.) त्रेपन्न वर्षांपूर्वी मात्र ‘और चाबी खो जाए’ हे फारच धाडस होते. मग ते पिक्चरमधलं का ना असे? तोपर्यंत कृष्ण धवल अर्थात ब्लँक ॲण्ड व्हाईट चित्रपट मागे पडत होता आणि त्यासह चित्रपटातीलही बुजरेपणा, प्रतिकात्मक प्रेम या गोष्टीही मागे पडत होत्या. चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट.
राज कपूर निर्मित, दिग्दर्शित व संकलीत ‘बॉबी’ (रिलीज २८ सप्टेंबर १९७३. चक्क त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली हो. कधी झाली हो इतकी वर्षे पूर्ण ? आज जगण्याला वेग आला आहे याचा हा परिणाम आहे का ?) पडद्यावर आला तेव्हापासून आजही गाजतोय. जुन्या काळातील असे अनेक चित्रपट आजही गाजताहेत. मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया, के. असिफ दिग्दर्शित मुघल ए आझम, राज कपूर दिग्दर्शित बरसात, गुरुदत्त दिग्दर्शित प्यासा, विजय आनंद दिग्दर्शित गाईड, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित नया दौर असे बरेच चित्रपट सांगता येतील. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत पहिला धाडसी प्रेमपट ही ‘बॉबी’ची सर्वकालीन ओळख. पिक्चर आणि प्रेम यांचं नातं ( साटेलोटे म्हटलं तरी चालेल) पडद्यावरच्या दृश्य माध्यमाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून. उत्कट प्रेम, बुजरे प्रेम, एकतर्फी प्रेम, असोशी, जिव्हाळा, प्रतिकात्मक दृश्य, विरह, दु:ख, कोणी ‘देवदास’ बनणे, कधी ‘मुगल ए आझम’चा ऐतिहासिक फंडा, कधी ‘चोरी चोरी’ प्रेम तर कधी ‘दिल एक मंदिर’ची भावना तर कधी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ची कबूली. कधी ‘दिलने फिर याद किया’ची भावना.
हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर ‘प्रेमरस ‘ वाहतच होता, आजही वाहतोय, पुढेही वाहिल. हिंदी चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे प्रेमाच्या गोष्टी. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्याही. ‘बॉबी’ने त्यात चक्क ‘क्रांती ‘ केली. इतिहास घडवला. क्रेझ निर्माण केली. बॉबी नावाने अनेक सौंदर्य प्रसाधने विक्रीला आली आणि त्यांचा विक्रमी खप वाढला. मुझे कुछ कहना है मुझे भी कुछ कहना है…प्रियकरला प्रेयसीचा तेवढाच तत्पर जबाब. हे सगळेच नवीन होते हो तेव्हा आणि एव्हाना सत्तरचे दशक सुरु होऊन रसिकांचीही नवीन पिढी आली होती. गवताची काडी चावून चावून प्रेम संवाद बोलणारे प्रेमिक पुरे झाले आता प्रेमाची कृती हवी होती.
‘मेरा नाम जोकर’ (१९७०) फ्लॉप झाल्यावर राज कपूर कर्जबाजारी झाला, आर. के. स्टुडिओ गहाण ठेवला अशा अनेक कथा/दंतकथा/गोष्टी/स्टोरीज कायमच सांगितल्या जातात. तरी पुढच्याच वर्षी याच आर. के. फिल्म बॅनरचा रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल आज और कल’ (१९७१) आलाय, त्याचा विसर का पडावा? आपल्याला ‘जोकर’चे अपयश विसरायचयं आणि प्रेक्षकांनाही त्याची आठवण करुन द्यायची नाही असं काही करुया असे राज कपूरने लेखक के. ए. अब्बास आणि पटकथा लेखक वसंत साठे यांना सांगितले आणि नवीन पर्व सुरु झाले. मी मीडियात आल्यावर बॉम्बे पब्लिसिटी सर्विसमुळे माझे वसंत साठे यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले आणि गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून ‘बॉबी’बद्दल काही गोष्टी जाणून घेता आल्या. ‘बॉबी’ चित्रपट काढण्यास राज कपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असे, एक दिवस कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्याच्या वाचण्यात आला, तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’- ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्याच्या डोक्यात वीज चमकल्यासारखे झाले व ‘बॉबी’ चित्रपटाची कल्पना रुजत गेली. त्या वेळच्या युवकांची जीवनशैली, मानसिकता, प्रेमातील धिटाई याचे ‘रुपेरी पडद्यावरील रुपड’ म्हणजे ‘बॉबी’ ठरला. पूर्ण नाव बॉबी जॅक ब्रेगेन्झा.
ते राजेश खन्नाच्या क्रेझचे दिवस होते. तो सांगेल ती ‘प्राईज’ द्यायला निर्माते द्यायला तयार होते. राज कपूरला राजेश खन्नाची ‘किंमत’ देणे शक्य नव्हतेच. शशी कपूरने त्याला सुचवले, कोवळ्या वयातील ( टीनेजर) प्रेमकथेसाठी आपला चिंटू (अर्थात ऋषी कपूर) परफेक्ट. पण त्याला वजन कमी करावे लागले. आता ‘बॉबी’ कोण? राज कपूर ‘नायिकांच्या निवडीबद्दल ‘ विशेष ख्यातनाम. नायिकेचे सौंदर्य आणि व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य यांचा योग्य मेळ घालण्यात त्याच्यातील दिग्दर्शक नेहमीच ओळखला गेला. चिंटू एकोणीस वर्षाचा म्हणजे ‘बॉबी’ सोळा वर्षांची हवी. राज कपूरचा ‘बॉबी गर्ल ‘साठीचा शोध सुरु झाला. ‘दो कलिया’,’दस लाख’, ‘वारीस’ इत्यादी चित्रपटांतील बालकलाकार बेबी सोनिया आता मोठी झाली होती आणि आता ती नीतू सिंग होती. राज कपूरला फ्रेश चेहरा हवा होता. थीम आणि रसिकांना कनेक्ट होईल असा. ख्रिश्चन युवतीची व्यक्तिरेखा होती. नफिसा अलीच्याही नावाचा विचार झाला. डिंपल कापडियाच्या रुपाने ‘बॉबी’ मिळाली. बातमी झाली आणि गाजलीही. ‘बॉबी’ म्हटलं की डिंपल कापडिया हे कायमस्वरुपी हिट समीकरण. तिनेही बॉबीचं दिसणं, असणं, हसणं, पाहणं असं काही साकारल, राज कपूरच्या दिग्दर्शनातील काही सर्वोत्तम परफॉर्मन्समध्ये ‘बॉबी डिंपल ‘चे स्थान बरेच वरचे. पहिल्याच चित्रपटात भारी अभिनय. त्यात सौंदर्य, फॅशन, नृत्य आणि आवश्यक तेथे बोल्ड लूक या सगळ्याची मस्त केमिस्ट्री. डिंपल कपाडिया पहिल्या शोपासूनच स्टार झाली. तिचा चाहतावर्ग निर्माण झाला. तिच्या पोस्ट कार्ड साईज फोटोना मागणी आली. १९७३ च्या अनेक मराठी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर डिंपल कपाडियाला स्थान मिळाले.
