Breaking News

शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पनवेलमध्ये अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहरातील त्यांच्या पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कर्मवीरांच्या महान शैक्षणिक, सामाजिक आणि समाजोद्धारक कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा कायम पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपले आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जनरल बॉडी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उलवे नोडमधील सौ. शकुंतला ठाकूर विद्यालयाचे चेअरमन नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह उपस्थितांनी कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील बहुजन, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांनी स्वावलंबी व्हावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या व्यापक ध्येयाने त्यांनी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. ‌‘कमवा आणि शिका‌’ ही त्यांची संकल्पना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले करणारी ठरली.
शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्ती आणि समाजाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हा विचार कर्मवीरांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी ज्ञानाची गंगा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविली. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या रयत शिक्षण संस्थेने पुढील अनेक पिढ्यांना शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव देण्याचे कार्य केले आहे. कर्मवीरांच्या विचारांनी प्रेरित होऊन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आजही समाजातील सर्वसामान्य, गरजू आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे कर्मवीरांचे कार्य हे केवळ एका व्यक्तीचे कार्य न राहता महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी चळवळ ठरली आहे.

Check Also

श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट

आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी …

Leave a Reply