नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९वी जयंती मंगळवारी (दि.२२) वाशी येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची रथयात्रा काढून उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्री चौगुले, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदुम, डॉ. अजित मगदुम, नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अविनाश लाड, मॉडर्न स्कूल वाशीच्या प्राचार्य सुमित्रा भोसले, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य शुभदा नायक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांनी, “माझ्या आयुष्यात अण्णांचा खूप प्रभाव आहे आणि त्यांच्या विचार व कार्यपद्धतीनुसार जगण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो,” असे मनोगत व्यक्त केले. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कर्मवीरांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दाम्पत्याचा दरवर्षीप्रमाणे सन्मान करण्यात आला. यंदा अन्वय फाउंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अजित मगदुम यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, तर सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदुम यांना रयत माऊली पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास रयतसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मवीरांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
Check Also
श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट
आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी …
RamPrahar – The Panvel Daily Paper