चिंटू हा कपूर असल्याने आणि ‘मेरा नाम जोकर ‘मध्ये लहानपणीचा राज कपूर साकारल्याने त्याला ‘कॅमेरा’ म्हणजे काय, दिग्दर्शक म्हणजे काय याची साधारण कल्पना होतीच. कपूर म्हणजे चित्रपट हे नाते तसे घट्ट पण डिंपलला सगळचं नवीन. आपले पिता चुन्नीलाल कापडिया यांच्या जुहू चौपाटीवरील प्रशस्त बंगल्यात ती लहानाची मोठी झाल्याने तिच्या वागण्यात सहजता होती. राज कपूरचा पिक्चर म्हणजे गीत, संगीत व नृत्य यांची झक्कास जमलेली केमिस्ट्री. त्याच्या चित्रपटाच्या पटकथेतच गाण्याची जागा असे. आणि आपल्या चित्रपटाचा मुहूर्त गाण्याच्या रेकॉर्डिंगने करण्याची त्याची पध्दत. ‘बॉबी’चीही दोन गाणी रेकॉर्ड करीत मुहूर्त झाला. आनंद बक्षी, विठ्ठलभाई पटेल आणि इंद्रजितसिंग तुलसी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत. लता मंगेशकर यांचे डिंपलला पार्श्वगायन (अभिनेत्रींच्या प्रत्येक नवीन पिढीसाठी लता मंगेशकर गात राहिल्या) पण चिंटू कपूरसाठी नवीन आवाज हवा. वसंत साठेसाहेबांनी शैलेन्द्र सिंगचे नाव सुचवले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्याच्या ‘आवाजाची परीक्षा’ घेऊनच मग त्याला संधी दिली. शैलेन्द्र सिंग पुण्यातील एफटीआयमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. संधी पार्श्वगायक म्हणून मिळाली. ( ‘दो जासूस’पासून हीरोही झाला.) संगीतकार लक्ष्मीकांत यांनी ‘बॉबी’ची एक आठवण मला सांगितली होती, मुकेशजींनी मला व प्यारेभाईंना सांगितले, राज कपूर तुमच्याकडून ‘बॉबी’चे संगीत करुन घेण्यास इच्छुक आहे. आम्ही म्हटले, त्यांच्या चित्रपटांना शंकर जयकिशन यांचे संगीत असते आणि आम्ही त्यांचे चाहते आहोत. मुकेश म्हणाले, राज कपूरने शंकर जयकिशन यांना त्याची कल्पना दिली आहे. आम्ही राज कपूरची भेट घेतली तेव्हा ते ‘बॉबी’च्या संगीताबद्दल अतिशय फोकस्ड होते. मेहबूब स्टुडिओतील रेकॉर्डिंग स्टुडिओत ‘मै शायर तो नही’च्या रेकॉर्डिंगने ‘बॉबी’चा मुहूर्त करायचे ठरले. आवाजाची टेस्ट घेऊन शैलेन्द्रसिंगचे नाव निश्चित केले होते. गंमत म्हणजे, ‘बॉबी’ हे नायकाचे नाव असावे असे आम्ही समजत होतो. ते नायिकेचे नाव आहे असे समजताच आम्ही गाण्यांचा टोन बदलला. राज कपूरचे समाधान होईल असे संगीत आम्ही दिले. पुढचा इतिहास सर्वांनाच माहित आहे, लक्ष्मीकांत म्हणाले.
आर. के. स्टुडिओत राजा (चिंटू कपूर) याच्या प्रशस्त घराचा सेट लागला. राजा आपल्या वाढदिवसानिमित्त मै शायर तो नहीं गाणे गातो याचे सर्वप्रथम चित्रीकरण ठरले. चिंटू कपूर तयार होऊन सेटवर आल्यावर त्याचं पहिलं लक्ष गेले ते नृत्य दिग्दर्शक कोण आहे याकडे. त्याने तसे त्याचा मित्र आणि तेव्हा राज कपूरचा सहाय्यक दिग्दर्शक असलेल्या राहुल रवैलला त्याबद्दल विचारले. राज कपूरचं म्हणणं होतं, या गाण्यात चिंटूचे नैसर्गिक हावभाव हवेत. एकादा नृत्य दिग्दर्शक निवडायचा तर तो अन्य अभिनेत्याप्रमाणे सुचवणार. तसं नको होतं. राज कपूरमधला दिग्दर्शक येथेही दिसतोय. आजही हे गाणे पाहताना चिंटू कपूरची स्वाभाविक शैली दिसते आणि ती छान वाटते.
प्राणने एकही रुपया मानधन न घेता या चित्रपटात भूमिका साकारल्याची बरीच चर्चा झाली. त्या काळात चित्रपटाची दोन रिळे झाली. कश्मीरचे आऊटडोअर्स शूटिंग पार पडले. आणखीन दोन गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले. आर. के. स्टुडिओत सेट लागलाय, पाकिस्तानी गायिका रेश्मा हिच्या अखियो से….गाण्याने प्रभावित होऊन राज कपूरने लता मंगेशकर यांच्याकडून अखियो मे रहने दे अखियों की दास्ता हे गाणे रेकॉर्ड केले अशा अधूनमधून बातम्या येत. पिक्चरचे पीआरओ बनी रुबैन यात मास्टर माईंड आणि राज कपूरला चित्रपटाच्या मीडिया हाईपचे महत्व चांगलेच माहित. ‘बॉबी’बद्दल निर्मितीवस्थेतच उत्सुकता वाढत वाढत गेली आणि एक दिवस फारच मोठा शॉक बसला, ‘बॉबी ‘ गर्ल डिंपल कापडियाने सुपर स्टार राजेश खन्नाशी लग्न केले. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आश्चर्याचा धक्काच. चित्रपट रसिक डिंपलला पडद्यावर पाहण्यास प्रचंड इच्छुक असतानाच हे काय घडले? अजून ‘बॉबी’चे सगळे शूटिंग पूर्णही झाले नव्हतेच. आणि आता हे नवदाम्पत्य हनिमून आणि भटकंतीत मश्गुल असल्याने ‘बॉबी’साठी डिंपलच्या तारखा मिळणे अवघड झाले. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’च्या मिनर्व्हातील प्रीमियरला हे पती पत्नी आले.
