Breaking News

‘अडचणीतून मार्ग काढल्यास एसटीचा मार्ग सुकर’

कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा विश्वास

कर्जत : प्रतिनिधी

एसटीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खाजगी वाहनांचा प्रश्नसुद्धा मोठा अडचणींचा आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांनी मिळून पेलल्यास एसटीचा मार्ग निश्चितच सुकर होईल व महामंडळास गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी शनिवारी (दि. 1) येथे व्यक्त केला.

एसटी महामंडळाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत आगारात शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नायब तहसीलदार संजय भालेराव बोलत होते. सुरुवातीला वीरपत्नी आशाताई निकाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.

आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी प्रास्ताविक केले. एसटी कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमांमुळे प्रवाशांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास एसटी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मनात आपले स्थान मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वीरपत्नी आशाताई अनिल निकाडे निवृत्त सैनिक एसटी कर्मचारी राजेंद्र यादव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

खाजगी वाहनांचे आव्हान एसटी पुढे आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग आदींना एसटीतून सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा आहे. शासनाचाच एक विभाग असलेल्या एसटीकडून टोल वसूल केला जातो, हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे एसटी  तोट्यात जाते. तरीही नियोजनबद्ध व जिद्दीने काम केल्यास एसटी पुन्हा प्रवाशांसाठी मुख्य वाहन होईल.’ असे पत्रकार विजय मांडे यांनी सांगितले. माथेरान एसटी चालक संजय भोकरे आणि मनोज फडके यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी शुभेच्छा दिल्या. दीपक देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

कर्जत आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे, स्थानक प्रमुख देवानंद मोरे, लेखापाल अंकुश राठोड यांच्यासह  एसटीचे वाहक, चालक, कर्मचारी, प्रवासी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply