मुंबई ः प्रतिनिधी
ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 31) रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रामुख्याने कवितेवरील मर्मग्राही समीक्षा ही डॉ. म. सु. पाटील यांची ठळक ओळख. त्याचबरोबर संतसाहित्याचा व्यासंग, दलित साहित्याचा अभ्यास हीदेखील त्यांची वैशिष्ट्ये. तुकाराम-अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे, दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, प्रभाकर पाध्ये : वाङ्मयदर्शन (संपादित, सहलेखक – गंगाधर पाटील), सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध, ज्ञानेश्वरीचा काव्यबंध, ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध, बदलते कविसंवेदन ही त्यांची पुस्तके त्यांच्या व्यासंगाची साक्ष देतात. लांबा उगवे आगरी हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक आहे.