‘बॉबी’ पूर्ण होत आला आणि गाण्याची तबकडी (तो ग्रामोफोनचा काळ होता) मार्केटमध्ये आली तोच गाणी हिट. राज कपूरच्या चित्रपटाच्या परंपरेला धरुनच ते होते. मै शायर तो नही, मुझे कुछ कहना है, हम तुम एक कमरे मे बंद हो, घे घे सायबा प्यार मे सौदा नही, झूठ बोले कौवा कांटे ही गाणी सर्वकालीन लोकप्रिय. गाणी गायली होती लता मंगेशकर, शैलेंद्र सिंह,नरेन्द्र चंचल, व याचे गीतकार होते आनंद बक्षी, विठ्ठलभाई पटेल आणि इंद्रजितसिंग तुलसी. बिनाका गीतमाला, इराणी हॉटेलमधील जुक्स बॉक्स, लाऊडस्पीकर असं सगळीकडे ‘बॉबी’चे संगीत. पिक्चरची पब्लिसिटी म्हणून बॉबीची सौंदर्य प्रसाधने, मिनी स्कर्ट, पुढे गाठ मारलेला शर्ट, रिशी कपूरने चित्रपटात वापरलेली मिनी राजदूत स्कूटर, लेदर जॅकेट, मफलर, बेल बॉटम हे मार्केटमध्ये विक्रीला आले. वातावरण एकदम बदलून गेले. ‘बॉबी’ची हवा निर्माण झाली आणि मुंबईत मेन थिएटर मेट्रोत भव्य दिमाखदार प्रीमियरने चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच शोपासूनच असा काही सुपर हिट की पन्नास आठवड्यांचा मुक्काम.
पिक्चरमध्ये राजा बॉबी ब्बेगन्झाला भेटायला वस्तीत जातो तेव्हा बेल मारताच बॉबी दरवाजा उघडते तेव्हा तिच्या उजव्या हाताला चण्याचं पीठ लागलेले असते आणि त्याच हाताने ती आपली बटा ठीक करते हा प्रसंग राज कपूरने आपण नर्गिसला भेटायला तिच्या घरी गेलो त्यावरुन सुचल्याचा किस्सा खूप गाजला. हिट पिक्चर असे अनेक किस्से चर्चेत आणतो. आजच्या डिजिटल युगात जेन झी आणि जेन अल्फा पिढीलाही “बॉबी” च्या किश्याची मोहिनी घातली आहे. मुंबईनंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य राज्यात, शहरांत यशाची कमान कायम राहिली. उत्तर भारतात तर गावात ‘बॉबी’ लागलेल्या थिएटरपर्यंत बस सेवा सुरु झाली. पिक्चरचं यश हे असं भिनायचं. हम तुम एक कमरे मे बंद हो या गाण्याचे काश्मीरमधील गुलमर्ग येथील टूरिस्ट हॉटेलमध्ये शूटिंग झाले ते आजही ‘बॉबी’ हॉटेल म्हणून ओळखले जाते. ‘बॉबी’चे यशच बावन्न वर्ष टिकलय म्हटल्यावर काय हो. आणि यापुढेही ते असेच टिकणार आहे. ‘बॉबी’ धुवाधार गर्दीत सुरु असतानाच डिंपल संसारात रमली. आई झाली. ( ‘बॉबी’नंतर बारा वर्षांनी १९८५ साली जावेद अख्तर यांची पटकथा आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर ‘पासून तिने पुनरागमन केले ती स्टोरी वेगळी आणि अनेक वळणे घेत घेत चाललेली.
सागर प्रदर्शित होत असताना बॉबीचे दिवस असा प्रसार माध्यमातून फोकस टाकण्यात आला.) मला आठवतय ‘बॉबी’च्या वेळेस मेट्रोत स्टॉल दोन रुपये वीस पैसे, अप्पर स्टॉल तीन रुपये तीस पैसे, बाल्कनी चार रुपये चाळीस पैसे आणि ड्रेस सर्कल पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट होते. माझे ते शालेय वय होते आणि लांबलचक रांगेत उभा राहून स्टॉलचे तिकीट मिळताच प्रचंड सुखावलो. ते दिवसच वेगळे होते. सत्तरच्या दशकातील चित्रपट रसिक हा एका वेबसिरीजचा भन्नाट विषय आहे. चित्रपटात प्रेमनाथ, प्राण, दुर्गा खोटे, अरुणा इराणी, प्रेम चोप्रा, फरीदा जलाल इत्यादींच्याही भूमिका आहेत. प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा हा प्रेम चोप्राचा डायलॉग असा काही सुपर हिट ठरला, कालांतराने त्या नावाचे नाटकही आले आणि प्रेम चोप्राने आपल्या आत्मचरित्राला तेच नाव दिले. हिट पिक्चर काय काय घडवतो बघा… चित्रपट फक्त आणि फक्त पडद्यावर राहत नाही, त्याचा परिणाम आणि प्रवास ही एक वेगळी गोष्ट. चित्रपट संस्कृतीतील त्याचं महत्व आहे.
‘बॉबी’ला फ़िल्मफेअर पुरस्कार सर्वोतम अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ,सर्वश्रेष्ठ कला निर्देशन, सर्वश्रेष्ठ पार्श्व गायक म्हणून नरेन्द्र चंचल यांना बेशक मंदिर मस्जिद या गाण्यासाठी मिळाले. हिट पिक्चरची रिमेक तर बनणारच. तो दीर्घकालीन अलिखित नियम आहे आणि त्यात काहीच गैर नाही. पण ती जमली पाहिजे. सगळ्यांनाच ते जमत नाही. तेथे पाहिजे त्या फिल्मी जातीचे. गायत्री चित्र या बॅनरखाली कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन अशा जबाबदाऱ्या दिनेश यांनी पेलल्या आणि ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५) हा मराठी चित्रपट पडद्यावर आणला. महेश कोठारे (एव्हाना बालकलाकार म्हणून वाटचाल पूर्ण होत होती) आणि गोव्याची सुंदरी राधा बारटक्के अशा जोडीच्या या प्रेमपटाला रसिकांनी नाकारले. त्या काळात शॉर्टसमधील राधिका बारटक्के मराठी रसिकांना आवडली नाही. आज कदाचित “बॉबी”ची मराठीतील रिमेक रंगतदार ठरेल पण त्यात राज कपूर टच कुठून आणणार? राज कपूर चोवीस तास चित्रपट या कलेचा विचार करणारा फिल्मवाला होता.
१९८० साली पर्शियन भाषेत ‘parvaz dar ghafas’ अशी रिमेक आली. ‘बॉबी’चा रंग म्हणा, सर म्हणा रिमेकला येईल कशी? ‘बॉबी’चं तारुण्य आजही कायम आहे तर मग आणखीन काय हवे? आपल्या देशात पारंपरिक लोकप्रिय हिंदी चित्रपटाचाही इतिहास विशेष उल्लेखनीय आहे. आज चेंबूर परिसरात जाण्या येण्याचा योग येताना वर्षानुवर्षे वर्षांच्या सवय आणि आवडीप्रमाणे आर. के. स्टुडिओवर नजर पडते तेव्हा आर. के.चा तो हुकमी ट्रेडमार्क आणि प्रवेशद्वार दिसते, पण स्टुडिओच्या जागेवर उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत असे दिसते. तेव्हा याच आर. के. फिल्मने रुपेरी पडद्यावर आणलेल्या बरसात, आवारा, श्री ४२०, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम असे अनेक चित्रपट आठवतात आणि मीडियात असल्यानेच या वास्तूत अनेकदा जाण्याचे सुखद योग आले तेही आठवते.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper